आता २०१३ साली आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार निबंधाचा पेपर २५० गुणांचा झाला आहे. २५० गुण, तीन तास, साधारणत: हजार ते पंधराशे शब्दांत दिलेल्या चार किंवा सहा विषयांपकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहावा लागतो. निबंध हा एक मुद्दाम तयारी करण्याचा विषय आहे, हे उमेदवारांनी  समजून घ्यावे. आपण जे काही शिकलो त्यातले प्रत्यक्षात आपण काय आत्मसात केले आणि त्याचे सादरीकरण किती नेमकेपणे करतो हे या निबंधाच्या पेपरमधून दिसून येते.
प्रत्यक्ष तपासणाऱ्यांसमोर हजर न राहता लिहिलेला निबंध उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतििबब असते, हे उमेदवाराने कायम लक्षात ठेवावे. अनेक उमेदवारांना असे वाटते की, निबंध लेखन म्हणजे अनेक मान्यवरांच्या वक्तव्यांना उद्धृत करणे होय. म्हणून अनेकदा कुणा मोठय़ाच्या चार वाक्यांनी निबंधाची सुरुवात होते. मात्र विषय, ते चार शब्द व नंतरचा निबंध यात बऱ्याचदा खूपच तफावत जाणवते. निबंध मान्यवरांना उद्धृत करण्यासाठीची जागा नव्हे. तर उमेदवाराने त्याचे विषयासंबंधीचे नियोजनबद्ध, विचारपूर्वक म्हणणे मांडण्याची जागा आहे. या दृष्टीने उमेदवाराने खालील गोष्टी कराव्यात-
निबंध लिहायचा असतो, याची उमेदवाराने सतत जाण ठेवावी. त्यादृष्टीने त्याने नियमितपणे लिखाणाचा सराव करावा. अर्थात, हे फक्त निबंधालाच लागू होते असे नाही. १७५० गुणांची मुख्य परीक्षा लिखाणाची परीक्षा आहे. हे लिखाण मुद्देसूदपणे, शब्दसंख्येची मर्यादा राखीत करावे लागते. अशा प्रकारच्या लेखनाची उमेदवारांना बऱ्याचदा सवय नसते, कारण बऱ्याच उमेदवारांच्या अभ्यास पद्धतीत वाचणे व पाठांतर करणे यांना अनन्यसाधारण महत्त्व असते. म्हणूनच नागरी सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी आपल्या अभ्यास पद्धतीत बदल करावा. एकूण रोजच्या अभ्यासापकी विशिष्ट वेळ (दीड-दोन तास) जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या लिखाणाच्या सरावासाठी राखून ठेवावा, ज्यात उमेदवार त्याने वाचलेल्या अभ्यासभागावर स्वतंत्रपणे, कशाचाही आधार न घेता, सर्जक, मुद्देसूदपणे काही लिहील. सुरुवातीला असे लेखन थोडे पण दर्जेदार असावे. नंतर ते २०० शब्द, ६०० शब्द, अंतिमत: १५००-२००० शब्द अशा पद्धतीने विस्तारावे. लेखन पाठकोऱ्या कागदावर, होता होईतो सुवाच्य, वाचनीय हस्ताक्षरात, सरळ रेषेत करावे. लिहिलेले आपणच तपासावे, इतरांकडून तपासून घ्यावे, चुकांचा परामर्श घेत, टप्प्याटप्प्याने सुधारणा करावी. असे केल्याने शेवटी परीक्षेत लिहिताना, लेखनाची गती, शैली, शब्दसंचयातील अर्थपूर्ण अचूकता, विषयाला धरून मुद्देसूदपणा इत्यादी सारे साधत प्रभावीपणे लिहून परीक्षकावर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सकारात्मक प्रभाव पाडता येतो. लेखन शब्दमर्यादा सांभाळणारे, विषयाला अनुसरून करणे हे लिखाणाच्या सरावामुळेच शक्य होते. लेखन विचार व व्यक्तिमत्त्वाला परिपूर्ण बनवते म्हणून त्याचा सराव अत्यावश्यक आहे. नागरी सेवा परीक्षेची तयारी करणारा जो उमेदवार लेखन सरावाच्या आवश्यकतेकडे दुर्लक्ष करतो, तो आपल्या हातानेच आपल्या अपयशाचा मार्ग प्रशस्त करतो.
