साहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षा
विद्यार्थी मित्रानो, येत्या १६ जुलला साहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या तीनही पदांसाठी एकूण १००८ जागांकरिता संयुक्त पूर्व परीक्षा आहे. गेल्या चार वर्षांमध्ये इतक्या मोठय़ा प्रमाणातील जागांसाठी आलेली ही पहिलीच जाहिरात आहे.
या सुवर्णसंधीचा योग्य वापर करून घेण्यासाठी तुम्ही अगदी कंबर कसून अभ्यासाला सुरुवात केलीच असेल, तुमच्या याच अभ्यासाच्या उत्साहाला प्रोत्साहित करण्यासाठी आपण या लेखमालेतून परीक्षेचे स्वरूप, अभ्यासाची रणनीती, ठरविलेल्या रणनीतीची अंमलबजावणी करताना घ्यावी लागणारी खबरदारी आणि अभ्यासस्रोत यासंदर्भात सविस्तर ऊहापोह करणार आहोत. आज आपण या संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेचे स्वरूप आणि निवडपद्धतीबाबत पाहू या.
* पूर्व परीक्षेचे स्वरूप
या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातात व प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतात. भरायच्या एकूण पदांच्या सुमारे आठ पट उमेदवार मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र होतील अशा रीतीने प्रथम टप्प्यात गुणांची सीमारेषा निश्चित करण्यात येते. या सीमारेषेच्या वर ज्या विद्यार्थ्यांचे एकूण गुण असतील त्यांना मुख्य परीक्षेसाठी प्रवेश मिळतो.
* मुख्य परीक्षेचे स्वरूप
एकूण दोनशे गुणांसाठी होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या दोन प्रश्नपत्रिका असतात.
मुख्य परीक्षेचा मराठी व इंग्रजीचा अभ्यासक्रम या तीनही परीक्षांसाठी समान आहे तर सामान्य अध्ययन व बुद्धिमापन या विषयाचा ७० % अभ्यासक्रम या तीनही परीक्षांसाठी समान आहे आणि उर्वरित ३० % अभ्यासक्रम प्रत्येक परीक्षेत संबंधित पदाच्या मागणीनुसार वेगळा आहे. पूर्व परीक्षा जरी या तीनही पदांसाठी एकत्र घेतली जात असली तरी मुख्य परीक्षा मात्र वेगवेगळी घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातात. तसेच प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतात. मुख्य परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे साहाय्यक कक्ष अधिकारी व विक्रीकर निरीक्षक पदाची अंतिम यादी तयार करण्यात येते आणि पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्र पडताळणीनंतर उमेदवारांची शिफारस केली जाते. तर पोलीस उपनिरीक्षकपदासाठी मात्र मुख्य परीक्षेनंतर शारीरिक चाचणी ५० गुणांची घेतली जाते व मुख्य परीक्षेतील प्राप्त गुण आणि शारीरिक चाचणीतील गुण एकत्रित करून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते.
शतमत पद्धती
लेखी परीक्षेमधून शिफारसपात्र होण्याकरिता शतमत (Percentile) पद्धती लागू केली जाते. या पद्धतीनुसार परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या उमेदवाराचे एकूण गुण म्हणजे १०० शतमत मानून त्या प्रमाणात इतरांचे शतमत गुण निश्चित केले जातात.
उदा. सरिताला पेपर एकमध्ये एकूण ७० गुण प्राप्त झाले आहेत आणि हे गुण या पेपरमधील सर्वाधिक गुण आहेत, तर धनश्रीला या पेपरमध्ये ६३ गुण प्राप्त झाले आहेत. या परिस्थितीत सरिताचे गुण = १०० शतमत गुण होतील आणि
धनश्रीचे गुण = ६३ x १००
— – ———- = ९० शतमत गुण होतील.
७०
याप्रमाणे शिफारसपात्र ठरण्यासाठी अमागास वर्गातील उमेदवारांना किमान ३५ शतमत तर मागासवर्गीयांना किमान ३० शतमत, विकलांगांना व अत्युच्च गुणवत्ताधारक पात्र खेळाडूंना किमान २० शतमत गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे.
पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी नक्की कोणता अभ्यासस्रोत वापरायचा व कसा वापरायचा याबद्दल आपण पुढील लेखांमधून सविस्तर आढावा घेऊ या तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून आयोगाच्या अपेक्षा जाणून घेण्याच्या कामाला लागा…शुभेच्छा !!!