25 January 2021

News Flash

एमपीएससी मंत्र : गृहनिर्माण क्षेत्रातील ‘नवरीती’ आणि लाइट हाऊस प्रकल्प

पूर्वपरीक्षेतील चालू घडामोडी आणि मुख्य परीक्षेतील पेपर तीन व चार यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे

(संग्रहित छायाचित्र)

रोहिणी शहा

नवीन वर्षांच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ग्लोबल हाऊसिंग टेक्नॉलॉजी चॅलेज- इंडियाअंतर्गत सहा राज्यांमधल्या ‘लाइट हाऊस’ प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. पूर्वपरीक्षेतील चालू घडामोडी आणि मुख्य परीक्षेतील पेपर तीन व चार यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने याबाबत परीक्षोपयोगी चर्चा या लेखामध्ये करण्यात येत आहे.

लाइट हाऊस प्रकल्प (LHP)

बांधकाम क्षेत्रातील नावीन्यपूर्ण व अद्ययावत जागतिक तंत्रज्ञान, साहित्य आणि प्रक्रियांचा वापर करून मोठय़ा प्रमाणात घरकुल उभारणी करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

*  प्रत्येक LHP हा किमान १,००० घरकुलांचे गृहसंकुल असेल.

*  जागतिक गृहनिर्माण तंत्रज्ञान स्पर्धेच्या (Global Housing Technology Challenge- GHTC) माध्यमातून निवडण्यात आलेल्या पर्यायी बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करून ही घरे बांधण्यात येतील.

*  स्थानिक/ प्रादेशिक भौगोलिक रचना आणि हवामानाचा विचार करून आपत्तींमध्येही टिकतील अशा प्रकारची घरे उभारण्यासाठी वैशिष्टय़पूर्ण तंत्रज्ञान वापरून ही संकुले उभारण्यात येतील.

* या संकुलांमधील घरांचे क्षेत्रफळ हे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) (PMAY-U)) मधील क्षेत्रफळांप्रमाणे असेल आणि राष्ट्रीय बांधकाम संहिता – २०१६ मधील मानकांची पूर्तता या प्रकल्पांमध्ये करणे बंधनकारक असेल.

*  पारंपरिक विटा आणि सिमेंट आणि बांधकाम प्रक्रियेऐवजी नवीन तंत्रज्ञान आणि साहित्याचा वापर केल्याने हे प्रकल्प एक वर्षांच्या कालावधीमध्येच पूर्ण होतील. तसेच नावीन्यपूर्ण प्रक्रियांमुळे ही नवीन घरकुले अधिक टिकाऊ, उच्च दर्जाची आणि कमी खर्चाची असणार आहेत.

*  बांधकामपूर्व कामकाजाचे तीन महिने व प्रत्यक्ष बांधकामाचे १२ महिने अशा प्रकारे विहित वेळेत प्रकल्प पूर्ण करणाऱ्या विकासकाला २०,००० डॉलरचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

*  इंदूर (मध्य प्रदेश), राजकोट (गुजरात), चेन्नई (तमिळनाडू), रांची (झारखंड), अगरतळा (त्रिपुरा) आणि लखनौ (उत्तर प्रदेश) येथे हे लाइट हाऊस प्रकल्प बांधण्यात येणार आहेत.

*  प्रत्येक घरकुलामध्ये आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांसह प्रत्येक प्रकल्पामध्ये प्रत्येकी सुमारे एक हजार घरकुलांची उभारणी करण्यात येणार आहे.

या प्रकल्पामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून बांधकाम करण्यात येईल. हे प्रकल्प या एक प्रकारे गृहनिर्माण क्षेत्रातील प्रयोगशाळाच ठरल्या आहेत. त्याचबरोबर तंत्रज्ञानाचे  हस्तांतरण आणि त्यांची प्रतिकृती सुलभतेने करण्यात येणार आहे. बांधकाम कामाचे नियोजन, संरचना तयार करणे, आवश्यक सामग्रीचे, बांधकाम घटकांचे उत्पादन करणे, बांधकामाच्या कामाचा सराव आणि चाचण्या घेणे यासाठी आयआयटी, एनआयटी आणि इतर अभियांत्रिकी महाविद्यालये, नियोजन आणि स्थापत्य महाविद्यालये, बांधकाम व्यावसायिक, खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातले व्यावसायिक आणि इतर भागीदारांनी योगदान दिले आहे.

