News Flash

क्षमता व आवडीनुसार करिअरची निवड करा..

दहावीनंतर विद्याशाखा निवडताना बहुसंख्य मुलं चुकीच्या निकषांवर विद्याशाखा निवडतात.

क्षमता व आवडीनुसार करिअरची निवड करा..
विवेक वेलणकर, करिअर समुपदेशक

दहावीनंतर विद्याशाखा निवडताना बहुसंख्य मुलं चुकीच्या निकषांवर विद्याशाखा निवडतात. मिळालेल्या टक्क्यांनुसार कला-वाणिज्य-विज्ञान या शाखेची निवड करणे किंवा नातेवाईकांच्या रेटय़ाला बळी पडणे अथवा मित्र कुठल्या शाखेत प्रवेश घेत आहेत, ते पाहून आपली शाखा निवडणे या अभ्यासक्रम निवडीच्या अशास्त्रीय पद्धती आहेत. मिळालेले टक्के हा काही करिअर निवडीचा एकमेव मार्ग असू शकत नाही. शाखा निवडताना प्रत्येक विद्यार्थ्यांने कोष्टक तयार करावे. शाळेत आपल्याला अभ्यास करण्यासाठी सर्वात जास्त आवडणारे, झेपणारे विषय; मध्यम आवडणारे, झेपणारे विषय आणि अजिबात न आवडणारे व झेपणारे विषय. या कोष्टकाच्या तीन रकान्यांमध्ये आपले शाळेतील विषय बसवावेत. सर्वात जास्त आवडणारे विषय आणि तुम्हाला दहावीत मिळालेले टक्के, यांचे समीकरण जुळले, तर मग त्या शाखेची निवड करावी. हा झाला करिअर अथवा शाखा निवडीचा सोपा मार्ग. पण शास्त्रशुद्ध मार्गाने शाखा निवडायची असेल, तर मग अभिक्षमता चाचणी किंवा कल चाचणी हा उत्तम उपाय आहे. या चाचणीतील सकारात्मक मुद्दे घेतले नाहीत तरी चालेल, पण नकारात्मक मुद्दय़ांकडे नीट लक्ष द्या. तेवढे बाजूला ठेवून जे उरेल त्याची निवड करा, पण अभ्यासक्रम निवडीचा तुमचा निर्णय दहावी-बारावीचा निकाल लागण्याआधी होणे आवश्यक आहे.
करिअरचे काही मार्ग थेट दहावीनंतरच खुले होतात. त्यातील काही मार्ग म्हणजे आयटीआय आणि अभियांत्रिकीचा पदविका अभ्यासक्रम. दहावी आणि बारावीपर्यंत व्होकेशनल अभ्यासक्रम, हादेखील उत्तम पर्याय आहे. विविध जीवनकौशल्यांचे प्रशिक्षण देणारा होमसायन्स हा अभ्यासक्रमही मुलींसाठी उत्तम आहे. मुलांनी छंद उत्तम जोपासला तर ती कलाही पुढच्या आयुष्यात करिअरही बनू शकते यावर पालकांनी विश्वास ठेवायला हवा. फाइन आर्ट्स या विषयात पदविका केल्यानंतर संबंधित क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.
दहावीनंतर अभियांत्रिकी शाखेच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. याचे काही फायदे आहेत आणि काही तोटेही. सर्वप्रथम आपण फायदे बघू या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दहावीमध्ये चांगले गुण मिळाले असल्यास पदविका अभ्यासक्रमासाठी चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्यात अडचण येत नाही. बारावीनंतर सीईटी, जेईई आदी परीक्षा देण्याची गरज पडत नाही. पदविका मिळाल्यानंतर डिग्रीच्या थेट दुसऱ्या वर्षांला प्रवेश घेणे शक्य असल्याने पदविकेनंतर पदवी मिळवण्याचा पर्यायही खुला राहातो. पदविकेमध्ये अभियांत्रिकी शिक्षणाचा पाया पक्का झालेला असल्याने पदवी अभ्यासक्रमाला सामोरे जाणे सोपे होते. आणखी महत्त्वाचे म्हणजे अभियांत्रिकी पदविकेच्या बळावर रेल्वेपासून लष्करापर्यंत तसेच खासगी कंपन्यांतही नोकरी मिळू शकते. दहावीनंतर थेट पदविकेचे काही तोटेही आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांना आपल्याला नक्की कशात करिअर करायचे आहे, ते पक्के झाले नसेल त्यांनी अभियांत्रिकी पदविकेला प्रवेश घेतला तर नंतर त्यांच्या करिअरच्या इतर वाटा बंद होतात. अशा विद्यार्थ्यांनी बारावी पूर्ण करून नंतरच पुढील कारकीर्दीचा विचार करावा तसेच पदविकेच्या तिसऱ्या वर्षांला तुम्हाला सर्वोत्तम गुण मिळाले, तरच तुम्हाला पदवीच्या दुसऱ्या वर्षांत प्रवेश मिळू शकतो. अशा विद्यार्थ्यांसाठी मोजक्या जागा असतात आणि प्रवेशासाठी चुरसही मोठी असते.

