अभिनयाची आवड आणि क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांनी, आपण या क्षेत्राकडे  करिअर म्हणून गांभीर्याने पाहतो का, आणि हे एक नियोजनबद्ध करिअर बनू शकते का, याचा विचार करायला हवा.
अ‍ॅरिस्टॉटलचं एक वाक्य आहे – ‘अ‍ॅन अ‍ॅक्टर नीडस् टु बी अ‍ॅन अ‍ॅथलीट फिलोसॉफर..’. अभिनेत्याचं जगणं कितीही स्पॉटलाइटसमोर आणि कॅमेऱ्यासमोर असलं तरी हे या वाक्यात सारं काही सामावलेलं आहे. काळ बदलला तरी या वाक्याची सत्यता मात्र अधिक गहिरी होत आहे. ज्यावेळी प्रेक्षागारात टाळ्यांचा आवाज घुमतो, थिएटरमधून बाहेर पडत असताना, रेड कार्पेटवरून चालताना आणि गाडीत बसेपर्यंत फ्लॅशच्या चमचमाटामधला ‘स्टार’ चेहरा आपला असावा, अशी आकांक्षा अभिनय क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकालाच असते, ही गोष्ट खरी. मात्र, हे क्षेत्र ज्यांना खुणावत आहे, त्यांनी आपण या करिअरकडे तितक्याच गांभीर्याने पाहतो का आणि हे एक नियोजनबद्ध करिअर बनू शकतं का, याचा विचार करायला हवा. जोपर्यंत हा विचार होत नाही, तोपर्यंत यासंबंधित सर्व गोष्टी या काठावर उभं राहून पोहणाऱ्यांकडे पाहणाऱ्यांसारख्याच भासतात.
अभिनय आणि जगणं, यात खरंच फरक असतो का, मुखवटे आणि चेहरे यांच्यामध्ये नेमकं किती अंतर असतं, त्याक्षणी अंगावर चढवणारी झूल खऱ्या अर्थाने अभिनेत्याचा कायापालट करते की तो निव्वळ परकाया प्रवेश असतो, या गोष्टी आज या क्षेत्रात पाऊल टाकू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने तपासून पाहण्याची वेळ आलेली आहे.
साहाय्यक दिग्दर्शकाने हाती धरलेल्या स्क्रिप्टच्या काही ओळी तेवढय़ा सीनपुरत्या पाठ करणं आणि दिलेल्या डायरेक्टर ऑफ फोटोग्राफीने (Dop) दिलेल्या मार्कवर उभं राहून त्या गोष्टी बोलणं इथपर्यंतच एखाद्या कलाकारासाठी अभिनयाची व्याख्या येऊन सीमित राहू नये, तर त्यापलीकडे पोहोचत एखाद्या गोष्टीचा, त्या क्षणाचा, त्या सीनचा आणि साकल्याने सिनेमा, नाटक – मालिका- त्या कलाकृतीचा विचार अभिनेत्याने करायला हवा. आपल्या व्यक्तिरेखेचा आलेख जोपर्यंत ती व्यक्ती समजून घेत नाही, तोपर्यंत कलाकार म्हणून त्या अभिनेत्याची अवस्था ही संभ्रमाची असते.
कलाकार हा महाभारतातल्या कर्णासारखाच असतो. येणाऱ्या प्रेक्षकाला मागेल ते दान देणारा, प्रसंगी आपली कवचकुंडलं देताना स्वत: रक्तबंबाळ होणारा आणि रुतलेलं चाक स्वबळावर बाहेर काढणारा!
सुपरस्टार अमिताभ बच्चन अभिनयाचे बादशाह दिलीपकुमार यांच्याबद्दल एकदा म्हणाले होते, ‘मी ज्यावेळी या व्यक्तीने साकारलेले एकेक सीन बघतो, त्यावेळी त्याने साकारलेल्या गोष्टींपलीकडे त्या सीनची कोणतीही शक्याशक्यता पोहोचतच नाही. दिलीपकुमार यांनी त्या व्यक्तिरेखेची देहबोली समजून साकारलेली व्यक्तिरेखा आणि सहकलाकाराला दिलेला तितकाच अवकाश कलाकृती जशी समृद्ध होत जाते, त्याला तोड नाही.
