रोहिणी शहा
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा एप्रिलपासून सुरू होत आहेत. या परीक्षांमधील चालू घडामोडी घटकाच्या सरावासाठी या लेखामध्ये प्रश्न देण्यात येत आहेत.
* झुंड हत्यांविरोधात कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
१) राजस्थान २) मणिपूर
३) पश्चिम बंगाल ४) उत्तर प्रदेश
मणिपूर हे जमाव हत्यांविरोधात कायदा करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. डिसेंबर २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मणिपूर विधानसभेने झुंड हत्यांविरोधात कायदा विधेयक पारित केले. ऑगस्ट २०१९ मध्ये राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये जमाव हत्याविरोधात कायदे करण्यात आले आहेत.
* देशामध्ये नागरिक कर्तव्य पालन अभियान कोणत्या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे?
१. १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२०
२. २६ जानेवारी २०१९ ते २६ जानेवारी २०२०
३. २६ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०२०
४. १५ ऑगस्ट २०१९ ते १५ ऑगस्ट २०२०
नागरीक कर्तव्य पालन अभियान २६ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०२० या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट मूलभूत कर्तव्यांबाबत व्यापक जागृती करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे.
* कर्तव्य पोर्टलबाबत कोणते विधान चुकीचे आहे?
अ. नागरिक कर्तव्य पालन अभियानांतर्गत विविध स्पर्धा आयोजित करण्यासाठी निर्मिती
ब. उच्चशिक्षण घेणारे विद्यार्थी या पोर्टलवर नोंदणी करू शकतात.
पर्याय –
१) अ आणि ब
२) केवळ अ
३) केवळ ब
४) अ आणि ब दोन्ही नाही.
मूलभूत कर्तव्यांबाबत व्यापक जागृती करण्याच्या उद्देशाने देशात २६ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०२० या कालावधीमध्ये नागरिक कर्तव्य पालन अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत विविध स्पर्धा प्रामुख्याने निबंध स्पर्धा आयोजित करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगांतर्गत कर्तव्य पोर्टल विकसित केले आहे.
* लोकपाल यंत्रणेचे बोधवाक्य म्हणून पुढीलपैकी कोणत्या विधानाची निवड करण्यात आली आहे?
१) ईशावास्यम इदं सर्वम
२) यंत्कींचं जगत्यां जगत
३) त्येनं तक्तेन भुंजींथ:
४) मा गृध: कस्यास्विद धनं
‘ईशावास्योपनीषदा’मधील ‘मा गृध: कस्यास्विद धनं’ हे वाक्य लोकपाल यंत्रणेचे बोधवाक्य म्हणून निवडण्यात आले आहे. इतरांच्या धनाचा लोभ/मोह बाळगू नका असा या विधानाचा अर्थ होतो. लोकपाल यंत्रणेच्या बोधचिन्ह व बोधवाक्याच्या निवडीसाठी जून २०१९ मध्ये स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये या विधानाची निवड करण्यात आली.
* देशातील टाळता येण्याजोगे माता मृत्यू व अर्भक मृत्यू यांचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या उद्देशाने कोणती योजना केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आली आहे?
१. सुमन योजना
२. उज्ज्वला योजना
३. संजीवनी योजना
४. जननी सुरक्षा योजना
सुरक्षित मातृत्व आश्वासन म्हणजेच सुमन योजना ही प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानापैकी वेगळी योजना आहे. या योजनेमध्ये पुढील बाबी मोफत उपलब्ध करून देण्यात येतील. किमान चार प्रसूतीपूर्व तपासण्या, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांर्तगत किमान एक तपासणी, फॉलिक अॅसिड गोळ्या, धनुर्वात लस, तपासणीसाठीचा प्रवास इतर आवश्यक प्रसूतीपूर्व औषधे व नवजात अर्भकांच्या तपासणीसाठी सहा भेटी.
* SHe-Box हे काय आहे ?
१) कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाविरोधी कायद्यांतर्गत ऑनलाइन तक्रार नोंदणी यंत्रणा
२) महिला सुरक्षितता विषयाशी संबंधित सर्व हितसंबंधीयांमध्ये समन्वय साधण्यासाठी पोर्टल
३) महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत मोफत सल्ला देण्यासाठीचे पोर्टल
४) वरीलपैकी नाही.
केंद्रीय महिला व बाल विकास विभागाकडून Sexual Harassment Electronic-Box (SHe-Box)ची सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये शासकीय आणि खासगी अशा सर्व आस्थापनांमध्ये कार्यरत महिलांना तक्रार नोंदविता येणार आहे.