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या अनेक वाटा
विज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि औषधनिर्माणशास्त्र यापलीकडेही अनेक संधी उपलब्ध आहेत. पशुवैद्यक हा अभ्यासक्रम सध्या दुर्लक्षित असला, तरी त्याला जागतिक स्तरावर आणि आपल्याकडेही उत्तम मागणी आहे. फिजिओथेरपी, स्पीच थेरपी आणि बी.एस्सी. नर्सिग हे तीनही अभ्यासक्रम मुलींसाठी उत्तम अभ्यासक्रम आहेत. नर्सिग केलेल्या मुलींना परदेशांतही उत्तम संधी मिळते.
महाराष्ट्रात सध्या अभियांत्रिकी शाखेतील
७० प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बहुसंख्य विद्यार्थी त्यातील केवळ मोजक्या शाखांकडेच वळताना दिसतात. मात्र, आज उत्तम मागणी असलेल्या आणि अशा विद्याशाखांचे दर्जेदार शिक्षण देणारी महाविद्यालये राज्यात असताना पेट्रोलियम अभियांत्रिकी, पर्यावरण अभियांत्रिकी, ऊर्जा अभियांत्रिकी, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी अशा शाखांचाही विद्यार्थी-पालकांनी विचार करायला हवा. मर्चन्ट नेव्ही हेदेखील एक साहसी करिअर विज्ञान शाखेतील मुलांकरता खुले आहे. या अभ्यासक्रमाचे शुल्क जास्त असले, तरी नंतर या नोकरीचे वेतनही तसेच भरभक्कम मिळते. वैमानिक होणे, ही अनेकांची महत्त्वाकांक्षा असते. त्यासाठी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह बारावी पूर्ण करणे अभ्यास विषय घेणे आवश्यक आहे. अनेक खासगी वैमानिक प्रशिक्षण संस्था यासंबंधीचे प्रशिक्षण देतात. त्यात रायबरेली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अ‍ॅकेडमी ही आघाडीची संस्था आहे. याचे शुल्क ३५ लाखांच्या घरात असले तरी नोकरीनंतर काही महिन्यांत शुल्कवसुली होईल इतके वेतन तुम्हाला मिळते.
अवकाश संशोधन क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो संस्थेत प्रशिक्षण घेता येईल. तेथील प्रवेशासाठी त्रिवेंद्रम येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी (आयआयएसटी) या संस्थेत प्रवेश मिळवणे योग्य ठरते. हा अभ्यासक्रम बारावीनंतर चार वर्षांचा असतो. मात्र, या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी जेईई मेन आणि बारावीचे गुण एकत्रितपणे ग्राह्य़ धरले जातात. विज्ञान शाखेत संशोधन करायचे असल्यास प्रशिक्षणाचे अनेक मार्ग खुले आहेत. ‘आयसर’ या संस्थांमध्ये पाच वर्षांचा संशोधन अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमात ५० टक्के जागा बारावीच्या गुणांवर भरल्या जातात. या अभ्यासक्रमाबरोबर ‘एनआयएसईआर’ संस्थेतही संशोधनासाठी अभ्यासक्रम आहेत. दहावीनंतर पुढील किमान दहा वर्षे शिकण्यात स्वारस्य आणि आर्थिक पाठबळ असलेल्या विद्यार्थ्यांना बायोटेक्नॉलॉजी या क्षेत्रात संशोधन करण्याचा पर्याय निवडता येईल. या क्षेत्रात एम.एस्सी. आणि पीएच.डी. या पदव्या प्राप्त करत पुढे संशोधन करता येऊ शकते.

