09 March 2021

News Flash

नीतिनियमविषयक विचारसरणीची चौकट

यूपीएससीमधील ‘एथिक्स अ‍ॅण्ड इंटिग्रिटी’ या घटकामध्ये नैतिकता व नीतिनियम यांची विविध प्रारूपांसोबतची गुंतागुंतीची मांडणी उमेदवाराने अभ्यासलेली असणे अपेक्षित आहे.

| September 23, 2013 08:42 am

यूपीएससीमधील ‘एथिक्स अ‍ॅण्ड इंटिग्रिटी’ या घटकामध्ये नैतिकता व नीतिनियम यांची विविध प्रारूपांसोबतची गुंतागुंतीची मांडणी उमेदवाराने अभ्यासलेली असणे अपेक्षित आहे.
आपण सर्वच जण स्वत:ची भविष्यातील प्रतिमा पाहत असतो. अशी प्रतिमा जी समूह म्हणून अथवा समाज म्हणून अधिक न्यायाधिष्ठित व अधिक नतिक जबाबदारी पाळणाऱ्या समूहाची प्रतिमा असते. केवळ समूह म्हणून नाही तर समूहातील विविध घटकांसाठी, प्रारूपांसाठी विशिष्ट नतिक चौकट असावी, जी त्या समूहाला/ घटकाला अधिक बळकटी देऊ शकते. नैतिक शासनव्यवस्था, नैतिक उद्योगव्यवस्था, नैतिक शिक्षणव्यवस्था या आणि अशा अनेक घटकांचा यामध्ये समावेश होतो. यूपीएससीमधील Ethics & Integrity या घटकामध्येदेखील नतिकता व नीतिनियम यांची विविध प्रारूपांबरोबरील गुंतागुंतीची मांडणी उमेदवाराने अभ्यासलेली असणे अपेक्षित आहे.
सोप्या भाषेत सांगायचे तर जबाबदार नागरिक व मनुष्य म्हणून वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला अनेक परिस्थितींना वेगवेगळ्या प्रकारे सामोरे जावे लागते. या सर्व परिस्थितीमध्ये आपल्या वागण्याचे मापदंड कसे ठरतात व आपण कसे वागतो याचा अभ्यासपूर्ण, नीतिशास्त्रानुसार केलेला विचार म्हणजेच Ethics & Integrity हा घटक होय. या घटकांचा विचार करत असताना कोणत्या गोष्टींचा यामध्ये समावेश होत नाही, हे पाहणेही अतिशय महत्त्वाचे ठरते. Ethics & Integrity  या घटकांच्या परिप्रेक्ष्यात समाविष्ट न होणाऱ्या काही महत्त्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे-
* नीतिनियम (Ethics) म्हणजे भावना नाहीत. भावनांमधून नीतिनियमांबद्दल अधिक जागरूकतेने निर्णय घेता येऊ शकतात. अनेकदा आपण असे पाहू शकतो की, अनेक लोक वाईट कृत्य करण्यास प्रवृत्त होत नाहीत, कारण त्यांच्या मनात ‘चांगल्या’ भावना बाळगणाऱ्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात. बऱ्याच वेळा चांगली कृती करण्यापासून आपण दूर राहतो, कारण त्यातून ‘अवघडल्यासारखी भावना’ निर्माण होते.
* नीतिनियम म्हणजे धर्मविषयक शिकवण नाही. अनेक व्यक्ती कोणत्याही धर्माच्या प्रत्यक्ष प्रभावाखाली नसतात. नीतिनियम त्यांनादेखील लागू होतात. बहुतेक सर्व धार्मिक शिकवणी या श्रेष्ठ नीतिनियमांचा उपदेश करणाऱ्या असतात, परंतु आधुनिक काळातील सर्व प्रश्न केवळ धार्मिक शिकवणीमुळे सुटतातच, असे नाही.
* नीतिनियम म्हणजे केवळ कायद्याचे तंतोतंत पालन नव्हे. अतिशय सक्षम कायद्याच्या चौकटीमध्येदेखील योग्य नीतिनियमांचा अभाव असू शकतो. कायदा व न्यायव्यवस्था ही ‘न्याय’ या संकल्पनेवर मुख्यत: अवलंबून असल्याने इतर अनेक नीतिनियमांचा त्यात समावेश नसतो.
