कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अकॅडमी ऑफ साइंटिफिक अ‍ॅण्ड इनोव्हेटिव्ह रिसर्च- चेन्नई येथे विज्ञान आणि अभियांत्रिकी विषयांमध्ये २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात खाली नमूद केल्याप्रमाणे संशोधनपर पीएचडी करण्याची संधी उपलब्ध आहे-

विज्ञान विषयातील संशोधनपर पीएचडी- या योजनेअंतर्गत संशोधनपर पीएचडी करण्यासाठी उपलब्ध विषयांमध्ये बायोलॉजिकल सायन्सेस, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित व माहिती तंत्रज्ञान यांसारख्या विषयांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.अभियांत्रिकी विषयातील संशोधनपर पीएचडी- या योजनेअंतर्गत प्रामुख्याने तंत्रज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

विशेष सूचना- वरीलप्रमाणे नमूद केल्याप्रमाणे असणाऱ्या संशोधनपर पीएचडीशिवाय संस्थेअंतर्गत म्हैसूरच्या केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेद्वारा संचालित अन्न तंत्रज्ञान विषयातील एमएससी- पदव्युत्तर पदवी व पौष्टिक खाद्यान्न विषयातील संशोधनपर पीएचडी या अभ्यासक्रमांमध्ये पण प्रवेश उपलब्ध आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता- संशोधनपर पीएचडी करण्यासाठी अर्जदार विद्यार्थ्यांनी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा व त्यांना संबंधित विषयांतर्गत संशोधनपर कामामध्ये रुची असायला हवी.

निवड पद्धती- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची लेखी निवड परीक्षा घेण्यात येईल. या निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना अकादमी ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इनोव्हेटिव्ह रिसर्च, चेन्नईतर्फे मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची संबंधित विषयात संशोधनपर पीएचडी करण्यासाठी नोंदणी करण्यात येईल.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- वरील अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी अकादमी ऑफ साइंटिफिक अ‍ॅण्ड इनोव्हेटिव्ह रिसर्चच्या http://acsir.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०१७ आहे.