तसे पाहिले तर निबंध या शब्दाचा एक अर्थ बंध नसलेले लेखन असाही होऊ शकतो. मात्र, हे बंध नसणे हरिदासी कीर्तन नसावे. अर्थात शब्दमर्यादा व निवडलेल्या विषयाचे बंधन असतेच. मात्र, कित्येक उमेदवारांना सतावणारा प्रश्न म्हणजे १५०० ते २००० शब्दांत काय लिहावे हा असतो. याचा विचार उत्तरपत्रिका, प्रश्नप्रत्रिका मिळाल्यावर लगेचच करावा. विषय काळजीपूर्वक वाचावा. लेखन दिलेल्या संपूर्ण विषयावर करायचे आहे, त्यातील एका भागावर नाही याचे भान असावे. विषय असाच निवडावा ज्याबाबत सविस्तरपणे लिहू शकू याची आपल्याला खात्री असेल. विषय निवडल्यावर ‘कच्चे काम’ करण्याच्या उत्तरपत्रिकेतील पानावर विषय विस्तार कसा घडवला जाणार याबाबत एक आराखडा तयार करावा, मुद्दे निश्चित करावेत, निबंधाचा आकार कसा असेल हे ठरवावे अन् नंतरच प्रत्यक्ष लेखन करावे. म्हणजे वेळेचे नियोजन करण्यासाठी पूर्वतयारी आवश्यक असते. एकाच विषयावर तीन तास लिहावयाचे असल्यास योग्य नियोजन हवे. तीन तासांपकी एक तास कच्चा आराखडा तयार करणे, तो व्यवस्थित लावणे, योग्य ते मुद्दे येतील ते पाहणे यासाठी वापरावा. उर्वरित दोन तासांत निबंध लिहून काढावा. आता निबंध हा किती शब्दांत असावा यास काही महत्त्व नाही, पण तो अर्थपूर्ण असावा हे आवश्यक आहे. एक हजार शब्दांपासून तुम्हांला जेवढे आवश्यक वाटते तेवढी शब्दमर्यादा तुम्ही ठेवू शकता.
यूपीएससीच्या निबंध लेखनाच्या तयारीसाठी माध्यमिक-उच्च माध्यमिक अथवा विद्यापीठीय परीक्षांतील निबंध लेखनासाठी ज्या प्रकारची पुस्तके अथवा तयार निबंध वाचले जातात तसे वाचन इथे निरुपयोगी ठरते. दर्जेदार वाचन करताना चालू घडामोडींसंबंधी विषयांच्या विविध पलूंवर विविध माध्यमांमध्ये चालणाऱ्या साधक-बाधक चर्चा उमेदवाराने ऐकाव्यात, पाहाव्यात, वाचाव्यात. एखाद्या विषयाला किती विविध बाजू व पलू असू शकतात हे जाणून घ्यावे. तसेच हे सर्व किती विविध प्रकारे अभिव्यक्त केले जाते हे समजून घ्यावे. राष्ट्रीय वर्तमानपत्रे, रेडिओ, दूरचित्रवाणी वाहिन्या इ. सर्वामधून विविध प्रश्नांकडे विचारवंत, तज्ज्ञ, सामान्यजन इ. कसे पाहतात, हे जाणून घेतल्यानेच उमेदवाराचा माहितीसाठा समृद्ध होत जातो. म्हणून प्रत्येक विषय समजावून घेताना; त्या विषयाच्या संज्ञा-संकल्पना, विषयाची सविस्तर, मुद्देसूद माहिती, विषयाचा वर्तमानापर्यंतचा प्रवास, त्या विषयीची मते इ. सर्व बाबी जाणून, समजून घ्याव्यात, त्यासाठी आवश्यक ती माध्यमे धुंडाळावी, टिपणे बनवावीत, लेखन करावे. माहितीसाठी सदैव अद्ययावत असावा. कित्येक उमेदवार कोणत्याही निबंध विषयाला दोनच बाजू असतात, असा भ्रम करून घेतात. १९९० नंतरच्या जगाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे प्रश्नांची उत्तरे द्वैती नसतात