News Flash

अभ्यासाचे आणि वेळेचे नियोजन

यूपीएससी परीक्षेतील तीन टप्पे, व्यापक अभ्यासक्रम, त्यासाठी वाचायची अनेक संदर्भ पुस्तके आणि किमान वर्षभराचा सातत्यपूर्ण अभ्यास या वैशिष्टय़ांमुळे नियोजित तयारीशिवाय दुसरा मार्ग नाही.

| August 31, 2015 02:43 am

यूपीएससी परीक्षेतील तीन टप्पे, व्यापक अभ्यासक्रम, त्यासाठी वाचायची अनेक संदर्भ पुस्तके आणि किमान वर्षभराचा सातत्यपूर्ण अभ्यास या वैशिष्टय़ांमुळे नियोजित तयारीशिवाय दुसरा मार्ग नाही. परीक्षेचे स्वरूप व व्याप्ती लक्षात घेऊन अभ्यासाचे आणि वेळेचे नियोजन करणे अत्यावश्यक ठरते. किंबहुना पद्धतशीरपणे केलेले नियोजन आणि त्याची प्रभावी अंमलबजावणीच या परीक्षेचा मार्ग सुकर करू शकते.
अर्थात, नियोजनाचा विचार करताना काही महत्त्वपूर्ण मुद्दे लक्षात घेणे गरजेचे ठरते. त्यातील पहिली बाब म्हणजे आपण कोणत्या वर्षी परीक्षा देणार आहोत हे ठरवून त्याआधी किमान एक वर्ष अभ्यासाला सुरुवात करावी लागेल. त्यापेक्षा जास्त वेळ उपलब्ध असेल तर त्याप्रमाणे दीर्घकालीन नियोजन आखता येईल. दुसरी बाब म्हणजे परीक्षेपूर्वी एक वर्ष आधी सुरू करायचा अभ्यास हा शक्यतो पूर्णवेळ स्वरूपाचा असावा. म्हणजे या परीक्षेच्या तयारीच्या पहिल्या वर्षभरात पूर्णपणे परीक्षेच्या या अभ्यासावरच लक्ष केंद्रित करावे. अन्यथा या परीक्षेच्या तयारीस योग्य न्याय देता येणार नाही. अभ्यासाचे वर्ष निश्चित झाल्यावर हाती घ्यावयाची तिसरी बाब म्हणजे प्राथमिक तयारी, पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासाचे सखोल व सविस्तर वेळापत्रक तयार करावे. त्या अंतर्गत मुख्य परीक्षेसाठी साधारणत: सात-आठ महिने तर पूर्वपरीक्षेसाठी चार महिन्यांचा कालावधी निर्धारित करावा.
चौथी बाब म्हणजे मुख्य परीक्षेसाठी राखीव आठ महिन्यांचा आणि पूर्वपरीक्षेसाठी राखीव चार महिन्यांच्या कालावधीत विषयांचे अभ्यासक्रमानुसार सखोल नियोजन करणे. यात कोणता विषय आधी घ्यायचा, त्याला किती वेळ द्यायचा, त्यानंतर कोणता घटक व त्याचा अभ्यासक्रम अभ्यासून होईल या पद्धतीने वेळेची विभागणी करावी.
पाचवी बाब म्हणजे दैनंदिन आणि आठवडय़ाभराचे नियोजन बनवावे. यात दररोज एक अथवा दोन विषय अभ्यासायचे की आठवडा तीन-तीन दिवसांत विभागून त्या तीन दिवसांत सुरुवातीला एक आणि नंतर एक असे दोन विषय अभ्यासायचे हे ठरवावे. म्हणजे दिवस विभागून अथवा आठवडा विभागून विषयांचा अभ्यास करता येतो. त्याखेरीज वर्तमानपत्रांच्या वाचनासाठी दररोज दोन तासांचा कालावधी निश्चित करणे महत्त्वाचे आहे. त्याखेरीज नियतकालिके आणि भारत वार्षकिीसारख्या चालू घडामोडींवरील संदर्भवाचनासाठी (एकंदर चालू घडामोडींसाठी) वर्तमानपत्रांच्या वेळेशिवाय आठवडय़ातील एक दिवस राखीव ठेवावा. अन्यथा मासिके आणि वार्षकिीसारख्या संदर्भ पुस्तकांचे वाचन करणे अवघड जाईल.
नियोजन प्रक्रियेतील पुढील बाब म्हणजे केलेल्या अभ्यासाची व्यवस्थितपणे उजळणी होईल, याची खबरदारी होय. अनेक विषय, विविध पुस्तके आणि वर्तमानपत्रांचे-नियतकालिकांचे वाचन करायचे असल्यामुळे अभ्यासून झालेला विषय किमान दोन वेळा तरी पुन्हा वाचला जाईल, याची काळजी घ्यावी. मुख्य परीक्षा आणि पूर्वपरीक्षेत उजळणीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण त्याशिवाय अभ्यासात नेमकेपणा, अचूकता, प्रभावीपणा याची हमी देता येणार नाही. म्हणूनच पुरेशा उजळणीद्वारे अभ्यासाचे मजबुतीकरण करण्यावर भर द्यावा.
परीक्षेच्या स्वरूपानुसार त्या त्या टप्प्यात सराव चाचण्या सोडवण्यासाठी वेळ राखीव ठेवणे निर्णायक ठरते. सराव चाचण्यांद्वारेच त्या त्या टप्प्यासाठी आवश्यक क्षमता व कौशल्ये विकसित करता येतात. आपल्या तयारीतील कच्चे दुवे शोधून त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करता येतात आणि अभ्यासात परीक्षाभिमुखतेची हमी देता येते. त्यामुळे जसजसा अभ्यास पूर्ण होत जाईल त्याप्रमाणे प्रारंभी विभागावर आणि नंतर संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सराव चाचण्या सोडवाव्यात. परीक्षेसाठी आवश्यक वेळेचे नियोजन आणि आपल्या उत्तरातील नेमकेपणा, अचूकता आणि प्रभावीपणा यात टप्प्याटप्प्याने सुधारणा करण्यावर भर द्यावा.
