करिअर मंत्र

चौकीमध्ये साहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर भेटू शकतील.

डॉ. श्रीराम गीत

मला पोलीस खात्यात जायचे आहे. मी सध्या एसवाय बीकॉमला आहे. मी सुरुवात कुठून करू?

गौरव जाधव

पोलीस खात्यात का जायचे आहे, यावर किमान महिनाभर विचार कर. कॉन्स्टेबल तुला सहज भेटतील, ट्रॅफिक पोलीस चौकाचौकात सापडतील. चौकीमध्ये साहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर भेटू शकतील. तुझ्या जिल्ह्य़ामध्ये असलेला आयपीएस अधिकारी बहुधा तुला भेटू शकणार नाही किंवा भेटणे शक्य होणार नाही. या प्रत्येकाशी बोलून तू तुझा विचार पक्का करावास.  आयपीएस होण्यासाठी अत्यंत कठीण अशी यूपीएससीची परीक्षा द्यावी लागते. डीवायएसपीसाठी खूप स्पर्धा असलेली एमपीएससी द्यावी लागते. तर सबइन्स्पेक्टरसाठी वेगळीच परीक्षा देऊन बीकॉमनंतर अधिकारी बनणे शक्य असते. अन्य पदांसाठी भरतीची प्रक्रिया असते. नुकत्याच झालेल्या भरतीचे फोटो पाहिले असतील, बातम्या वाचलेल्या असतील. त्यामुळे त्याचा अंदाज येणे अपेक्षित आहे.

शारीरिक क्षमता, कायद्याचे किमान ज्ञान याची प्रत्येक पातळीवर जोड आवश्यक असते. तुझ्या प्रश्नातील ‘सुरुवात कुठून करू?’ या भागाला अनुसरून दिलेले हे उत्तर आहे. तांत्रिकदृष्टय़ा याचा विचार नको.

मी इयत्ता दहावीमध्ये शिकतो. मला आवाजाशी संबंधित अभ्यासक्रमांची माहिती द्यावी. तसेच साँग रायटिंग व डिस्क जॉकी या क्षेत्रांची व संबंधित अभ्यासक्रमांची माहिती द्यावी.

हेरंब पाटील

चांगल्या कविता, गाजलेली गाणी, सोप्या भाषेतील गेय, गाणी व चटपटीत रॅप गाणी अशा विविध गाण्यांचा अर्थ कळणे, तितपत हिंदी व मराठी येणे हे जमवणे गरजेचे. साँग रायटिंगसाठी याची गरज आहे.

आवाजाशी संबंधित अभ्यासक्रम असे नसते. बारावी सायन्सनंतर साऊंड रेकॉर्डिग असते. डबिंगसाठी आवाज देणे ही कला आहे. नकला करून दुसऱ्याचा आवाज काढणे, यातूनच त्याची सुरुवात आहे. अभ्यासक्रमामधून नाही. खासगी क्लासेसमध्ये यासंबंधित अनेक लहानसहान अभ्यासक्रम असतात. परंतु तेथे पूर्ण खात्री करून मगच प्रवेश घ्यावा. डिस्क जॉकी सहसा अनुभवातून शिकत जातो किंवा उमेदवारीतून. त्याला शिक्षणाशी, पदवीशी फारसा संबंध नाही.

आपण सध्या दहावीवर लक्ष द्यावेस. बारावीत दहावीचे मार्क टिकवा. त्यानंतरच्या या साऱ्या गोष्टी छंदामधून सुरू होतात. हजारातून एखादा त्याचे रूपांतर करिअरमध्ये करण्यात यशस्वी होतो. त्यासाठी शुभेच्छा.

मला बीएमध्ये ३७.५३ मार्क आहेत. मला लॉची प्रवेशपरीक्षा देऊन तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकेल का?

डी. कुमार आणि दुबेश भैसारे

प्रवेश मिळू शकेल पण अभ्यास झेपेल काय, हा खरा प्रश्न आहे. सहसा पन्नास टक्क्य़ांच्या आतील पदवीधरांच्या बाबतीत त्यांचे वाचन, लेखन व त्यानंतर होणारे आकलन यात कुठेतरी कमी जाणवते. वाचनाचा वेग, त्यातून झालेले आकलन यावर नीट विचार करावा. आपल्याला समजलेली गोष्ट स्वत:च्या शब्दात व्यक्त करता येणे हा त्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा असतो. विशेषत: कायद्यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये. तोच जर जमला नाही तर निव्वळ पदवी घेणे वा पास होणे इतकेच उरते. त्यामुळे या गोष्टींवर नीट विचार करावात. वाटल्यास वर्षभर प्रयत्नपूर्वक या साऱ्यामध्ये सुधारणा करावी. पुढच्या वर्षी प्रवेश घेतला तरी फारसे बिघडणार नाही, हे नक्की. कायद्याचा अभ्यासक्रम व परीक्षा इंग्रजी भाषेतून असते, याचीही नोंद घेणे गरजेचे आहे.

विद्यार्थी मित्र, मैत्रिणींनो, करिअर मंत्र या सदरासाठीचा  ई-मेल आयडी आता बदललेला आहे. यापुढे आपले प्रश्न  career.mantra@expressindia.com येथे पाठवावेत. प्रश्नामध्ये आपली शैक्षणिक पात्रता जरूर नमूद करावी.  त्यामुळे  उत्तरामध्ये अधिक स्पष्टता आणता येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Career guidance

ताज्या बातम्या