इंटिरियर डिझायनरने नवं डिझाइन करून आणलं होतं दाखवायला. आधी अपर्णा आणि अशोक दोघांच्या कन्सल्टिंग रूम्स एकमेकांना जोडून होत्या. आता जागा कमी पडते म्हणून अपर्णाच्या रूममधून थोडी जागा काढून आणखी एक छोटी स्टोअर रूम काढली होती. थोडक्यात अपर्णाची रूम आता थोडी लहान झाली होती. अशोकनं सगळं डिझाइन नीट पाहून घेतलं आणि मग काम सुरू करायची परवानगी दिली.
या दोघांचं औरंगाबादमध्ये एक छोटं पेडिअॅट्रिक हॉस्पिटल होतं. अपर्णा जनरल प्रॅक्टिशनर होती. ती रोज ११ ते १ या वेळात जमेल तसे रुग्ण तपासायची. अशोक स्वत:ची प्रॅक्टिस सांभाळत हॉस्पिटलचं व्यवस्थापनही पाहायचा. तो सकाळी जायचा ते रात्री उशिरा घरी यायचा. रोहित झाल्यापासून गेली दहा र्वष त्यांचं हेच वेळापत्रक होतं. हॉस्पिटल स्थिरस्थावर झाल्याशिवाय मूल होऊ द्यायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं. अपर्णाला रोहितला पूर्ण वेळ देता यावा, असं फार मनापासून वाटायचं. रोहित आता पाचवीत होता. अपर्णानं आपला सगळा दिवस त्याच्या वेळापत्रकानुसार आखून घेतला होता. त्यामुळे रोहित दीड वाजता शाळेतून घरी येईपर्यंत ती धावतपळत घर गाठायचीच. अशोकच्या आई घरी असायच्या. पण तरीही मुलाबरोबर दुपारचं जेवता यावं म्हणून अपर्णा सगळ्या तारेवरच्या कसरती करायची.
रोहितचे क्लासेस, स्पर्धा, परीक्षा अभ्यास या सगळ्याला वेळ देता यावा म्हणून अपर्णानं संध्याकाळची प्रॅक्टिस कधीचीच बंद केली होती. अशोकला मात्र वाटायचं, रोहितला क्लासेसना मदतनीस बाई सोडू शकतात, जवळच्या ठिकाणी तो स्वत: चालत जाऊ शकतो. अपर्णानं संध्याकाळी थोडा वेळ तरी क्लिनिकला यावं निदान व्यवस्थापनाच्या चार गोष्टी, हिशेब वगैरे पाहावं. पण ‘हे दिवस परत येणार नाहीत’ असं सांगून ती विषय संपवायची.
हॉस्पिटलचं काम चालू असताना दुसऱ्या तात्पुरत्या जागेतून रुग्ण तपासणी करणं सुरू होतं. अपर्णा एकदा काम कुठपर्यंत आलंय पाहायला मूळ ठिकाणी आली आणि चक्रावूनच गेली. तिची रूम लहान झाल्याचं तिच्या लक्षात आलं. अशोकनं तिला याबद्दल काही सांगितलंही नाही याचं तिला आणखी वाईट वाटलं.
रात्री मग तिनं अशोककडं विषय काढला.
‘‘अशोक माझी रूम लहान झालीय का नव्या डिझाइनमध्ये?’’
‘‘हो. तुला दाखवलं होतं की मी. तू म्हणालीस, कर तुला योग्य वाटेल ते.’’
‘‘किती काय मॅनेज करत होते मी तेंव्हा, रोहितची परीक्षा, स्कॉलरशिप, बुद्धिबळाची स्पर्धा.’’
‘‘हं. जास्तीची स्टोअर रूम तुझ्या कन्सल्टिंग रूममधून काढू या का?’’, यावर तू हो म्हणाली होतीस.
‘‘पण म्हणून गडबडीत माझी रूम लहान होते आहे, हे नव्हतं लक्षात आलं माझ्या.’’ अपर्णा आता चिडली होती.
अशोकही शांतपणे म्हणाला, ‘‘तुझ्या दोन तासांव्यतिरिक्त ती जागा फुकट जाते आहे असं मला वाटतं.’’
‘‘अशोक मला नाही आवडलं हे बोलणं. फुकट जाते म्हणजे काय? इतर जबाबदाऱ्या सांभाळायच्या असल्या तर मी तेवढाच वेळ देऊ शकते हॉस्पिटलला.’’
‘‘हो ना. मी कुठे काय म्हणतोय. पण दोन तास सोडून ती जागा वापरलीच जात नाहीय.’’
‘‘अशोक मला तू इतका धंदेवाईक विचार करतोयस हे खटकतंय.’’
‘‘अपर्णा आपल्याकडच्या जागेच्या मारामारीची तुला किती कल्पना आहे?’’
‘‘असेल जागा कमी पडत, पण म्हणून लगेच माझी खोली लहान करायची?’’
‘‘तुला दु:ख नेमकं कशाचं होतंय सांगू, तुझी किंमत कमी झाल्यासारखी वाटतेय तुला.’’
आता मात्र अपर्णाचे डोळे वाहू लागले. ‘‘हो. म्हणजे मी घरच्या इतर जबाबदाऱ्या सांभाळते त्याची हीच किंमत?’’
‘‘घरच्या जबाबदाऱ्या, रोहितला किती वेळ द्यावा, याबाबत आपले विचार थोडे वेगळे असतील, पण त्यावरून मी तुझी अवहेलना केलीय का?’’
‘‘पण मग त्याचा आदरही तू नाही करत आहेस.’’
‘‘एक मिनिट. आदर करायचा म्हणजे तुझ्या नावानं एवढी जागा दिवसभर मोकळी ठेवायची? याला काहीच अर्थ नाही. तू घरच्या गोष्टी सांभाळतेस, त्यासाठी तू आई-बाबांना कुठेही गृहीत धरत नाहीस, त्याबद्दल तुझं कौतुक आहे, आदरही वाटतो. पण डॉक्टर म्हणून मी तुझा फालतू आदर नाही करणार. दुसऱ्यांनी आपला आदर करायला हवा असेल, तर आधी स्वत: स्वत:चा आदर करायला शिकणं गरजेचं आहे. डॉक्टर म्हणून मान हवा असेल, तर त्यासाठी तुला हॉस्पिटलमध्ये वेळ द्यावा लागेल. मी कधीही तुला घरचं सगळं स्वत: पाहा, रोहितची शाळेत, सगळीकडे स्वत:च ने-आण कर, पाळणाघरात ठेवू नको, आईवर काही पडू देऊ नकोस, असा कुठलाही आग्रह धरला नाही. ही तू तुझी गरज बनवून ठेवली आहेस. रोहितला ही या वयाला काही गोष्टी स्वत:च्या स्वत: जमायला हव्यात. मलाही प्रॅक्टिस आणि बाकी व्यवस्थापनाचा खूप ताण येतो. तू हॉस्पटलमध्ये हवीस असं वाटतं. पण रोहितचे क्लासेस, त्याचं वेळापत्रक तुला जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि मग तुझी जागा मोकळी ठेवायची, हॉस्पिटलमध्ये सगळ्यांनी तुला डॉक्टर म्हणून आदरानं वागवायचं, हे कसं होणार?’’
अपर्णाला तिच्या वर्मावर बोट ठेवल्यागत झालं. रडू तर येत होतं पण अशोकचं चुकतंय असंही वाटत नव्हतं. कुठे तरी दोन्हीकडचा तोल सांभाळायचा याचा नव्यानं विचार करणं गरजेचं होतं.
मिलिंद पळसुले palsule.milind@gmail.com