यूपीएससीची तयारी : रोहिणी शहा

मानवी हक्क आणि मनुष्यबळ विकास या घटकाच्या पारंपरिक व विश्लेषणात्मक अभ्यासाबाबत मागील लेखांमध्ये चर्चा करण्यात आली. या पेपरशी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास कशा प्रकारे करावा याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

’ मानवी हक्क  – मानवी हक्कविषयक मुद्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी, निर्णय, ठराव यांचा आढावा  वर्तमानपत्रातून घेता येईल. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल किंवा

शेरा चर्चेत असल्यास त्याची माहिती करून घ्यावी.

’ विविध समाजघटकांबाबत घेण्यात आलेले निर्णय, नवे धोरण यांची माहिती असायला हवी.

’ सर्वच उपघटकांसाठीच्या शासकीय योजनांचा अभ्यास पुढील मुद्यांच्या आधारे कोष्टकामध्ये करता येईल. योजनेचे ध्येय, हेतू, असल्यास घोषणा, संक्षिप्त नाव, स्वरूप, खर्चाची विभागणी, अंमलबजावणी करणारी यंत्रणा, असल्यास लाभार्थ्यांचे निकष, शिफारस करणारा आयोग / समितीचे नाव, असल्यास आकडेवारी, मूल्यमापन इ.

’ तसेच पेपर दोनच्या समांतरपणे मानवी हक्कांची चर्चा असलेले सर्वोच्च न्यायालयाचे अलीकडचे निर्णय माहीत असावेत.

मनुष्यबळ संसाधन

’ दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या आर्थिक पाहणी अहवालामधून शिक्षणविषयक आकडेवारी – पटनोंदणी, गळतीचे प्रमाण, साक्षरतेमधील लिंगसमानता याबाबतची टक्के वारी पाहायला हवी. भारत आणि महाराष्ट्र यांची तुलना, राज्यातील जिल्ह्यंची तुलना करणारे कोष्टक तयार करावे. ‘असर’ अहवालातील अद्ययावत आकडेवारी व कल (Trends) समजावून घ्यावेत.

’ आरोग्यविषयक आकडेवारी – मातामृत्यू दर, अर्भक /बाल मृत्युदर, कुपोषण विषयक आकडेवारी भारत आणि महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालामधून पाहणे आवश्यक आहे.

’ विविध साथीच्या रोगांबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून जाहीर होणाऱ्या अहवालामध्ये भारताचा उल्लेख असल्यास त्याचा आढावा घेणे आवश्यक आहे. तसेच रोगमुक्त घोषित केल्या गेलेल्या देशांची माहितीही असायला हवी. पेपर ४ मधील पोषण आणि आरोग्यविषयक मुद्यांची सांगड येथे घालता यायला हवी.

’ नवीन लसीकरण मोहीम/ आरोग्य योजना तसेच नव्या उपचार / रोग निदान पद्धती याबाबत अद्ययावत माहिती असणे आवश्यक आहे.

’ बेरोजगारीचे प्रमाण, कामगारांचा मागणी दर, वेगवेगळ्या क्षेत्रातील सेवायोजन इत्यादी गोष्टींच्या नोट्स काढणे आवश्यक आहे. याबाबत भारतातील एकूण आकडेवारी / टक्के वारी, महाराष्ट्रातील आकडेवारी / टक्के वारी व रोजगाराबाबत राज्यांची तुलना पाहायला हवी.

’ आरोग्य, शिक्षण, ग्राम विकास याबाबत नव्याने लागू झालेले शासकीय नियम, धोरण यांचा नेमका अभ्यास करणे आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकास उद्दिष्टे आणि त्यासंदर्भातील आधीच्या सहस्त्रक विकास उद्दीष्टांमधील मुद्दे माहीत असणे आवश्यक आहे. शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी करण्यात येणारे प्रयत्न व त्यासाठीची अभियाने, योजना यांची माहिती बारकाईने करून घ्यायला हवी.

’ वेगवेगळ्या अशासकीय संस्थांचे (NGO) उल्लेखनीय कार्य त्या त्या वर्षीच्या पेपरमध्ये एका प्रश्नासाठी तरी विचारण्यात आलेले आहे. अशा संस्थांचे कार्य, कार्यपद्धती, कार्यक्षेत्र, असल्यास त्यांना मिळालेले पुरस्कार, असल्यास संबंधित प्रमाणित आकडेवारी (अधिकृत नोंद) व इतर उल्लेखनीय माहिती असल्यास फायदा होईल.

’ सन २०११ च्या जनगणनेच्या अहवालाचा विश्लेषणात्मक अभ्यास कोष्टकामध्ये करता येईल. नागरी, ग्रामीण, वयोगट, लिंग गुणोत्तर, बाल लिंग गुणोत्तर, बाल मृत्युदर, अर्भक मृत्युदर, साक्षरता या मुद्यांसाठी कोष्टक बनवावे. प्रत्येक मुद्यामध्ये भारतविषयक आकडेवारी व टक्के वारी, महाराष्ट्राची टक्के वारी व राज्यांच्या एकत्रित यादीमधील क्रमांक, महाराष्ट्राच्या तुलनेत मागे व पुढे असलेले एक-एक राज्य/ केंद्रशासित प्रदेश, सर्वात जास्त व सर्वात कमी टक्के वारीची तीन-तीन राज्ये / केंद्रशासित प्रदेश व त्यांची टक्के वारी यांचा समावेश करावा. यामध्ये महाराष्ट्राची जनगणना व्यवस्थित पाहाणे आवश्यक आहे. वरील मुद्यांबाबत चर्चा केलेल्या पद्धतीनेच प्रत्येक मुद्यासाठी महाराष्ट्रातील जिल्ह्य़ांचा विचार करून कोष्टक तयार करावे. शक्य झाल्यास सन २००१ च्या जनगणनेच्या अहवालातील या मुद्यांचा आढावा घ्यावा. यामुळे तुलनात्मक प्रश्नांची उत्तरे देणे शक्य होईल.

’ अभ्यासक्रमामध्ये उल्लेख नसला तरी सामाजिक, आर्थिक व जातिनिहाय जनगणना (SECC) ची आकडेवारी अत्यंत महत्त्वाची आहे. यातील आपोआप समावेशाचे आणि आपोआप वगळण्याचे (Automatic Inclusion &Automatic Exclusion) निकष आणि या दोन निकषांव्यतिरीक्त ठरविण्यात आलेले वंचिततेचे निकष माहीत करून घ्यावेत. शहरी, ग्रामीण व एकत्रित अशी महत्त्वाची आकडेवारी पाहायला हवी. देशाची व महाराष्ट्राची या सर्व निकषांबाबतची आकडेवारी/ टक्के वारी माहीत करून घ्यायला हवी. याबाबत तपशीलवार माहितीसाठी रएउउ च्या संकेतस्थळचा वापर करता येईल.