विद्याशाखा कोणतीही असो..
तुम्ही कला-वाणिज्य-विज्ञान अशा कुठल्याही विद्याशाखेतून शिक्षण घेतले असेल तरीही करिअरचे अनेक पर्याय तुमच्यासाठी खुले होतात. यांत पुढील अभ्यासक्रमांचा समावेश होतो- विधि या क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी नॅशनल लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेऊ शकतात. त्यासाठी बारावीनंतर सीएलएटी ही परीक्षा द्यावी लागते. त्यानंतर देशातील विविध शहरांत असलेल्या या नॅशनल लॉ स्कूलमधून कायद्याचे शिक्षण घेऊन तुम्ही करिअरची वाट निवडू शकता. हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रालाही शाखेचे बंधन नाही. फक्त कितीही तास काम करण्याची तयारी आणि शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. कोणत्याही शाखेचा विद्यार्थी बारावीनंतर या अभ्याक्रमाला प्रवेश घेऊ शकतो. मात्र, त्याकरता राष्ट्रीय स्तरावरील सीईटी देणे बंधनकारक आहे. महाराष्ट्राच्या स्वतंत्र सीईटीत उत्तीर्ण झालात तर राज्यभरातील नामांकित संस्थांमधून हा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. त्याशिवाय हॉटेल मॅनेजमेंटचा तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रमही अनेक संस्थांमध्ये उपलब्ध आहे. चित्रकलेत गती असलेल्या आणि गणित उत्तम असलेल्या विद्यार्थ्यांना वास्तुशास्त्र या विषयातही करिअर घडवता येईल. त्यासाठी बारावीनंतर ‘नाटा’ ही परीक्षा द्यावी लागते. बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स या पदवीसाठीही प्रवेशपरीक्षेला सामोरे जावे लागते. हा पर्याय सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. डिझायनिंग या विषयात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. डिझायनिंगमध्येही इंटिरिअर, फॅशन, प्रॉडक्ट असे अनेक प्रकार आहेत. अहमदाबादची नॅशनल इन्स्टिटय़मूट ऑफ डिझायनिंग ही संस्था या अभ्यासक्रमासाठी सर्वोत्तम आहे. या संस्थेच्या प्रवेशासाठी बारावीनंतर प्रवेश परीक्षा द्यावी लागते. मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमांसाठी बारावीनंतर कवाडे खुली होतात. त्यासाठी विद्याशाखेची अट नाही. सर्व विद्याशाखांच्या पदवीधरांना यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन बोर्ड अशा विविध स्पर्धा परीक्षा देता येतात.
करिअर निवडीचा निर्णय जाणीवपूर्वक घ्या. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केवळ बारावीचे मार्क गरजेचे नाहीत, तर प्रवेश परीक्षेची तयारीही महत्त्वाची असते. सीईटी आणि बोर्ड परीक्षा यांचे अभ्यासाचे तंत्र वेगळे आहे, हे लक्षात घ्या. सीईटी परीक्षा घडय़ाळाच्या काटय़ावर चालणारी स्पर्धा असून पेपर पूर्ण करताना मुलांची दमछाक होते. करिअरचा कॅनव्हास खूप मोठा आहे, फक्त आपली क्षमता आणि आवड आपण ओळखायला हवी. करिअर म्हणजे फक्त पैसा नाही तर त्या क्षेत्रावर स्वत:चा ठसा उमटवणे आणि कामाचे समाधान प्राप्त होणे महत्त्वाचे असते. ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटातील एक संवाद सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवा. तो असा- ‘कामयाबी के पीछे मत भागो, काबील बनो. कामयाबी अपनेआप पिछे आएगी’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2015 12:05 am

Web Title: vivek velankar career guidance
Next Stories
1 तणावरहित वातावरण गरजेचे!
2 अंगभूत गुणांना झळाळी मिळो!
3 नवी संधी
Just Now!
X