महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १८ मे रोजी होणाऱ्या राज्य सेवा पूर्वपरीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी अभ्यासाचे हे कानमंत्र. आपला अभ्यास नेमका किती झाला आहे, काही जोखून या परीक्षेला आत्मविश्वासाने कसे सामोरे जाता येईल, यासंबंधीच्या टिप्स..
पूर्व परीक्षा सोपी आणि मुख्य अवघड किंवा पूर्व परीक्षा अवघड असेल तर मुख्य परीक्षा जास्त अवघड असेल, असे कोणतेही गणित मांडून अभ्यासाची रणनीती ठरवू नका. काही बहाद्दर विद्यार्थी मित्रांनी अभ्यास नियोजन करताना असाही विचार मांडतात की, अभ्यास चांगला, बरा कसाही झाला तरी वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या परीक्षा पद्धतीमुळे दिलेल्या चार उत्तरात एक ‘बरोबर उत्तर’ समोर असणारच आहे. त्यामुळे प्रसंगी नशिबाची साथ घेऊन आम्ही एखादा पर्याय निवडून उत्तराला काळे करूच! मित्रांनो, नशिबाचा आजवर कोणत्याही तत्त्ववेत्त्याने, विचारवंताने, संशोधकानेही नाकारलेले नाही. मात्र, नशिबाविषयी चर्चा करण्यापूर्वी येत्या १८ मे रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेच्या एकूण स्पध्रेचा अंदाज घेऊया.
पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या असतील. प्रश्नांसोबत चार उत्तरांचे पर्याय तुमच्यासमोर असतील. तुमचा अभ्यास कसा आणि किती चांगला झाला आहे, स्पध्रेत तुम्ही नेमके कुठे आहात, हे जाणण्यासाठी खालील पाच टप्प्यांच्या फूट पट्टीवर तुमचा अभ्यास, तयारी पडताळून पाहा.
– प्रश्नपत्रिकेतील प्रश्न वाचल्यानंतर उत्तरांचे पर्याय पाहाण्यापूर्वीच पटकन तुम्हाला उत्तर आठवत असेल तर तुमचा अभ्यास उत्तम सुरू आहे, असे समजा.
– प्रश्न वाचल्यानंतर उत्तरांचा पर्याय पाहाताक्षणीच तुम्ही अचूक उत्तर आत्मविश्वासाने निवडलंत, तर तुमचा अभ्यास उत्तम सुरू आहे.
– प्रश्न वाचल्यानंतर तुम्ही उत्तरांचे पर्याय पाहण्यासाठी उतावीळ असता. कारण तुम्ही या विषयाचा अभ्यास केलेला असतो. त्यामुळे दिलेल्या प्रश्नाचे उत्तर आपण देऊ शकू, असा विश्वास तुम्हांला वाटत असतो. कदाचित, स्मरणशक्ती धोका देण्याची शक्यता तुम्हांला वाटत असते. उत्तरांचे पर्याय वाचल्यानंतर चार पर्यायांपकी चुकीचे दोन पर्याय तुमच्या लक्षातही येतात. मात्र, उर्वरित दोन पर्यायांमध्ये तुम्ही गोंधळता आणि जर अचूक उत्तराच्या पर्यायापर्यंत पोहोचण्यात तुमची जर दमछाक होत असेल, तर समजा तुम्हांला अजून अभ्यासाचा बराच पल्ला गाठायचा आहे.
पूर्व परीक्षेत बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. प्रश्न वाचल्यानंतर उत्तर आठवले, हे तथ्यात्मक प्रश्नाबाबत ठीक आहे. पण बहुविधानी प्रश्न मूलभूत तपशील विचारणारे असतात. परिणामी, प्रत्येक प्रश्न व्यवस्थित किमान दोन वेळा वाचा आणि तितक्याच दक्षतेने उत्तरांचे पर्याय वाचून निवडा.
यापूर्वी पूर्व परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची आणि मुख्य परीक्षा दीघरेत्तरी स्वरूपाची होती. त्यामुळे अशा परीक्षा पद्धतीला अनुरूप अभ्यास पद्धतीचा अवलंब केला जायचा. वस्तुनिष्ठ स्वरूपात अचूकतेला जास्त महत्त्व असते. विषय घटक वाचताना अधोरेखित करून, वारंवार उजळणीचे तंत्र वापरावे लागते. वस्तुनिष्ठ प्रश्नसंचाचा (question bank) भरपूर सराव करावा लागतो.
पूर्व आणि मुख्य दोन्ही स्तरांवर वस्तुनिष्ठ प्रश्नपद्धती आहे. शिवाय प्रश्नांचे स्वरूप तथ्यात्मक, संकल्पनात्मक आणि बहुविधानी असे असणार आहे. त्यामुळे मूलभूत अभ्यास दोन्हीकडे तितकाच महत्त्वाचा आहे.
