25 May 2020

News Flash

सी सॅट(परिचय)

एकूण २०० गुणांच्या या पेपरमध्ये प्रत्येकी २.५ गुणांसाठी ८० प्रश्न विचारण्यात येतात.

एमपीएससी मंत्र : फारुक नाईकवाडे

राज्य सेवा पूर्वपरीक्षा पेपर- २ या पेपरला सी सॅट (C-SAT)असेही म्हटले जाते. नागरी सेवा अभिवृत्ती चाचणी असा या लघुरूपाचा अर्थ होतो. म्हणजेच उमेदवार ज्या सेवेमध्ये प्रवेश घेऊ इच्छित आहे तिथल्या कामाच्या स्वरूपास त्याची अभिवृत्ती कितपत मिळतीजुळती आहे हे तपासणारा असा हा पेपर आहे. उमेदवारांची तर्क करण्याची, विश्लेषण करण्याची व निर्णय घेण्याची क्षमता तसेच त्यांचे आकलन या पेपरमधून तपासले जाते. या पेपरमध्ये ऐन वेळी समोर आलेल्या प्रश्नांचा विचार करून प्रतिसाद द्यायचा असतो आणि उत्तीर्ण व्हायचे तर हा प्रतिसाद, उत्तर बरोबर असणे गरजेचे असते. पाठांतराच्या वा स्मरणशक्तीच्या आधारावर या पेपरमधील प्रश्नांची उत्तरे देणे शक्य नाही. त्यामुळे हा पेपर पेपर एकपेक्षा जास्त अवघड, जास्त आव्हानात्मक समजला जातो.

एकूण २०० गुणांच्या या पेपरमध्ये प्रत्येकी २.५ गुणांसाठी ८० प्रश्न विचारण्यात येतात. रूढार्थाने जास्त आव्हानात्मक वाटणारा पेपर दोन हा वास्तविक परीक्षा उत्तीर्ण होण्यामध्ये पेपर एकपेक्षा जास्त योगदान देतो. सन २०१३ पासूनच्या राज्य सेवा पूर्वपरीक्षेतील कट ऑफ लाइनचे विश्लेषण केले असता उमेदवारांना प्रत्येकी २०० पैकी पेपर एकमध्ये सर्वसाधारणपणे ६० ते ८५ तर पेपर दोनमध्ये ७० ते १२० पर्यंत गुण मिळाले आहेत. त्यामुळे सी सॅट हा विषय कोणतेही दडपण न घेता अभ्यासायचा आणि सोडवायचा विषय आहे हे नेहमी लक्षात ठेवावे.

  • नव्या-जुन्या उमेदवारांच्या सी सॅट पेपर सोडविण्याच्या अनुभवांचे विश्लेषण केल्यावर पुढील बाबी लक्षात येतात.
  •   ठरावीक गुण मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवून पेपर सोडविणाऱ्या उमेदवारांना तुलनेने कमी प्रश्न सोडवूनही चांगले गुण मिळाले आहेत.
  •  ठरावीक गुणांचे उद्दिष्ट ठरविले की किती प्रश्न सोडवायचे याची मर्यादा आखून घेता येते आणि ताण कमी होऊन नकारात्मक गुण ओढवून घेणाऱ्या क्षुल्लक चुका टाळता येतात.
  •  जास्तीत जास्त पेपर कव्हर करण्याचे उद्दिष्ट ठेवून पेपर सोडविणाऱ्या विद्यार्थ्यांकडून क्षुल्लक प्रकारातील चुका जास्त होतात आणि जास्त प्रश्न सोडवूनही नकारात्मक गुणपद्धतीमुळे गुण खूप कमी होतात.
  • ज्या उमेदवारांनी आपल्या सरावाचे विश्लेषण करून आपला कम्फर्ट झोन कोणता आहे आणि आव्हानात्मक वाटणारे प्रश्नप्रकार कोणते आहेत ते शोधून त्यावर आधारित सराव केला त्यांना या पेपरमध्ये चांगले गुण मिळाले आहेत.