अभ्यासाचे नियोजन करताना मुख्य परीक्षेच्या तयारीनेच आपल्या अभ्यासाची सुरुवात करावी. त्यानंतरच पूर्वपरीक्षेचा अभ्यास करावा. आपल्या अभ्यासात कोणत्याही एका विषयाला अनावश्यक जास्त वेळ किंवा कमी वेळ देणे शक्यतो टाळावे. त्या विषयाचे परीक्षेतील महत्त्व, अभ्यासक्रम, त्यासाठी वाचायची संदर्भ पुस्तके आणि संबंधित विषयासंदर्भातील आपली स्थिती लक्षात घेऊनच प्रत्येक विषयास पुरेशा प्रमाणात वेळ निर्धारित करावा. कोणत्याही विषयाच्या प्रेमात पडून अतिरिक्त वेळ देण्याची चूक करता कामा नये. म्हणजेच अतिशय व्यावसायिकपणे अभ्यासाचे नियोजन करणे गरजेचे ठरते.
त्याचप्रमाणे कोणत्याही विषयाचा अभ्यास सुरू केल्यानंतर प्रारंभी तो विषय समजून घेण्यावर भर द्यावा. त्या दृष्टीने विचार करता संबंधित विषयातील संकल्पना आणि कळीचे मुद्दे याच्या आकलनावर भर द्यावा. हे करताना आपल्या वाचनात जी विपुल माहिती सापडते ती अधोरेखित करावी, त्यावर प्रक्रिया करून मुद्दय़ांच्या स्वरूपात मांडून ठेवावी. मात्र पहिल्या वाचनावेळीच ती लक्षात राहिली पाहिजे असा अट्टहास धरू नये. कारण प्रथम संकल्पना, विचार, कळीचे मुद्दे आणि अंतिमत: माहिती अशा क्रमाने अभ्यास करावा. माहितीप्रधान भाग एकदा वाचल्यानंतर लक्षात राहीलच असे नाही. त्याशिवाय परीक्षा जसजशी जवळ येईल त्या काळात अशा माहितीचे उजळणीद्वारा मजबुतीकरण करता येते. प्रारंभीच कोणत्याही विषयातील माहितीच्या जंजाळात न अडकता संबंधित विषयाचे आकलन करण्यावर भर द्यावा. एका बाजूला संकल्पनात्मक स्पष्टीकरणानंतरच पुढील अभ्यास करावा आणि दुसऱ्या बाजूला माहितीप्रधान भागाच्या अभ्यासाची उजळणीद्वारा विशेष काळजी घ्यावी.
त्याशिवाय प्रत्येक विषयाशी संबंधित चालू घडामोडींची तयारी समांतरपणे सुरू ठेवावी. उपरोक्त परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे वर्तमानपत्रे, नियतकालिके, वार्षकिी इत्यादींच्या वाचनाद्वारे अभ्यासक्रमाशी संबंधित समकालीन आयामाची आपल्या तयारीत पुरेशा प्रमाणात दखल घेतली जात आहे हे पाहावे.
शेवटची बाब म्हणजे या परीक्षेच्या तयारीसाठी नियोजन गरजेचे आहे यात शंका नाही. मात्र, आपण आखलेले नियोजन हे ताठर स्वरूपाचे असू नये तर त्यात लवचीकता असावी. प्रत्यक्ष तयारी करताना विचारात न घेतलेले मुद्दे लक्षात आल्यास त्यानुसार बदल करण्यासाठी नियोजनात लवचीकता हवी. मात्र ते अतिलवचीक दराऐवजी, आठवडय़ास बदलणारेही असू नये. थोडक्यात आपले नियोजन व्यावहारिक असावे याची खबरदारी घ्यावी.अर्थात या लेखात मांडलेले मुद्दे म्हणजे अंतिम शब्द नव्हे, तर एक व्यापक मार्गदर्शक चौकट म्हणूनच त्याकडे पाहावे. अभ्यासास प्रत्यक्षपणे सुरुवात केल्यानंतर या चौकटीतील बारकावे आणखी सूक्ष्मपणे लक्षात घेता येतील. त्यात आपल्या गरजेनुसार अनावश्यक ते बदल करता येतील. कारण प्रत्येक व्यक्ती ही सारखीच असत नाही आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीत अमुक एक प्रारूपच प्रमाण मानता येत नाही. म्हणून स्वत:चे निरीक्षण करत उपलब्ध वेळेचा कमाल व प्रभावी वापर ज्या पद्धतीने होईल तीच बाब महत्त्वपूर्ण मानून त्याप्रमाणे नियोजन आखावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2015 2:43 am

Web Title: study and time management
टॅग : Mpsc Exams,Upsc
Next Stories
1 माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन
2 किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेंतर्गत शिष्यवृत्ती
3 क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षणक्रम
Just Now!
X