पडद्यावरचा सहज, स्वाभाविक अभिनय, प्रेक्षकांना पटणारी अभिनेत्याची कन्व्हिक्शन आणि कन्व्हिन्सिंगची क्षमता, कथाकार, पटकथाकार आणि दिग्दर्शकाला अभिप्रेत असलेला त्या व्यक्तिरेखेचा प्रवास या साऱ्या गोष्टी त्या अभिनेत्यासाठी विशिष्ट व्यक्तिरेखेचे डीएनए असतात. ती गुणसूत्रे आपल्यात आहेत का, हे रुपेरी पडद्यावर येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने तपासून पाहायला हवे.
एक्सलन्ससाठी झटत राहण्याचा झपाटलेपणा आणि सातत्य प्रत्येक सुपरस्टारकडे असतो. प्रत्येक बदलत्या साच्यात ते स्वत:ला बसवतात, हे या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. प्रत्येक कलाकार स्खलनशील असावा लागतो- ते रितेपण जर अभिनेत्याने जपलं नाही, तर तो दुसऱ्या भूमिकेत शिरू शकत नाही.
 सर्जनशीलता, प्रचंड ऊर्जा, जिवापाड मेहनत घेण्याची तयारी या गोष्टी असलेल्यांनीच अभिनय या क्षेत्राकडे वळायला हवे. अभिनयाच्या गुणवत्तेसोबत असलेल्यांची स्ट्रगल करण्याची तयारी आणि बव्हंशी उशिराने मिळणाऱ्या यशाची वाट पाहण्याची तयारी आणि सुरुवातीच्या दिवसांत आर्थिक चणचण सोसण्याचे बळ या साऱ्या गोष्टी उपयुक्त ठरतात.
शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्टय़ा थकवणारे आणि प्रत्येक क्षणाला तत्परतेचं भान आवश्यक ठरणारे असे हे करिअर आहे. जोखीम पत्करण्याची वृत्ती असलेल्या कलाकारांनीच या व्यवसायात उतरण्याचा विचार करावा. एका रात्रीत सुपरस्टार झालेल्यांची संख्या अगदीच नगण्य आहे, याचे भान राखत अवाजवी दिवास्वप्नांपासून मुलांनी सुरुवातीपासूनच दूर राहावे.
वलयाच्या पलीकडे अशा बऱ्याच गोष्टी असतात, ज्या या क्षेत्राकडे तटस्थपणे बघताना आपल्याला जाणवत नाहीत. पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांच्या छानछोकीच्या लाइफस्टाइलच्या पलीकडे शूटिंगच्या वेळेस रात्रंदिवस काम करण्याची, प्रसंगी अवघड, जिवावर बेतणारे सीन्स करण्याची तयारी आणि आजारपण विसरून कॅमेऱ्यापुढे उभे राहायला ठामपणा असतो. यामुळेच एखाद्या कलाकाराच्या वाटेला येणारी प्रसिद्धी, मानमरातब आणि धनसंचयाच्या मागे त्याचे कठोर परिश्रम असतात.
या क्षेत्राची आवड, कल आणि कौशल्य असल्याचे लक्षात आल्यानंतर आणि यातच आपल्याला करिअर करायचे आहे, हे पक्के झाल्यानंतर मुलांनी या नाटय़, चित्रपटविश्वाचा सखोल परिचय करून घ्यायला हवा. त्यासाठी नाटय़-चित्रपट विश्वाचा इतिहास जाणून घेणे, देशभरातील प्रादेशिक स्तरावरील विविध नाटय़ चळवळींचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. या क्षेत्रातील चालू घडामोडींचे आकलनही महत्त्वाचे आहे. यासंबंधी विविध संदर्भसाहित्य तुम्हाला देशभरातील उत्तम ग्रंथालयांमध्ये मिळू शकेल. ग्रंथांसोबतच या विषयावरील विविध कार्यशाळा, परिसंवादांना उपस्थित राहून या क्षेत्रातील दिग्गजांचे विचार समजून घेणेही आवश्यक ठरते.
