श्रीकांत जाधव
प्रस्तुत लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर तीनमधील आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन या नमूद घटकाचा सर्वागीण आढावा घेणार आहोत. आधुनिक तंत्रज्ञानामुळे जगभरातील जवळपास सर्व देशांमध्ये विकासात्मक प्रक्रिया अधिक वेगवान बनलेली आहे; पण यामुळे विविध प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. उदाहरणार्थ, अमर्याद जंगलतोड आणि यामुळे होणारा जमिनीचा ऱ्हास, औद्योगिक क्षेत्रामधून उत्सर्जित केले जाणारे हरितगृह वायू, त्यामुळे होणारी आणि झालेली जागतिक तापमानवाढ आणि याचे जागतिक पर्यावरण आणि हवामानावर झालेले दुष्परिणाम, वाढत चाललेली लोकसंख्या, औद्योगिक क्षेत्राची वाढ, शहरीकरण इत्यादीमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा वेगाने ऱ्हास होत आहे आणि याच्या परिणामस्वरूप जगभर विविध प्रकारच्या आपत्तींमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे.
प्रत्येक वर्षी भारताला विविध प्रकारच्या आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. वादळे, महापूर, भूकंप, त्सुनामी, दुष्काळ, भूस्खलन, हिमस्खलन, ढगफुटी, यामध्ये जागतिक हवामानबदलामुळे उत्तरोत्तर अधिकच वाढ होत आहे आणि याच्या जोडीला मानवनिर्मित आपत्तीचाही धोका आहे. आण्विक ऊर्जा केंद्रे, रासायनिक उद्योग यामध्ये होणारे अपघात, यामुळे निर्माण होणारी आपत्तीसदृश परिस्थिती आणि त्याचा पर्यावरण आणि मानवी जीवनावर होणारा परिणाम गंभीर स्वरूपाचा असतो. सध्या जगातील जवळपास सर्व देशांमध्ये आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन हा महत्त्वाचा धोरणात्मक भाग बनविण्यात आलेला आहे.
आपत्ती, आपत्ती व्यवस्थापन, आपत्तीपूर्व व्यवस्थापन, आपत्ती प्रभाव कमी करण्याच्या उपाययोजना, भूकंप, दुष्काळ व एल निनो (El Nino) आणि ला निनो (La Nino) या हवामानविषयक संकल्पनाची योग्य माहिती असल्याशिवाय प्रश्नाचा नेमका कल ओळखता येऊ शकत नाही. हा घटक व्यवस्थित समजून घेण्यासाठी पर्यावरण आणि हवामान या विषयाशी संबंधित संकल्पनाची माहिती असणे गरजेचे आहे, हे वरील प्रश्नावरून दिसून येते.
भारत सरकारनेही आपत्तींना यशस्वीरीत्या हाताळण्यासाठी राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि स्थानिक पातळीवर विविध प्रकारच्या सरकारी यंत्रणा कार्यरत केलेल्या आहेत. तसेच याच्या जोडीला कायदेही करण्यात आलेले आहेत ज्यामुळे देशातील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षमपणे राबविता येऊ शकते. आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन याविषयी जनजागृती करण्यासाठी सरकारकडून विशेष कार्यक्रमही राबविले जातात. २०२० या वर्षांत करोना महामारीचा प्रभाव असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ पहिल्यांदाच संपूर्ण देशात लागू करण्यात आलेला आहे. तर या कायद्याची आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापनामधील उपयुक्तता काय आहे याची सखोल माहिती असणे गरजेचे आहे, कारण या वर्षी या कायद्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या घटकावर विचारण्यात आलेले प्रश्न
* आपत्ती सज्जता (Disaster preparedness) हे आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेतील पहिले पाऊल आहे. स्पष्ट करा की कशा प्रकारे भूस्खलनच्या बाबतीत धोकादायक क्षेत्र नकाशा (hazard zonation mapping)) आपत्ती निवारणासाठी साहाय्यकारी ठरू शकते. (२०१९)
* भारतात आपत्ती जोखीम कमी करणे (DRR) यासाठी सेंडाई आपत्ती जोखीम कमी करणे प्रारूप (२०१५-२०३०) (Sendai Framework for DDR—२०१५-२०३०) करारवर स्वाक्षरी करण्यापूर्वी आणि केल्यानंतरच्या विविध उपाययोजनानचे वर्णन करा. हे प्रारूप ह्योगो कृती प्रारूप, २००५ (Hyogo Framework for Action, २००५) कशा प्रकारे भिन्न आहे? (२०१८)
* २००४ मध्ये आलेल्या त्सुनामीने भारतासह चौदा देशांमध्ये हाहाकार आणलेला होता. त्सुनामी घडून येण्यासाठी जबाबदार असणारी कारणे आणि यामुळे जनजीवन व अर्थव्यवस्थेवर पडणाऱ्या परिणामाची चर्चा करा. NDMA च्या २०१० च्या मार्गदर्शक तत्त्वाच्या संदर्भात अशा प्रकारच्या घटनांदरम्यान जोखीम कमी करण्यासाठी तयार असणाऱ्या यंत्रणेचे वर्णन करा. (२०१७)
* राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (NDMA) मार्गदर्शक तत्त्वाच्या संदर्भात, अलीकडेच उत्तराखंडमध्ये ढगफुटीच्या अनेक घटना घडल्या. याचा प्रभाव कमी करण्यासाठी अवलंबल्या जाणाऱ्या उपायांची चर्चा करा. (२०१६)
* भारतीय उपखंडामध्ये भूकंपाच्या वारंवारतामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. असे असूनसुद्धा, त्याचा प्रभाव कमी करण्यासाठीच्या दृष्टीने भारतातील तयारीमध्ये लक्षणीय उणिवा दिसून येतात. विविध पैलूंची चर्चा करा. (२०१५)
* दुष्काळाला त्याचा स्थानिक विस्तार (spaital expanse), ऐहिक कालावधी (temporal duration), संथ सुरुवात आणि पीडित वर्गावरील स्थायी स्वरूपातील प्रभाव या दृष्टीने आपत्ती म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) च्या सप्टेंबर २०१० च्या मार्गदर्शक सूचना ध्यानात घेऊन, भारतामध्ये एल निनो (El Nino) आणि ला निनो (La Nino) च्या संभाव्य दुष्परिणामांना सामोरे जाण्यासाठीच्या यंत्रणा सज्जतेची चर्चा करा. (२०१४)
* आपत्तीपूर्व व्यवस्थापनेसाठी असुरक्षितता आणि आपत्तीपूर्व व्यवस्थापन जोखीम मूल्यमापन किती महत्त्वाचे आहे? प्रशासक या नात्याने तुम्ही आपत्ती व्यवस्थापन पद्धतीमधील कोणत्या मुख्य क्षेत्रावर लक्ष द्याल? (२०१३)
या घटकासाठी एन.सी.ई.आर.टी. अथवा सी.बी.एस.ई. बोर्डाची शालेय पुस्तके सर्वप्रथम वाचावीत ज्यामधून या घटकाची मूलभूत माहिती आपणाला मिळते. बाजारात या घटकासाठी अनेक गाईडस स्वरूपात पुस्तके उपलब्ध आहेत. यातील कोणतेही पुस्तक जे सोप्या पद्धतीने या घटकाची माहिती देईल ते वाचावे. या घटकाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी ‘द हिंदू’ आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’ ही इंग्रजी दैनिके, ‘योजना’, ‘कुरुक्षेत्र’, ‘डाऊन टू अर्थ’ आणि ‘वर्ल्ड फोकस’ ही मासिके तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संके तस्थळाचा वापर करावा.