नवरीती अभ्यासक्रम

याच कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांकडून ‘नवरीती’ या बांधकाम क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संकल्पनांसाठीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला.

*  भारतीय गृहनिर्माणासाठी नवीन, परवडण्याजोगे, प्रमाणित, संशोधन, नवोन्मेष, तंत्रज्ञान – (New, Affordable, Validated, Research Innovation Technologies for Indian Housing – NAVARITIH) असे या अभ्यासक्रमाचे स्वरूप आहे.

* बांधकाम क्षेत्रातील पदवीधरांना पाच वर्षांच्या अनुभवानंतर हा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल.

* जागतिक स्तरावर बांधकाम क्षेत्रामध्ये वापरण्यात येणाऱ्या नवीन संकल्पना, साहित्य, प्रक्रिया, रचना यांची बांधकाम व्यावसायिकांना ओळख व्हावी आणि प्रत्यक्ष अनुभवातून अशा तंत्रज्ञानाचा भारतामध्ये वापर करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी हा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे.

आनुषंगिक मुद्दे

आशा – भारत

परवडणारे शाश्वत गृहनिर्माण प्रवेगक – भारत (Accelerator Affordable Sustainable Housing Accelerators- India (ASHA-India) हा बांधकाम क्षेत्रातील भारतीय संकल्पना आणि संशोधनाला चालना देण्यासाठीचा उपक्रम केंद्रीय शहरी व गृहनिर्माण मंत्रालयाकडून सुरू करण्यात आला आहे.

*  आशा भारत केंद्रांच्या माध्यमातून भविष्यात उपयोजनात आणता येऊ शकणाऱ्या बांधकाम क्षेत्रातील नवोपक्रम, नव्या संकल्पना आणि तंत्रज्ञानास, संशोधनास तसेच स्टार्ट अप्स यांना चालना देण्यासाठी मार्गदर्शन आणि साहाय्य उपलब्ध करून देण्यात येते.

*  आयआयटी मुंबई, आयआयटी खरगपूर, आयआयटी मद्रास, आयआयटी रुरकी आणि उरकफ-ठएकरळ जोरहाट या ठिकाणी आशा भारत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

*  आशा भारत उपक्रमातून निवडण्यात आलेले नवोपक्रम, बांधकाम साहित्य आणि प्रक्रिया बांधकाम व्यावसायिक, स्टार्टअप्स आणि संशोधकांना उपयुक्त ठरतील. यातून निवडण्यात आलेल्या उत्कृष्ट पाच तंत्रज्ञानांस पुरस्कार देण्यात येतील.

पीएमएवाय -शहरी मिशन

*  या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते पीएमएवाय – शहरी पुरस्कार-२०१९ चे वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना- शहरी ही मोहीम ‘२०२२ पर्यंत सर्वासाठी घरकुल’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

*  शहरी भागातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल प्रवर्गातील कुटुंबास ३०० वर्ग मीटर क्षेत्रफळाचे घरकुल उपलब्ध करून देणे असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.

*  या योजनेमधील उल्लेखनीय कार्याला मान्यता देण्यासाठी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने वार्षिक पुरस्कार देण्यात येतात.

भाडेतत्त्वावरील परवडणारी गृहसंकुले (Affordable Rental Housing Complexes – ARHC)

कोविड १९ च्या काळात प्रवासी मजुरांचे स्थलांतर झाल्यावर त्यांना त्याच्या मूळ प्रदेशात, गावामध्ये राहण्याजोगी घरे/ जागा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने ही भाडय़ाने घरे उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.

*  रिकाम्या शासकीय इमारती किंवा खासगी व्यावसायिकांच्या इमारतींमध्ये/ जागांमध्ये ही तात्पुरती गृहसंकुले चालविण्यात येत आहेत.

*  यांमध्ये एका खोलीचे घर किंवा एका खोलीमध्ये चार ते पाच खाटांचे विश्रामगृह अशा प्रकारे दोन पर्याय उपलब्ध असतील.

*  लाभार्थी व्यक्तीस जास्तीत जास्त २५ वर्षांसाठी ही जागा भाडय़ाने घेता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2021 12:15 am

Web Title: navriti and light house projects in the housing sector abn 97
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : केस स्टडीजचे कोडे
2 केस स्टडीजचे कोडे
3 नोकरीची संधी
Just Now!
X