तर अनेकांगी असतात याचे भान होणे, कोणत्याही विषयाला दोन नव्हे तर अनेक बाजू असतात व आपल्या निबंध लेखनामध्ये त्यातील अनेकांचा ऊहापोह करणे उत्तम. मात्र, निव्वळ खंडन करू नये, तर सर्व लेखनामधून सदोतीत अधोरेखित व्हावे की उमेदवाराला काहीतरी मूलगामी, प्रगल्भ विचार मांडायचा आहे. मांडलेला विचार, पटत नसला तरी बरेच प्रयत्न करून राजकीयदृष्टय़ा बिनचूक करण्याकडे उमेदवारांचा कल असतो. या ओढाताणीत कच्चे दुवे राहून जातात व चाणाक्ष परीक्षक ते हेरून गुणांचे बरेवाईट करू शकतो. म्हणून असे अनिच्छेने, मारून मुटकून विचाराला वळण देऊ नये. त्यापेक्षा प्रामाणिकपणे आपले मत व्यक्त करावे. मात्र तसे करताना ते संवैधानिकदृष्टय़ा नतिक, कायदेशीर, नीतिसंमत, मानवीय, ताíकक असेल याची दक्षता घ्यावी. ते तार्किक पद्धतीने, उदाहरणे देत विकसित करावे.
शैली व भाषा हे निबंधातील सर्वात महत्त्वाचे घटक. उमेदवाराची स्वतंत्र लेखनशैली असावी. ती क्लिष्ट, खूप गुंतागुंतीची नसावी. कोणताही मुद्दा ठाशीवपणे, सहज सोप्या शब्दात, मोजक्याच मात्र नेमक्या शब्दांत मांडावा. लेखनशैली अशी असावी की, ज्यामुळे आपले मत अरेरावीपणाचे, मग्रुरीचे वाटणार नाही. भाषेची निवड उमेदवाराने काळजीपूर्वक करावी. शब्दसंचय पुरेसा असेल, वाक्यरचना नेमकेपणाने जमेल, लेखनात पुरेसे लालित्य असेल याची काळजी उमेदवाराने घ्यावी व हे सारे ज्या भाषेत जमेल त्या भाषेत निबंध लिहावा (नियमाप्रमाणे निबंध व इतर उत्तरपत्रिकांची भाषा एकच असते.). कोणताही निबंध लालित्य व वस्तुनिष्ठतेचा समतोल साधणारा असावा. निबंधासाठी जे चार ते सहा विषय दिले जातात, ते अशाच प्रकारे योजले जातात की, जेणेकरून कोणत्याही विद्याशाखेच्या पदवीधरास कमीत कमी एका विषयावर तरी आपल्या शिक्षणाच्या आधारे काहीतरी लिहिता येईल. याशिवाय नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना अनेक विषयांबाबतची अद्ययावत माहिती असणे अपेक्षित असते. त्यामुळे दिलेल्या निबंध विषयातील विषय निवडताना बराच वाव असतो. अशा वेळी असाच विषय निवडावा ज्याबाबत आपल्याला र्सवकषपणे, सविस्तरपणे तरीही मुद्देसूद, माहितीपूर्ण लेखन विषयानुरूप लालित्याने करता येईल याची उमेदवाराला खात्री असेल. निव्वळ जोरदार सुरुवात वा आकर्षक शेवट अशा प्रकारे बाजारू लेखन करू नये. लेखनातील दमदारपणा सुरुवातीपासून शेवटपर्यंत टिकून राहिला पाहिजे. लेखन करताना ते आपल्या वेगळेपणाची चुणूक दाखवणारे असावे, विषयाकडे पूर्णत: नवीनपणे प्रकाश टाकणारे असावे. शेवटी, असे म्हणता येईल की सखोल, विचारप्रवण, मात्र चिंतनात्मक वाचन, मुद्देसूद; शब्दमर्यादेत राहून केलेला सर्जक लेखन सराव निबंधाचा आत्मा आहे.     

PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…