पूर्वी आयसीएसई, सीबीएसई आदी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देताना पाच टक्के गुण वाढवून ‘एसएससी’शी समानीकरण केले जाई. नंतर या बोर्डानी बहुपर्यायी प्रश्न वाढवले, अंतर्गत मूल्यमापनाचे गुणही वाढवले आणि प्रत्येक विषयाला परीक्षेपूर्वी एक दिवस सुट्टी द्यायला सुरुवात केल्याने नामांकित महाविद्यालयात ‘व्होकेशनल’च्या पहिल्या ५० जागा याच विद्यार्थ्यांना मिळू लागल्या व एसएससी बोर्डात गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांनाही प्रवेश दुरापास्त झाला. समानीकरणाच्या सर्व पद्धती प्रयत्नांती विफल झाल्यावर महाराष्ट्राचा तुलनेने सोपा असलेला अभ्यासक्रम सोडून ‘एनसीइआरटी’ने सुचविलेला अभ्यासक्रम अंगीकारणे भाग पडले. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धात्मक परीक्षांमध्ये जे पानिपत होई ते टळण्याची आशा होती. परंतु NEET -२०१३ च्या वेळी केलेल्या गोंधळामुळे उर्वरित वेळात अकरावीच्या अभ्यासक्रमाची उजळणी, बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित बहुपर्यायी प्रश्न आणि नवी काठिण्यपातळी यामुळे याही वर्षी पानिपत व्हायचे ते झालेच.
अभ्यासक्रम :
‘एनसीइआरटी’ची सर्वच विषयांची पुस्तके देखणी आहेत. वापरलेला कागद सुबक बांधणी, रंगीत छपाई, आशयाचे आकर्षक सादरीकरण यांमुळे सकृद्दर्शनी त्यांच्या प्रेमात पडायला होते. आकार व किमतीही भारदस्त! अगणित आकृत्या, भलेथोरले तक्ते, ठायी ठायी पेरलेले ज्ञान यामुळे ती परिपूर्ण भासतात. अशी पुस्तके पदवी किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी- ज्यात दीघरेत्तरी प्रश्न विचारले जातात, त्यासाठी योग्य ठरतात. परंतु प्रवेशपरीक्षेसाठी त्याच अभ्यासक्रमावर बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार तर घोकंपट्टी करावीच लागते. उदाहरणार्थ १) रसायनशास्त्राच्या Amines या प्रकरणात १० प्रकारच्या अमाइन्सची pKb मूल्ये असलेला तक्ता २)   Reproduction in Organisms  या प्रकरणात १३ सजीवांच्या गुणसूत्रांच्या संख्येचा तक्ता ३) रसायनशास्त्राच्या Chemistry in Everyday Life  मध्ये दिलेली डझनावारी औषधांची रेणू रचनासूत्रे.
एकूण अभ्यासक्रमाचे आकारमानच एवढे आहे की महाविद्यालयात सोडाच पण खासगी शिकवणीवर्गातही जरी दहावीच्या निकालाची वाट न पाहता अभ्यास सुरू केला तरी सर्व सुटय़ा व्यापून तो दशांगुळे उरतोच! असा अभ्यासक्रम अनेक वर्षे राबविणाऱ्या उत्तर भारतातून मुंबईत अखिल भारतीय कोटय़ातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये दुसऱ्यांदा प्रवेश परीक्षा देणाऱ्यांचे प्रमाण ५० टक्क्य़ांहून पेक्षा जास्त असते, हे वरील मुद्दा सप्रमाण सिद्ध करतो.
आठवीपर्यंत नापास न करण्याचा निर्णय आणि हा अभ्यासक्रम या परस्परविरोधी धोरणांचा काय परिपाक होणार आहे ते नजीकच्या भविष्यकाळात स्पष्ट होईलच.
प्रात्यक्षिके व प्रात्यक्षिक परीक्षा :
एकीकडे अभ्यासक्रम वाढवला आहे आणि दुसरीकडे लेखी परीक्षेचे गुण ८० वरून ७० केले आहेत. त्यात पूर्वी असलेले ४० गुणांच्या दोन विभागांऐवजी एकाच दिवशी ७० गुणांची एकच परीक्षा ठेवून ताण वाढवला आहे. दुसऱ्या बोर्डाची नक्कल करत प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण २० वरून ३० केले आहेत, पण ज्या प्रमाणात अभ्यासक्रम आधुनिक केला आहे, त्याचे प्रतिबिंब प्रात्यक्षिक विभागावर जराही उमटलेले नाही की आधुनिक उपकरणांचा वापर केला गेलेला नाही. फक्त पुस्तकी चर्चा. जीवशास्त्रात तर स्लाइडस् २’्रीि२ बनवणे आणि विच्छेदन करणे या मूलभूत कौशल्यांचे महत्त्वच कमी केले आहे. प्रत्यक्षानुभव नसण्याच्या उणिवेमुळे उद्योगजगत अशा विद्यार्थ्यांना रोजगारक्षम नसल्याचा शिक्का मारते.
