एखादी दुर्बीण वापरण्याकरता असलेला वेळ हा ती वापरण्यास इच्छुक असलेल्या शास्त्रज्ञांच्या संख्येपेक्षा नेहमीच कमी असतो. दृश्य प्रकाशाच्या (म्हणजेच जो प्रकाश आपल्या साध्या डोळ्यांना दिसतो) दुर्बिणी फक्त अंधार पडल्यावरच वापरता येतात. तर रेडिओ दुर्बिणींसारख्या दुर्बिणींचा वापर अर्थातच २४ तासांपेक्षा जास्त नसतोच. एखाद्या दुर्बिणीचा वापर कोणी किती वेळ आणि कशासाठी करायचा हे ठरवण्याकरता एक समिती असते.
प्रत्येक निरीक्षक आपल्याला एखादी दुर्बीण कुठल्या प्रकल्पासाठी आणि किती काळ वापरण्यास हवी आहे, हे सांगणारा एक अर्ज त्या दुर्बिणीशी निगडित समितीस करतो. अर्जाबरोबर आपण करणार असलेल्या निरीक्षणांचे फलित काय असेल, हेसुद्धा निरीक्षकाला सांगावे लागते. ही समिती अशा अर्जाचा अभ्यास करून प्रकल्पाच्या गुणवत्तेनुसार कोणी किती वेळ दुर्बिणीचा वापर करायचा हे सांगते.
एकेकाळी अशा निरीक्षणांवर त्या निरीक्षकाचा सर्वस्वी ‘मालकी हक्क’ असायचा. हल्ली अनेक शास्त्रज्ञ आपल्या पदाच्या अधिकारावरून भरमसाट निरीक्षणे घेऊन ठेवायचे, पण त्यांचे ते विश्लेषण मात्र करत नसत. दुसरी बाब म्हणजे एखाद्या निरीक्षणातून वेगळी माहितीही मिळू शकते. जेव्हा अशा न वापरलेल्या निरीक्षणांची संख्या वाढू लागली, (विशेषत: खगोलशास्त्रात सीसीडीचा उपयोग वाढल्यानंतर), तेव्हा एक नवी संकल्पना समोर आली. ही संकल्पना अशी होती की एखाद्या निरीक्षकाला आपल्या निरीक्षणांचा वापर करण्यासाठी काही कालावधी देण्यात येतो. हा सुमारे एक वर्षांचा असतो. त्यानंतर त्या निरीक्षकांची निरीक्षणे कुणालाही वापरण्यासाठी खुली करता येतात. आता लोकांना कसे कळणार की कुठली निरीक्षणे उपलब्ध आहेत? त्यासाठी त्या निरीक्षणांच्या माहितीसकट ही निरीक्षणे एका संगणकावर ठेवण्यात येतात. ज्यांच्याकडे संगणक आणि इंटरनेट जोडणी आहे अशी कोणतीही व्यक्ती याचा वापर करू शकते. या संगणकांना ५्र१३४ं’ किंवा आभासी वेधशाळा म्हणतात. विद्यापीठ क्षेत्रातील शिक्षक संशोधक अशा आभासी वेधशाळांचा वापर आपल्या संशोधनासाठी करतात. अशा रीतीने या आभासी वेधशाळांचा वापर खूपच उपयुक्त सिद्ध होतो आहे. अनेक संशोधक किंवा संशोधकांचे गट आपल्या निरीक्षणांचा वापर कसा करायचा हे शिकवण्याकरता कार्यशाळासुद्धा घेतात.
खगोलशास्त्रातील आभासी वेधशाळा हे नवीन दालन विद्यापीठ क्षेत्रातील किंवा ज्यांना आपल्या फावल्या वेळात संशोधन करायचे आहे, अशा कोणत्याही इच्छुक व्यक्तीला खुले आहे. मुख्य म्हणजे या वेधशाळांचा वापर मोफत असतो. आपल्याला फक्त इंटरनेटची गरज असते. हे असे एक दालन आहे यात खगोलशास्त्रात काम न करणारी, पण याची आवड असणारी एखादी गृहिणी किंवा निवृत्त व्यक्तीसुद्धा त्यात काम करू शकते.
(लेखक नेहरू तारांगणचे संचालक आहेत.)