नियोजनबद्ध तयारीचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे वेळेचे नियोजन. पूर्व परीक्षा पेपर क्र. १ व पेपर क्र. २ प्रश्नपत्रिकांची प्रश्नसंख्या व पेपर सोडविण्यासाठीचा निर्धारित वेळ याचा मेळ घालून अभ्यासाची तयारी करावी लागेल. साधारण एका प्रश्नाला किती वेळ मिळतो, हे तपासून पाहा. सामान्य अध्ययन पेपर १चे घटक विषय, प्रश्नांचे स्वरूप आणि पेपर २ कल चाचणीचे घटक विषय, प्रश्नांचे भिन्न स्वरूप पाहाता वेळेच्या व्यवस्थापनाचे गणित सोडवावेच लागेल.
स्पर्धा परीक्षा तयारीशी सबंध नसणाऱ्या कोणत्याही विद्याशाखेच्या नवख्या विद्यार्थ्यांला, पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवायला द्या, अभ्यास असेल वा नसेल, गंमत म्हणून अंदाजाचा नेम धरून पेपर सोडविला तरी त्याची काही उत्तरे ही बरोबर येतील. ‘यात विशेष ते काय, यूपीएससी/एमपीएससी परीक्षा सोपी असते,’ असेही तो हिरीरीने सांगेल. पण घरच्या हॉलमधील सोफ्यावर बसून गंमत म्हणून पेपर सोडवणे आणि खूप अभ्यास करून ध्येय नजरेसमोर ठेवून परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवणे यात जमीन-अस्मानचा फरक आहे. परीक्षा हॉलमधील तणावाचे व्यवस्थापन करीत प्रश्नपत्रिका सोडविण्यात खरी परीक्षा असते. परीक्षेचे यश हे अभ्यासात आणि अधिकाधिक अभ्यासात असते.
आपल्या राज्यात एमपीएससीचा अभ्यास करणारे उमेदवार पूर्ण वेळ पीएसआय, एसटीआय आणि राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करायचे. पकी मोजकेच उमेदवार यूपीएससीचासुद्धा अभ्यास करायचे. नागरी सेवा परीक्षेचा (यूपीएससी) अभ्यास करणाऱ्या राज्यातील उमेदवारांपकी मोजके विद्यार्थी एमपीएससी परीक्षा द्यायचे. यूपीएससीचा अभ्यास करणारे बहुतांश उमेदवार एमपीएससीच्या परीक्षेला बसायचे. पूर्ण वेळ एमपीएससी करणारे वेगळे आणि पूर्णवेळ यूपीएससी करणारे वेगळे अशी स्पष्ट विभागणी यापूर्वी होती. यूपीएससी आणि एमपीएससी दोन्ही परीक्षांचा गांभीर्याने अभ्यास करणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण कमी होते. इथून पुढे हे चित्र बदलेल.
राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षेचा पॅटर्न बदलला. नागरी सेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम जसाच्या तसा ‘कॉपी-पेस्ट’ केला. या अभ्यासक्रमात केवळ ‘महाराष्ट्र’ जोडला गेला आहे. राज्य लोकसेवा आयोगाची ही भूमिका कौतुकास व अभिनंदनास पात्र आहे. या बदलाकडे परीक्षेचा ‘पॅटर्न बदल’ म्हणून न बघता हा बदल नजीकच्या काळात क्रांतिकारी बदल घडवेल, असा आहे. याचे कारण की, राज्य आणि केंद्र अशा दोन्ही पूर्व परीक्षांचा अभ्यास समान पातळीवर आल्यामुळे नागरी सेवा परीक्षा (यूपीएससी)ची तयारी करणारे सर्व उमेदवार आता एमपीएससीची परीक्षाही देतील. पूर्णवेळ यूपीएससी करणाऱ्या उमेदवारांसाठी ‘एमपीएससी’ने एक नवी संधी निर्माण केली आहे. काही उमेदवारांसाठी ही ‘नवी संधी’ निर्माण झाली असली तरी दुसरीकडे एमपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ‘नवी स्पर्धा’ निर्माण झाली आहे.
थोडक्यात, आता स्पर्धा वाढली आहे. सामोरी येणारी कोणतीही स्पर्धा सोबत अपयशाची पायरी नव्हे तर संधीचे नवे अवकाश आणि सुप्त क्षमतांसाठी नवी वाट घेऊन येते. म्हणून स्पध्रेला पर्याय म्हणजे अभ्यास आणि अभ्यासाला पर्याय म्हणजे जास्त अभ्यास.
पूर्वपरीक्षेसाठी शुभेच्छा !
संग्रहित लेख, दिनांक 6th May 2013 रोजी प्रकाशित
राज्यसेवा पूर्वपरीक्षेची अंतिम तयारी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १८ मे रोजी होणाऱ्या राज्य सेवा पूर्वपरीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी अभ्यासाचे हे कानमंत्र. आपला अभ्यास नेमका किती झाला आहे, काही जोखून या परीक्षेला आत्मविश्वासाने कसे सामोरे जाता येईल, यासंबंधीच्या टिप्स..
First published on: 06-05-2013 at 12:50 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Final preparation of pre examination of mpsc