भारतीय नागरिक दररोज चार तासांहून अधिक काळ फेसबुक, युटय़ुब, इंस्टाग्राम, ट्विटर यांसारख्या समाजमाध्यमांवर व्यतीत करतात. संपूर्ण जगभरात या समाजमाध्यमांचे कोटय़वधी वापरकर्ते आहेत. या सर्व नागरिकांना अधिक काळ समाजमाध्यमांवर खिळवून ठेवण्यासाठी एक मोठी यंत्रणा कार्यान्वित आहे. ही यंत्रणा चालविण्यासाठी आज अनेक तरुणांची गरज आहे. यामुळे समाजमाध्यमात करियरच्या अनेक संधी असल्याचे मत समाजमाध्यम विश्लेषक केतन जोशी यांनी व्यक्त केले. सध्याच्या घडीला कोणत्याही क्षेत्रात डिजिटल माध्यम महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आज सर्व जण आपल्या मनोरंजनासह इतर सोयीसुविधा मिळविण्याच्या गरजा विविध डिजिटल माध्यमांतून भागवत आहोत. यातून समाज माध्यमांच्या क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाजमाध्यमांवर सर्व भाषेतील साहित्य वाचले जाते. यामुळे ज्या तरुणांना लिखाणाची आवड असेल त्यांच्यासाठी या क्षेत्रात अनेक संधी आहेत. विविध विषयांवर माहितीपूर्वक, मनोरंजनात्मक, ऐतिहासिक माहिती देणारी असंख्य असे ॲप्लिकेशन आणि संकेतस्थळ कार्यान्वित आहेत. या ॲप्लिकेशनसाठी तसेच संकेतस्थळांसाठी लेखक म्हणून अनेकांना नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच सामाजमाध्यमांवर वेळोवेळी विविध जाहिराती प्रसारित होत असतात. माध्यम वापरकर्त्यांना या जाहिरात दाखविण्याचे काम समाजमाध्यम व्यवस्थापक करत असतो. यामुळे यातदेखील विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सद्यस्थितीत अनेक नामांकित कंपन्यांचे जनसंपर्क प्रतिनिधी म्हणून विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध आहेत.

आज जवळपास प्रत्येक नागरिकाकडे एक स्मार्ट फोन आहे. या द्वारे नागरिक जगभरातील माहिती जाणून घेत असतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे उत्तम वक्तृत्व शैली आहे तसेच काही विशिष्ट विषयांची जाण आहे त्यांनी त्या विषयांची अभ्यासपूर्ण माहिती देणाऱ्या चित्रफिती तयार करून समाज माध्यमांवर प्रसारित केल्यानंतर त्यांना वापरकर्त्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो. सातत्याने एका विशिष्ट कालावधीत चित्रफीत प्रसारित करणाऱ्यांकडे आर्थिक आवक सुरू होते. तसेच छायाचित्रीकरण, फोटोशॉप, डिजिटल मार्केटिंग यांसारख्या विविध गोष्टींचे अभ्यास केल्यास बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात. यासाठी कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण केल्यावर मास मिडिया पदवी अभ्यासक्रमाची निवड करणे गरजेचे आहे. राज्यभरात प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या शहरात या पदवी अभ्यासक्रमाची अनेक नामांकित महाविद्यालये आहेत. परंतु या क्षेत्रात येण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाची आवड आहे की नाही हे तपासून घ्यावे. तसेच वेळोवेळी तंत्रज्ञानातील बदलणाऱ्या गोष्टी शिकण्याची तयारी ठेवावी असा सल्ला केतन जोशी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opportunities social media facebook youtube instagram twitter amy
First published on: 21-06-2022 at 00:05 IST