प्रत्यक्ष विषयांबद्दल –
अ) भौतिकशास्त्र – प्रवेशपरीक्षेत या विषयाचे स्वरूप पूर्णपणे गणितांनीच भरलेले असते. जेव्हा ते अभियांत्रिकीबरोबर ‘सामायिक’ होते तेव्हा ठीक होते, परंतु आता ते वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी असेल तर खरे पाहता या विषयाचा पुढील अभ्यासक्रमाशी अर्थाअर्थी संबंध नाही. आणि किचकटपणे गुंफलेल्या तारा, स्प्रिंगा, फेकलेल्या विविध वस्तू, गोल फिरणाऱ्या वस्तू यांची वेग, वजने, त्वरणे वगैरे वगैरे काढणाऱ्या गणितांनी भरलेल्या प्रश्नपत्रिकेवरून वैद्यकीय अभ्यासक्रमाची पात्रता ठरवणे चुकीचे आहे. ते स्वरूप फक्त संकल्पनात्मक असणे पुरेसे आहे.
ब) रसायनशास्त्र- हा विषय सर्वात प्रदीर्घ असून संपवता संपवता शिक्षकांची दमछाक करतो. ‘एनसीइआरटी’ने प्रस्तावनेत प्रतिपादित केल्याप्रमाणे तो परिपूर्ण असला तरी वैद्यकीय प्रवेशपरीक्षेसाठी अनावश्यक असाणारा जो भाग ‘सामायिक’  परीक्षेच्या संदर्भात योग्य होता, तो कमी करून विषयाचा आकार सपक होईल. जसे- Commercially important chemicals, their manufacture आणि Sources of raw materials हा अभियांत्रिकीचा भाग आहे. तसेच Thermodynamics, Kinetics आणि Electrochemistry हे विभाग संकल्पनात्मक असणे पुरेसे आहे. त्यासाठी वेगवेगळी पुस्तके छापण्याची गरज नाही. बारावीच्या परीक्षेत तो भाग असला तरी वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी तो ‘non- evaluative’ करता येऊ शकतो.
क) जीवशास्त्र- ‘एनसीइआरटी’च्या  क्रमिक पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे जीवशास्त्राच्या ज्या शाखा विकसित झाल्या आहेत त्यांचे धागे या पुस्तकात पकडले आहेत हे खरे, परंतु त्यात मेडिसीनच्या (वैद्यकशास्त्र या अर्थाने)च्या पुस्तकांतून घेतलेला भागच जास्त आहे. ही ‘ह्य़ुमन बायोलॉजी’ बारावीच्या कोणत्याही शिक्षकाने प्रत्यक्ष पाहिली आणि अनुभवलेली नसते की शिकलेली नसते. तसेच पुढे तीच शिकण्यासाठी ही प्रवेशपरीक्षा आहे. त्या त्या विषयांतील निष्णात शिक्षक ती शिकवणारच आहेत. त्यापेक्षा जुन्या अभ्यासक्रमात अमिबा, पॅरामेशियम, हायड्रा, झुरळ, गांडूळ, मासा, बेडूक, कबुतर व उंदीर यांच्या उदाहरणांवरून एकपेशीय जीव सस्तन प्राण्यांपर्यंत कसा उत्क्रांत झाला हे अवयव संस्थांच्या उत्क्रांतीतून दाखवत असत. तो गाभा आता ह्य़ुमन बायोलॉजीने व्यापला आहे. Human Disease चा अभ्यास नंतर शास्त्रशुद्ध, सखोल आणि प्रत्यक्षपणे करायचाच आहे, तेव्हा आत्ता मलेरिया शिकण्यापेक्षा  Plasmodium चा जीवनक्रम शिकणे पुरेसे आहे, कारण तोच जीवशास्त्राचा गाभा आहे. आत्तासाठी तरी ‘ह्य़ुमन बायोलॉजी’ ही अवेळी केलेली घोकंपट्टीच आहे.
गेल्या चार दशकांत वैद्यकीय प्रवेशांबद्दलचे सिंहावलोकन केल्यास त्यात काही बदल स्वागतार्ह आहेत तर काही सपशेल फसले आहेत. खुल्या दृष्टिकोनातून पाहिले तर काही जुनी धोरणे पुन्हा आणणे आणि नव्या धोरणांत सुसंगत बदल करणे सहज शक्य आहे. नव्हे, ती काळाची गरज आहे.