आपली उडी कुठवर, याचा सम्यक विचार अभिनय क्षेत्रातील उमेदवारीच्या काळातच मुलांनी करायला हवा.  शाळा-महाविद्यालयातील विविध नाटय़विषयक ग्रुपमध्ये त्यांनी सहभागी व्हायला हवे. त्यात पडेल ते काम करण्याची वृत्ती हवी. सुरुवातीला एखादी भूमिका मिळेलच असे नाही. मात्र, पडद्यामागील कामातील सहभाग हा तुमच्यातील कलावंताला अधिक समृद्ध करतो, यावर तुमचा विश्वास असायला हवा. सांघिक वृत्ती, चपखलपणा, अभिनय करणाऱ्या कलावंतांना न्याहाळण्याची, त्यांच्या कामातून नवं काही शिकण्याची संधी तुम्हाला लाभते. कित्येक बडय़ा कलावंतांची कारकीर्द अशा पद्धतीची पडद्यामागील कामे करत सुरू झाली होती, हे लक्षात घ्यायला हवे.
आज सुदैवाने अभिनय क्षेत्रात करिअर होऊ शकते, अशी परिस्थिती भोवताली दिसून येते. दृक् माध्यमाचा वाढता प्रभाव अनेक छोटय़ा-मोठय़ा संधी उमेदवारी करणाऱ्या मुलांना उपलब्ध करून देतो. छोटय़ा पडद्यावरील डेली सोप्स, विविध रिअ‍ॅलिटी शोज आणि स्पर्धा मुलांना आपली अभिनय क्षमता आणि गुणवत्ता अधोरेखित करण्याची संधी प्रदान करतो. अशा छोटय़ा-मोठय़ा संधींकडे पाठ न फिरवता त्यांनी याकडे भविष्यातील करिअरची किलकिली झालेली खिडकी म्हणून पाहायला हवे. एखाद्या सार्वजनिक ठिकाणचा तुमचा लहानसा परफॉर्मन्सही तुम्हाला कुठल्या कुठे पोहोचवू शकतो.
अभिनय व त्यासंबंधित इतर घटकांचे प्रशिक्षण देणारे अनेक अभ्यासक्रम आज राज्यातील विविध ठिकाणी उपलब्ध आहेत. अनेक विद्यापीठांमध्येही यासंबंधीचे प्रशिक्षण देणारा स्वतंत्र विभाग अस्तित्वात आहे. अशा वेळी स्टार बनवण्याच्या भूलथापा देत, अव्वाच्या सव्वा शुल्क आकारणाऱ्या प्रशिक्षण संस्थांपासून विद्यार्थ्यांनी कटाक्षाने दूर राहायला हवे. प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित अभ्यासक्रमाची इत्थंभूत माहिती करून घेणे अत्यावश्यक ठरते. त्या संस्थेत शिकणाऱ्या वरच्या वर्गातील मुलांशी चर्चा करणे निर्णय घेताना उपयुक्त ठरू शकते.
आज व्यक्तिगत अभिनय क्षमतेसोबतच तंत्र अवगत करणे तितकेच आवश्यक आहे. नाटय़, चित्रपटासंबंधित तंत्राचे बारकावे समजून घेणे अभिनेत्याला समृद्ध करणारे ठरते आणि त्याच्या करिअरचा आलेखही उंचावणारे ठरते.
ग्रीक तत्त्ववेत्ता हेराक्लिटस ज्या पद्धतीने म्हणतो, ‘एकाच नदीत दोनदा पाय घालता येत नाही. पहिल्यांदा ज्या पाण्यात पाय टाकला, ते पाणी आपण पुन्हा पाय पाण्यात घालेपर्यंत कधीच वाहून गेलेलं असतं.’ हे वाक्य अभिनेत्याला आणि अभिनेत्याच्या करिअर प्रवासाला लागू होणारं वाक्य आहे. हा विचार करूनच अभिनयाच्या क्षेत्रात उतरावं मग भट्टी जमायला वेळ लागत नाही.
career.vruttant@expressindia.com