मानवी मनाच्या आणि वागण्याच्या बाबतीतली मूलभूत तत्त्वं मांडणाऱ्या गिन्याचुन्या पुस्तकांचा परिचय करून देणारे हे मासिक सदर आहे.
मानवी मन आणि व्यवस्थापन यावर आधारित अशा आधुनिक सुरस कथा त्यातल्या खासियतीसह या सदरातून वाचकांना भेटतील.
वाचन हा आपल्या सर्वाच्या अतिशय जिव्हाळयाचा विषय. रिकामा वेळ मिळाला की वाचायला लागायचं अशी सवय खूप जणांना असते. गेल्या काही वर्षांत मात्र ‘हल्लीची मुलं अजिबात वाचत नाहीत’ ही पालकांची मुलांबाबतची लाडकी तक्रार असते, तर ‘पुस्तकांचा खप  पूर्वीपेक्षा वाढतोय’ असं प्रकाशनांची आणि पुस्तक प्रदर्शनांची आकडेवारी सांगते. असं का घडतंय?
बहुधा काळानुरूप वाचकांची आवड बदलतेय. त्यामुळे मागच्या पिढीला आवडणारी पुस्तकं पुढच्या पिढीला फारशी आवडत नाहीयेत. आयुष्याचा वेग वाढलाय आणि जीवनशैली बदलतेय हे तर खरंच, त्यात विविध वाहिन्या/ इंटरनेट/ मोबाइलनी वाचनाच्या वेळावर अतिक्रमण केलंय. या रंगीत, हलत्या दृश्य माध्यमांना टक्कर देऊ शकतील एवढय़ा ताकदीची आणि आकारानं लहान असणारी पुस्तकं जास्त वाचली जातात. त्यातही जग लहान होतंय, तशी अनुवादित पुस्तकांची चलतीदेखील वाढते आहे.
कल्पनारंजन करणाऱ्या कादंबऱ्यांपेक्षा आता तरुणांना व्यवस्थापनविषयक गुरुकिल्ल्या पुरवणारी, ‘यशाचे मंत्र’ देणारी गोष्टीरूप पुस्तकं किंवा मानवी मनाचा, स्वविकसनाचा खोल विचार आणि विश्लेषण करणारी पुस्तकं आवडतात. विचारांचं, भाषेचं वेष्टन कसंही असो, आतला गाभा, मूलभूत भावना सर्वाच्या सारख्याच असतात. नातेसंबंध, माणसांशी वागणं, आत्मसन्मान, आपण अपुरे आहोत किंवा हे जग परकं आहे असं वाटणं या जागतिक भावना आहेत.
प्रत्येक माणसाच्या वागण्यामागच्या महत्त्वाच्या प्रेरणा असतात त्या ‘आपण कुणालातरी हवे आहोत’ आणि ‘आपली भूमिका महत्त्वाची आहे’ असं वाटणं. (The feeling of belonging and significance). तिथे आपण कमी पडतो आहोत, असं वाटलं की समस्या सुरू होतात. त्यात स्पध्रेचं जग, रॅटरेसच्या दडपण आणणाऱ्या चर्चा. मग त्यासाठी समोरच्याला आकर्षति कसं करायचं, आपला प्रभाव कसा वाढवायचा, इतरांकडून काम करून घेऊन आपली क्षमता कशी सिद्ध करायची? अशा गोष्टींवर विचार सुरू होतो.  अशा कॉमन समस्यांना किंवा भावनांना स्पर्श करणाऱ्या आणि उपाय सुचवणाऱ्या पुस्तकांना त्यामुळे कायम मागणी असते.
काही वर्षांपूर्वी ‘एवढी माणसं का वाचतात अशी पुस्तकं?’ या उत्सुकतेतून अशा प्रकारची बरीच पुस्तकं मी वाचली. कधी वाटायचं, हे लेखक-प्रकाशक व्यवस्थापन, विक्री आणि फायदा यासाठीच फक्त माणसाच्या मनाचा विचार करून तो वापरतायत, त्यांच्या मनातल्या असुरक्षिततेचा, भीतीचा फायदा घेतायत. तर कधी वाटायचं, भावनांना किती हे अतिरेकी महत्त्व. एवढं करूनही २+२ = ४ च होईल अशीही खात्री माणसाच्या मनाबाबत देता येत नाहीच. काही पुस्तकं वाचून असंही वाटायचं की ‘कशी स्ट्रॅटेजी वापरल्यामुळे तुम्ही यशस्वी व्हाल?’ असे तथाकथित ऐहिक यशाचे मंत्रच ते सांगतायत. ‘छान कसं जगायचं?’  ते सांगतच नाहीयेत. जगाची गती वाढलीय तशी सगळ्याचीच घाई झालीय. त्यामुळे जगण्याबाबतही घाईघाईनं कुणीतरी दाखवलेले शॉर्टकटस् म्हणजे ही पुस्तकं अशीही कॉमेंट माझ्या मनात उमटली होती.
पण तरीही अशी पुस्तकं जर जागतिक बेस्ट सेलर्स असतील आणि जगाला एवढी आवडत असतील तर ‘नवीन फॅड’ म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. असं जाणवून पूर्वग्रहांचा चष्मा काढून पुन्हा एकदा या पुस्तकांकडे पाहिलं. हळूहळू जाणवत गेलं की ही पुस्तकं मानवी मनाच्या आणि वागण्याच्या बाबतीतली मूलभूत तत्त्वं मांडतात. वाचकानं त्यांचा उपयोग माणसं समजून घेण्यासाठी करावा, माणसांच्या आणि स्वत:च्याही जवळ जाण्यासाठी करावा, स्वत:ला बदलण्यासाठी करावा अथवा स्वत:ची उत्पादनक्षमता किंवा कंपनीचं उत्पादन वाढवण्यासाठी करावा. मिळालेल्या तत्त्वाचा ‘वापर’ करायचा की ‘उपयोग’ हे ज्याच्या-त्याच्या स्वभावाप्रमाणे ठरेल. थोडक्यात, पाठांतर करून पास होणं आणि समजून अभ्यास करून पास होणं यातल्या फरकासारखंच ते आहे. तरीही दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या टप्प्यावर गाईड किंवा अपेक्षित प्रश्नसंचांचा उपयोग होतोच.  