* जुनी ग्रुप ‘अ’ / ग्रुप ‘इ’ पद्धत पुन्हा सुरू करणे- या दोन वर्षांमध्ये फार्मसी, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी जी ‘सामायिक’ प्रवेशपरीक्षा होती ती ‘असामायिक’ झाली आहे. अभियांत्रिकी प्रवेशासाठी फक्त बारावीचा अभ्यासक्रम आहे. त्याचे मूल्य ५० टक्के असणार आहे. जेईई-मेन्स ला ५० टक्के मूल्य देऊन गुणवत्तायादी बनवली जाणार आहे. राज्याच्या बोर्डातून पहिल्या २० पर्सेटाइल विद्यार्थ्यांना  जेईई-अ‍ॅडव्हान्स देता येणार आहे. त्यामुळे दोघांनी पूर्णपणे फारकत घेतली आहे. म्हणून ‘एमएचसीइटी’ऐवजी मेडिकल एन्ट्रन्स टेस्ट (MET) म्हणणे योग्य होईल.
* अकरावीत प्रवेश घेताना पूर्वीप्रमाणे दोन भाषा + PCMB ठेवावे आणि मॅट्रिकप्रमाणे बारावीला ग्रुप ‘अ’-(पीसीएम) आणि ग्रुप ‘इ’- (पीसीबी) घेता यावा. त्यामुळे बारावीला  सहा ऐवजी पाच विषय होतील. नको असलेले जीवशास्त्र/ गणित आपोआप सुटेल. मुख्य विषयांना जास्त वेळ मिळेल. त्यांच्या ऐवजी ‘थोडक्यात होणारे’ भूगोल/ अर्थशास्त्र / मानसशास्त्र हे विषय घ्यायची गरज उरणार नाही. पर्यायाने Bifocal / Vocationalविषयाची गरजच उरणार नाही. त्यामुळे लांबणारी अकरावीची प्रवेशप्रक्रियाही सुटसुटीत होईल. पूर्वी PCMB घेऊन प्रवेश परीक्षा देता येत असे, आता ते अस्तित्वातच नाही. आपला कल नीट न कळणाऱ्यांना बारावी ग्रुप ‘अ’ ग्रुप ‘इ’ची निवड करायची असल्याने एक वर्ष विचार करायला अधिक मिळेल.
गुणांचे मूल्य/ महत्त्व/ प्राधान्य (Weitage)
खरे पाहता अभियांत्रिकी ही काही गणिताची शाखा नसून भौतिकशास्त्राचा विस्तार आहे. परंतु ‘सीईटी’मध्ये १०० गुण गणिताला आणि ५० गुण भौतिकशास्त्राला व रसायनशास्त्राला असतात. प्रत्येक विषयाला बारावीत २० ते २२ धडे असतात. याऐवजी गणित आणि भौतिकशास्त्राला समान १०० आणि रसायनशास्त्राला ५० गुण करणे योग्य वाटते.
वैद्यकीय प्रवेशपरीक्षेबद्दल विचार करतानाही, जेव्हा दोन विद्यार्थ्यांचे एकूण गुण (PCB) समान असतात तेव्हा ज्याला जीवशास्त्रात जास्त गुण असतात, त्याला वरचा क्रमांक (Rank) दिला जातो. जीवशास्त्रातही समान गुण असल्यास रसायनशास्त्राचे गुण क्रमांक ठरवतात. सकृद्दर्शनी जीवशास्त्राला महत्त्व दिल्यासारखे वाटते, पण प्रत्यक्षात पाहता वैद्यकीय अभ्यासक्रमात शेवटी प्रवेश मिळालेला आणि फिजिओथेरपीला प्रथम प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या जीवशास्त्र व रसायनशास्त्रात फारसा फरक नसतो. तफावत असते ती भौतिकशास्त्राच्या गुणांमध्ये- तोच ‘Deciding Factor’ ठरतो. ज्याचे भौतिकशास्त्र चांगले तो वैद्यकीय अभ्यासक्रमाला व ज्याचे तितकेसे चांगले नाही तो फिजिओथेरपीला, असा प्रकार असतो. सध्या (PCB) ला (४५/४५/९०) असे प्रश्न म्हणजे प्रत्येक ४ प्रमाणे (१८०/१८०/३६०) एकूण ७२० गुण आहेत. त्याऐवजी (PCB)= (४५/९०/९०) प्रश्न म्हणजे (१८०/३६०/३६०) असे गुण असावेत. जी तीन तासांची एकच प्रश्नपत्रिका असते. त्याऐवजी (पाऊण, दीड, दीड) अशा तीन परीक्षा घेता येतील, तशा त्या सीईटीच्या वेळी वेगवेगळ्या असतच.  २२ धडय़ांवर किमान ४५ प्रश्न तरी हवेच. तरच एवढय़ा प्रचंड अभ्यासाला न्याय देता येईल.    (उत्तरार्ध)