वेगवेगळ्या कट ऑफचा विचार करता उत्तीर्ण होण्यासाठी सी सॅटमध्ये १०० ते १२० गुण मिळवायचे उद्दिष्ट व्यवहार्य ठरते. हे ३५ ते ४० प्रश्नांचे गुण आहेत. निगेटिव्ह मार्किंगचे गुण वजा करून इतके गुण मिळणे आवश्यक आहे. या दृष्टीने ५ निर्णयक्षमतेचे प्रश्न सोडून ७५ पैकी ६० ते ६५ प्रश्न सोडविणे हे उद्दिष्ट असायला हरकत नाही. म्हणजे किमान ४० ते ५० प्रश्न बरोबर सोडविले जाऊन उरलेल्या चुकीच्या उत्तरांचे गुण वजा होतील आणि नकारात्मक गुण नसलेल्या प्रश्नांचे किमान ६ ते १० गुण असे एकत्रितपणे कट ऑफपर्यंत पोहोचता येते.

वरील विश्लेषणाच्या अनुषंगाने विभागवार तयारी व पेपर सोडविणे या दोन्हीसाठी योजना ठरवायला हवी.

  • आयोगाचा साधारणपणे ५६ पानांचा पेपर १२० मिनिटांत वाचून सोडवायचा असतो. सलग सोडवत गेले तर ८०व्या प्रश्नापर्यंत पोहोचण्यासाठी दिलेला वेळ कधीच पुरणार नाही. यासाठी अवघड वाटणारे उतारे आणि प्रश्न बाजूला ठेवून गुण मिळवून देणारे प्रश्न आधी सोडविणे आवश्यक असते. पुरेसा सराव केलेला असेल तर उतारा किंवा प्रश्नाच्या सुरुवातीलाच तो वेळेत सोडविता येईल की नाही हे चटकन लक्षात येते. अवघड प्रश्न / उतारा बाजूला ठेवून गुण देणाऱ्या प्रश्नाकडे वळता येते.
  • पेपर दोनमध्ये ५६ पानी पेपर आणि ऐन वेळी आकलन आणि विश्लेषण करून सोडविण्याचे प्रश्न असे स्वरूप असल्याने खूपच कठीण वाटणारे प्रश्न ऐनवेळच्या तयारीचा भाग होऊ शकत नाहीत. अशा घटकांसाठी थोडा जास्त वेळ लागतो आणि त्यांचा समावेश दीर्घकालीन व्यवस्थापनामध्ये असणे आवश्यक असते.
  • जितका पेपर सोडविण्याचा सराव जास्त असेल तितकी यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. सोडविलेल्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून स्पर्धेत आपण कुठे आहोत आणि अजून किती आणि कोणती तयारी गरजेची आहे याचा वारंवार आढावा घेतला पाहिजे.

 

या पेपरमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवायचे असतील तर सरावाशिवाय पर्याय नाही. हा सराव केवळ बरोबर उत्तरे शोधण्यापुरता मर्यादित असून चालणार नाही. वेळेचे नियोजन करून बरोबर उत्तरे शोधण्याचे तंत्र आत्मसात करावे लागेल. यासाठी सर्वात सोपा आणि परिणामकारक पर्याय म्हणजे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका. या प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवून पाहाव्यात. यातून कोणत्या घटकावर आपले प्रभुत्व आहे, कोणता घटक अजून तयारी केल्यास जमू शकतो, कोणता घटक खूपच अवघड वाटतो या बाबी व्यवस्थित समजून घेता येतील आणि तयारीची दिशा ठरविण्यास मदत होईल. यामध्ये थोडय़ाफार तयारीने आत्मविश्वास वाढू शकेल अशा घटकांवर सर्वात जास्त भर द्यावा, त्यानंतर आत्मविश्वास असलेल्या घटकांच्या सरावावर. मात्र अचूकपणे सोडविता येणाऱ्या प्रश्नांचे प्रमाण सरावाने वाढविणे आवश्यक आहे. या पेपरमधील घटकांच्या तयारीबाबत उपघटकनिहाय सविस्तर चर्चा पुढील लेखामध्ये करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2020 12:35 am

Web Title: mpsc exam study c sat akp 94
Next Stories
1 नागरी सेवा परीक्षेचे स्वरूप
2 एमपीएससी मंत्र : चालू घडामोडींचा अभ्यास
3 करिअर क्षितिज : जैवमाहिती तंत्रज्ञान
Just Now!
X