महत्त्वाचं हे की, या लेखकांनी काही गहन विषय सोपे केले आहेत. कथांसारखं माध्यम वापरून एक-दोन ओळींच्या छोटय़ा छोटय़ा तत्त्वांत ते आणलेत. असे तात्त्विक विषय जेव्हा एवढे सोपे आणि छोटे करता येतात, तेव्हा त्यांचा विचार खूप नीट झालेला असतो. ही मांडणीची पद्धत छान आहे. साधारण १४ वर्षांचं मूल डोळ्यांसमोर ठेवून (जे सर्वसाधारणपणे समाजाचं एकत्रित वय असतं) कोणालाही समजेल अशा पद्धतीनं मांडणं नक्कीच कौतुकास्पद आहे. शेकडो वर्षांपूर्वीपासून समाजाला शिकवण्यासाठी कथेचंच माध्यम सर्वात प्रभावी ठरलं आहे. थोडक्यात, ही नव्या काळाला अनुसरून आलेली ईसापनीती किंवा हितोपदेश किंवा पंचतंत्र आहे.
 हा विचार मनात आल्यावर मला अशा पुस्तकांमधली मजा घेता यायला लागली. मग लक्षात आलं की प्रामाणिकपणे उपयोग केला तर ही तत्त्वं ही कुठल्याही बाबतीत लागू पडतात. त्यानंतर मात्र मनातल्या अंतर्वरिोधानं बंद करून ठेवलेलं मनाचं दार उघडता आलं. मला न आवडलेलं, खटकलेलं गाळून वाचणं जमायला लागलं आणि मग प्रत्येक पुस्तकातून लक्षात ठेवण्यासाठी, उपयोग करण्यासाठी काही ना काही मिळत गेलं.   
पूर्वी खूप वाचणं, सतत वाचत राहणं म्हणजे ग्रेट असं मला वाटायचं. आता वाटतं की थोडकं आणि नेमकं वाचून त्याचा वागण्यामध्ये उपयोग करता येणं महत्त्वाचं. वाचनाचा उपयोग फक्त वादविवाद आणि समर्थनांसाठी करण्यापेक्षा स्वत:च्या आत डोकावण्यासाठी झाला, आपले पूर्वग्रह तपासून नव्यानं विचार करण्यासाठी झाला तर मग ‘किती वाचलं?’ हे महत्त्वाचं ठरत नाही. तर काय वाचलं? आणि त्यातलं किती उपयोगात आणलं? नवीन अ‍ॅप्रोच कुठे स्वीकारता आला, ते महत्त्वाचं ठरतं.   
या सदरात अशी काही (शक्यतो छोटी आणि इंग्रजी) नावाजलेली पुस्तकं आणि त्यातून मला जे वेचून साठवावंसं आणि उपयोगात आणावंसं वाटलं ते शेअर करणार आहे. कधी कधी एरवी न उमजलेल्या एखाद्या मुद्दय़ाचा लेखकाच्या कथनशैलीमुळे झटकन प्रकाश पडला, त्याचं शेअिरग आहे. मला मिळालेला अ‍ॅप्रोच आहे, मात्र हे संपूर्ण पुस्तकाचं परीक्षण नव्हे.     
‘श्रीमंत कसं व्हायचं?’ ते सांगणारं ‘रिच डॅड पुअर डॅड’,  ‘टॉक्सिक एनर्जी डंप’ झालेल्या आपल्या ऑफिसमध्ये चतन्य आणण्याबाबतचं ‘फिश’, कामाकडे आणि माणसांकडे कसं पाहिल्यामुळे आपल्याला झटकन, चांगले रिझल्टस देता येतात आणि तरीही ताण येत नाही ते सांगणारं ‘द वन मिनीट मॅनेजर’, माणसाचं श्रेयस कशात असतं? आणि ते अचानक हातातून अदृश्य झालं तर काय घडतं? ते सांगणारं ‘हू मूव्हड माय चीज’, अंटाíक्टकाच्या पेंग्विन्सने आपला हिमखंड वितळतोय एवढा मोठा बदल कसा स्वीकारला आणि नवा मार्ग शोधला? ते सांगणारं ‘अवर आइसबर्ग इज मेिल्टग’ ही त्यातली काही पुस्तकं. मानवी मन आणि व्यवस्थापन यावर आधारित अशा या मोठय़ांसाठीच्या आधुनिक सुरस कथा त्यातल्या खासियतीसह या सदरातून वाचकांना भेटतील.  
स्वविकसन ही अंतर्मनात घडणारी खूप हळुवार प्रक्रिया आहे. ती घडत राहते. एखादं वाचलेलं काहीतरी मनात खूप काळ रेंगाळतं आणि कधीतरी आपल्या कुठल्यातरी विचाराशी, समस्येशी जुळलं गेलं तर अंधारात वीज चमकल्यासारखं अचानक क्षणभरात लख्ख दिसतं. या कथांच्या  सोबतीतून कुणाला कधी काय मिळेल ते सांगता येत नाही. कदाचित त्यातले मुद्दे वागताना कुठे कुठे उपयोगी पडतील. न जाणो, एखाद्याला एखाद्या क्षणी परीसही मिळून जाईल.    
http://www.neelimakirane.com