प्रश्नवेध यूपीएससी : अठराव्या शतकातील घडामोडी

सामान्य अध्ययन पेपर पहिला – आधुनिक भारत

श्रीकांत जाधव

मुख्य परीक्षा

सामान्य अध्ययन पेपर पहिला – आधुनिक भारत

आजच्या लेखामध्ये आधुनिक भारत या शीर्षकांतर्गत येणाऱ्या अठराव्या शतकाच्या मध्यापासून ते १८५७च्या उठावापर्यंतच्या कालखंडावर यूपीएससी मुख्य परीक्षेत २०१३ ते २०१८ दरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.

* ‘In many ways, Lord Dalhousie was the founder of modern India.’ Elaborate.

‘वेगवेगळ्या पद्धतीने लॉर्ड डलहौसीने आधुनिक भारताचा पाया रचला’. विस्तार करा. (२०१३, १० गुण आणि २०० शब्दमर्यादा)

या प्रश्नाचे आकलन करताना आपल्याला लॉर्ड डलहौसीने राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कोणत्या पद्धतीची कामगिरी केलेली होती याचा दाखला द्यावा लागतो. सोबतच त्याने आधुनिक भारताचा पाया कसा रचला याचे कारणमीमांसेसह उत्तर लिहावे लागते. यामुळे उत्तर अधिक मुद्देसूद्द, समर्पक आणि प्रश्नाचा योग्य आशय प्रमाणित करू शकेल.

* The third battle of Panipat was fought in 1761. Why were so many empire-shaking battles fought at Panipat? 

१७६१मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. अनेक साम्राज्यांना धक्का देणाऱ्या लढाया पानिपतलाच का झाल्या?’ (२०१४, १० गुण आणि १५० शब्दमर्यादा).

हा प्रश्न एका विशिष्ट ठिकाणाचा संदर्भ देऊन विचारण्यात आलेला आहे. याचे आकलन करताना आपल्याला १५२६मध्ये झालेल्या पानिपतच्या पहिल्या लढाईचा संदर्भ लक्षात घेऊन हे स्थान व्यूहात्मकदृष्टय़ा कसे महत्त्वाचे होते या अनुषंगाने उत्तर लिहावे लागते. हा प्रश्न परीक्षार्थीचे विषयाचे ज्ञान व समज कशी आहे याची कस लावणारा आहे.

* Examine critically the various facets of economic policies of the British in India from mid-eighteenth century till independence.

ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाचे १८ व्या शतकाच्या मध्यापासून ते स्वातंत्र्यापर्यंतच्या विविध पलूंचे समीक्षात्मक विश्लेषण करा.

(२०१४, १० गुण आणि १५० शब्दमर्यादा).

या प्रश्नाचे आकलन करताना आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. ती म्हणजे ब्रिटिश ध्येयधोरणे ही ब्रिटिश साम्राज्यवादाला कशा प्रकारे पूरक होती आणि याचा जास्तीतजास्त फायदा व्यापरासाठी कसा होईल हा मूलभूत विचार ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाच्या रणनीतीचा भाग होता. आता यानुसार काळानुरूप

ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाच्या रणनीतीमध्ये कोणते बदल करण्यात आले, याचा उदाहरणासह परामर्श उत्तरामध्ये देणे अपेक्षित आहे.

* Explain how the upraising of 1857 constitutes an important watershed in the evolution of British policies towards colonial India.

स्पष्ट करा की १८५७चा उठाव हा वसाहतिक भारतातील ब्रिटिश धोरणांच्या विकासातील महत्त्वाची घटना होती’. (२०१६, १२.५ गुण आणि २०० शब्दमर्यादा).

या प्रश्नाचे योग्य आकलन होण्यासाठी कंपनी काळातील ब्रिटिश धोरणांची मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे. त्याशिवाय हा प्रश्न योग्य पद्धतीने लिहिता येत नाही. कारण १८५७च्या उठावानंतर जे काही बदल करण्यात आलेले होते, त्याला कंपनी काळात राबविण्यात आलेली ब्रिटिश धोरणे कारणीभूत होती. उत्तर लिहिताना या धोरणाचा दाखला देऊनच उत्तर लिहावे लागते व १८५७च्या उठावाचे महत्त्व नमूद करावे लागते.

* Clarify how mid-eighteenth century India was beset with the spectre of a fragmented polity. 

स्पष्ट करा की १८व्या शतकाच्या मध्यातील भारतातील राजकीय व्यवस्था विखंडित छायेने कशा प्रकारे घेरलेली होती. (२०१७, १० गुण आणि १५० शब्दमर्यादा)

या प्रश्नाचे योग्य आकलन होण्यासाठी १८व्या शतकातील राजकीय सत्ता समीकरणे कशी होती याची माहिती असणे गरजेचे आहे. १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झालेला होता आणि येथून पुढे मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाची सुरुवात झाली होती. मुघल साम्राज्यात कार्यरत असणाऱ्या सुभेदारांनी स्वत:च्या स्वायत्त सत्ता बंगाल, हैदराबाद आणि अवध या प्रांतांमध्ये स्थापन केलेल्या होत्या. याचबरोबर पेशव्यांच्या अधिपत्याखाली मराठा सत्तेचे पुनरुज्जीवन झालेले होते आणि एक प्रबळ राजकीय सत्ता म्हणून तिचा उदय झालेला होता. दक्षिणेत मसूर हैदर अलीच्या नेतृत्वाखाली राजकीय सत्ता बनलेली होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने स्वत:ला राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून प्रस्थापित करण्यास प्रारंभ केलेला होता. इत्यादी महत्त्वाच्या घडामोडींचा उत्तरामध्ये दाखला देऊन १८व्या शतकाच्या मध्यातील भारतातील राजकीय व्यवस्था विखंडित छायेने कशा प्रकारे घेरलेली होती हे स्पष्ट करावे लागेल.

* Why indentured labour was taken by the British from India to other colonies? Have they been able to preserve their cultural identity over there?

कोणत्या कारणामुळे ब्रिटिशांनी भारतातून करारबद्ध कामगार त्यांच्या इतर वसाहतींमध्ये आणलेले होते? त्यांना तिथे आपली सांस्कृतिक अस्मिता जोपासता आली का? (२०१८, गुण १५, शब्दमर्यादा २५०).

ब्रिटिशांच्या वसाहती या मुख्यत्वे व्यापारवाढीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेल्या होत्या व पुढे चालून यातूनच ब्रिटिश साम्राज्यवादाची सुरुवात झालेली होती. अशातच अठराव्या शतकाच्या मध्यात ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती सुरू झाली होती. तसेच यापूर्वीच ब्रिटिशांनी आफ्रिका, आशिया आणि अमेरिका खंडामध्ये वसाहती स्थापन केलेल्या होत्या. या वसाहतीमध्ये कामासाठी भारतातून कामगार आणलेले होते, कारण या वसाहती ब्रिटनमधील औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारा कच्चा माल निर्यात करत असत. अशा पद्धतीने या प्रश्नाची उकल करून उदाहरणासह हे कामगार तेथील वसाहतीमध्ये स्वत:ची  सांस्कृतिक ओळख जतन करू शकले का, याचे विश्लेषण उत्तरामध्ये द्यावे लागेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Upsc question papers question bank for upsc exam

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या