प्रत्येक उमेदवाराने आपली शैक्षणिक पाश्र्वभूमी, नियोजित अभ्यासक्रमामधील दिलेल्या घटकांची तयारीची आणि सरावाची पातळी, तसेच एकंदर सीसॅटच्या पेपरविषयी वाटणारा आत्मविश्वास या सगळ्याची सांगड घालत परीक्षेला गेल्यानंतर नियोजित दोन तास कसे वापरावेत याचा निर्णय घेणे आवश्यक आहे. मात्र काही प्रकारचे नियोजन अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने लागू करता येते आणि फायद्याचे ठरते असे लक्षात आले आहे. अशा नियोजनाचा एक मसुदा इथे देत आहे. ते नियोजन आपल्यासाठी तसेच्या तसे उपयोगी येते किंवा त्यात काही फेरफाराची गरज आहे का, याचा निर्णय उमेदवार थोडय़ा सरावानंतर घेऊ शकतात.
मागील लेखात म्हटल्याप्रमाणे,
१) उताऱ्याचे आकलन व त्यावरील प्रश्न (reading comprehension)
२) मूलभूत संख्याज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी (basic numeracy and mental ability)
३) विश्लेषणात्मक आणि अनुमानात्मक कौशल्ये (logical reasoning and analytical ability)
हे तीन घटक आणि दोन तास याचा मेळ खालील प्रकारे घालता येऊ शकतो. कोणत्याही परिस्थितीत सर्व ८० प्रश्न सोडवायची वेळ न येऊ देणे तसेच प्रश्न आपल्या आधी ठरलेल्या प्राधान्यक्रमानुसार ‘निवडून’च सोडवायचे आहेत याची खूणगाठ बांधून पुढील वेळेच्या नियोजनाचा विचार करावा.
वेळेचे प्रत्येकी एक तास अशा दोन तुकडय़ांमध्ये नियोजन करावे तर प्रश्न प्रकारांचे नियोजन आपल्याला अपेक्षित असलेल्या अचूकतेवर ठरवावे. म्हणजेच वरील तीन घटकांपकी कोणत्या प्रश्न प्रकाराचा आपला सराव उत्तम आहे, तसेच प्रश्नाचे उत्तर बरोबर येण्याची शक्यता (अचूकता) जास्त आहे याचा सर्वात आधी विचार करावा. साधारणत: असे दिसून येते की, उताऱ्याच्या आकलनावर आधारित प्रश्नांबद्दल आणि उत्तरांबद्दल जास्त अनिश्चितता वाटते. या घटकाचा खूप सराव जरी झालेला असला तरी, प्रत्यक्ष पेपर सोडवीत असताना अनेकदा उत्तराबद्दल खात्री वाटत नाही. या घटकाने पेपर सोडवण्यास सुरुवात केल्यास पहिल्या काही मिनिटांतच आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो.
निर्धारित दोन तासांचा वेळ सुरू झाल्या-झाल्या, पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत पेपरवर एकदा नजर टाकावी आणि साधारण काठिण्यपातळीचा अंदाज घ्यावा. यासाठी ७-८ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागता कामा नये. यातून पुढील दोन तासांचे नियोजन कसे असावे याची एक व्यूहनीती आपोआप तयार होते. हा वेळ एकंदर प्रश्नपत्रिकेचा अंदाज घेण्यासाठी उपयोगी ठरतो व तो तसा घालवणे टाळू नये. एकाच प्रश्नपत्रिकेचे अ, इ, उ, ऊ असे संच बनून येतात. एकंदर परिस्थितीचा अंदाज न घेता सोडवायला सुरुवात केल्यास नेमकेच अवघड प्रश्न सुरुवातीला असल्यास गरजेपेक्षा जास्त दडपण येऊन त्याचा परिणाम कामगिरीवर होऊ शकतो. पहिल्या तासातील उरलेल्या ५० मिनिटांच्या वेळात साधारणत: २०-२५ प्रश्न सोडवून घ्यावेत. हे प्रश्न शक्यतो गणित आणि ताíकक अनुमान यासंबंधी घटकांचे असावेत. हे प्रश्न सोडवीत असताना आपले उत्तर बरोबर आहे का नाही याचा सोडवतानाच आपल्याला पूर्ण अंदाज असतो आणि अचूक पद्धतीने बरेचसे प्रश्न पहिल्या तासात सोडवल्याने पुरेसे गुण तर मिळतातच परंतु अशा परीक्षेसाठी आवश्यक असणारा आत्मविश्वासही मिळतो. मात्र, हे २०-२५ प्रश्न असे निवडावेत की जे आपण कमीत कमी वेळात आणि अचूक सोडवू शकू. आवश्यक ६६ गुणांपकी अध्र्यापेक्षा अधिक गुणांची तजवीज इथेच करता येणे शक्य आहे.
दुसरा तास सुरू झाल्या-झाल्या उताऱ्यांवरील प्रश्नांकडे वळावे. पुढील ४५ मिनिटांत, उताऱ्यांवर आधारित, चांगले जमू शकणारे, अचूकतेबद्दल बऱ्यापकी खात्रीदायक वाटणारे १८-२० प्रश्न सोडवावेत. जे उताऱ्याचे विषय आपल्याला रंजक वाटतात, ज्या विषयांची आपल्याला प्राथमिक माहिती आहे, असे विषय आधी निवडावेत. याउलट, जे विषय आपल्याला बोजड आणि कंटाळवाणे वाटतात, ते विषय सर्वात शेवटी वाचावेत अथवा ते वाचण्याचे पूर्ण टाळावे. उताऱ्यावरील प्रश्न नंतरच्या एका तासात सोडवण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे, वरील म्हटल्याप्रमाणे काही गुणांची आणि आत्मविश्वासाची कमाई पहिल्या तासात झालेली असल्याने, त्या परिस्थितीचा फायदा उताऱ्यावरील प्रश्नांची कामगिरी सुधारण्यात होताना दिसतो. उताऱ्यावरील प्रश्नदेखील निवडून सोडवावेत.
संपूर्ण १२० मिनिटांचे म्हणजे अगदी मिनिटा-मिनिटाचे नियोजन करणे शक्यतो टाळावे. प्रश्न पुन:पुन्हा वाचण्यामध्ये, उत्तरे नोंदवण्यामध्येदेखील बराच वेळ जातो. म्हणून नियोजन हे कायम १ तास ४० मिनिटांचे असावे. तरच इतर सर्व बाबींबरोबरच आवश्यक ६६ गुण सोडवण्यासाठी पुरेसा अवधी मिळू शकतो.
सीसॅट आणि त्यासारख्याच इतर स्पर्धा परीक्षांबद्दलचे एकंदर निरीक्षण केल्यास, असे लक्षात येते की, अभ्यासक्रमाच्या पक्क्या तयारीबरोबरच, किंबहुना कधी-कधी त्याहून जास्त महत्त्व परीक्षेची मागणी आणि परीक्षातंत्र समजून घेण्यास असते. म्हणूनच अभ्यासाच्या मौल्यवान वेळातून वेळ काढून याही घटकांचा विचार केला जाणे अत्यंत गरजेचे ठरते.