* नीतिनियम म्हणजे समाजमान्य सांस्कृतिक शिष्टाचार पाळणे नाही. अनेकविध संस्कृतींमध्ये काटेकोर नीतिनियम आचरणात आणले जातात; तर काही संस्कृतींमध्ये महत्त्वाच्या नीतिनियमांकडे काणाडोळा केलेला आढळून येतो. नीतिनियमांची चौकट पाळणे म्हणजे केवळ विज्ञानाधिष्ठित असणे नाही. सामाजिक व वैज्ञानिक शास्त्रे आपल्याला अधिक नीतिपूर्ण निर्णय घेण्यास जरूर मदत करतात. परंतु, केवळ शास्त्रसंमत असणे म्हणजे नीतिनियमांचा सखोल विचार त्यामध्ये असेलच, असे गृहीत धरता येत नाही. माणूस कसा आहे याचे उत्तर विज्ञान देऊ शकते, परंतु, व्यक्तीने कसे असायला हवे याची कारणमीमांसा मात्र नीतिनियमच देऊ शकतात. एखादी घटना घडवून आणणे हे विज्ञान व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने शक्य आहे, म्हणून ते नीतिनियमांना धरून आहे, असे आपण निश्चितच म्हणू शकत नाही.
नीतिनियमांची चौकट निश्चित करण्यातील प्रमुख अडचणी
कोणत्याही समाजासाठी सर्वाना समान लागू होईल अशा नीतिनियमांची चौकट बनवणे प्रमुख दोन कारणांसाठी अडचणीचे आहे.
* कोणते मापदंड वापरून अशी नीतिनियमांची चौकट ठरवावी
* ही नीतिनियमांची चौकट आपण सामोरे जात असणाऱ्या प्रत्येक लहान-मोठय़ा प्रसंगांना कशी लागू करावी?
जर आपले नीतिनियम भावना, धर्म, कायदा, रूढी-परंपरा किंवा विज्ञान या कशावरच बेतलेले नसतील तर मग ते कशाचे बनले आहेत? अनेक विचारवंतांनी, तत्त्ववेत्त्यांनी या प्रश्नांचा आढावा घेतला आहे. शेकडो वर्षांच्या तात्त्विक घुसळणीतून प्रमुख पाच नीतिनियमांच्या चौकटी सर्वानी मान्य केल्या आहेत.
दोन भागांच्या या लेखामध्ये आपण या पाचही नीतिनियमांच्या चौकटींचा सखोल विचार करणार आहोत. नीतिनियमविषयक या चौकटी खालीलप्रमाणे –
(क) उपयुक्ततावादी दृष्टिकोन (The Utilitarian Approach)
सोप्या शब्दात सांगायचे झाले तर जास्त लोकांना जास्तीतजास्त आनंद मिळावा, असे धोरण असणे म्हणजे उपयुक्ततावादी दृष्टिकोन असणे होय. या प्रकारच्या विचारसरणीमध्ये जर अपेक्षित निर्णय अथवा परिस्थिती निर्माण होत असेल तर त्याला सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते. या विचारसरणीनुसार निर्णय घेत असताना अनेक वेगवेगळ्या बाबींमुळे या विचारसरणीचे महत्त्व स्पष्ट होते-
* प्रत्येक व्यक्तीला म्हणूनच प्रत्येक मताला समान किंमत असते.
* सर्वच जण स्वत:च्या सुखाकरता प्रयत्नशील राहणार व दु:खे टाळण्याचा प्रयत्न करणार हे गृहीत धरलेले असते.
या दृष्टिकोनातून जास्तीतजास्त आनंद म्हणजेच कमीतकमी दु:ख असेही याकडे पाहता येते. मात्र याही दृष्टिकोनामध्ये काही त्रुटी आहेत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ‘आनंद’ यासाठी कोणतीही नतिक मोजपट्टी लावली जात नाही. तसेच अल्पसंख्याकांच्या मताला अजिबात वाव मिळत नाही.    
(पूर्वार्ध)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2013 8:42 am

Web Title: upsc exam ethics and integrity
टॅग : Upsc,Upsc Exam
Next Stories
1 महिलांसाठी सैन्यदलांतर्गत बीएस्सी नर्सिग अभ्यासक्रम
2 रोजगार संधी
3 आयआयटीचा एमएस्सी अभ्यासक्रम
Just Now!
X