एमपीएससी मंत्र : सी सॅट – परिचय आणि पूर्वतयारी

पाठांतराच्या किंवा स्मरणशक्तीच्या आधारावर या पेपरमधील प्रश्नांची उत्तरे देणे शक्य नाही.

|| फारुक नाईकवाडे

राज्य सेवा पूर्व परीक्षा २ जानेवारी २०२२ रोजी प्रस्तावित आहे. या लेखापासून या परीक्षेच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे. सुरुवात पेपर दोन -सी सॅट यापासून! सी सॅट – परिचय

राज्य सेवा पूर्व परीक्षा पेपर-२ या पेपरला सी सॅट (उ-रअळ) असेही म्हटले जाते. नागरी सेवा अभिवृत्ती चाचणी असा या लघुरूपाचा अर्थ होतो. म्हणजेच उमेदवार ज्या सेवेमध्ये प्रवेश घेऊ इच्छित आहे तिथल्या कामाच्या स्वरूपास त्याची अभिवृत्ती कितपत मिळतीजुळती आहे हे तपासणारा असा हा पेपर आहे. उमेदवारांची तर्क करण्याची, विश्लेषण करण्याची व निर्णय घेण्याची क्षमता तसेच त्यांचे आकलन या पेपरमधून तपासले जाते.

पाठांतराच्या किंवा स्मरणशक्तीच्या आधारावर या पेपरमधील प्रश्नांची उत्तरे देणे शक्य नाही. ऐनवेळी समोर आलेल्या प्रश्नांना विचारपूर्वक प्रतिसाद द्यायचा असतो आणि साहजिकच उत्तीर्ण होण्यासाठी हा प्रतिसाद, उत्तर योग्यच असावे लागते. त्यामुळे हा पेपर एकपेक्षा हा पेपर जास्त अवघड, जास्त आव्हानात्मक समजला जातो. पेपरचे व प्रश्नांचे हे स्वरूप लक्षात घेता २०० गुणांच्या या पेपरमध्ये प्रत्येकी २.५ गुणांसाठी एकूण ८० प्रश्न विचारण्यात येतात. या वर्षीच्या परीक्षेपासून नकारात्मक गुण पद्धतीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. आता प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे एकतृतीयांश नव्हे तर एकचतुर्थांश (२५%) गुण वजा करण्यात येणार आहेत. 

पूर्वानुभव

रूढार्थाने पेपर एकपेक्षा जास्त अवघड, जास्त आव्हानात्मक समजला जाणारा पेपर दोन हा वास्तविक परीक्षा उत्तीर्ण होण्यामध्ये जास्त योगदान देतो. सन २०१३ पासूनच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेतील कट ऑफ लाइनचे विश्लेषण केले असता उमेदवारांना प्रत्येकी २०० पैकी पेपर एकमध्ये सर्वसाधारणपणे ६० ते ८५ तर पेपर दोनमध्ये ७० ते १२० पर्यंत गुण मिळाले आहेत हे लक्षात येते. त्यामुळे सी सॅट हा पेपर सोडवताना अनावश्यक दडपण टाळावे आणि तयारी करावी.

मागील वर्षांच्या उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण उमेदवारांच्या गुणांचे आणि त्यांनी सोडविलेल्या प्रश्नांचे विश्लेषण केल्यावर पुढील बाबी लक्षात येतात.

निगेटिव्ह मार्किंगच्या हिशोबाने ठरावीक गुण मिळविण्याचे उद्दिष्ट ठरवणाऱ्या आणि त्यासाठी किती प्रश्न सोडविणे आवश्यक आहे, याचे गणित लक्षात घेऊन पेपर सोडविणाऱ्या उमेदवारांना तुलनेने कमी प्रश्न सोडवूनही चांगले गुण मिळाले आहेत.

जास्तीत जास्त पेपर सोडवण्याचे उद्दिष्ट ठेवून पेपर लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अगदी साध्या साध्या क्षुल्लक चुका जास्त होतात आणि जास्त प्रश्न सोडवूनही नकारात्मक गुणपद्धतीमुळे गुण खूप कमी होतात.

ठरावीक गुणांचे उद्दिष्ट ठरविले की, किती प्रश्न सोडवायचे याची मर्यादा आखून घेता येते. ताण कमी होऊन नकारात्मक गुण ओढवून घेणाऱ्या क्षुल्लक चुका टाळता येतात.

एकूण ८० पैकी ५ निर्णयक्षमतेचे प्रश्न वजा केले तर ७५ पैकी ६० ते ६५ प्रश्न सोडविणे हे उद्दिष्ट असायला हरकत नाही. मात्र अचूकपणे सोडविता येणाऱ्या प्रश्नांचे प्रमाण सरावाने वाढविणे आवश्यक आहे.

ज्या उमेदवारांनी आपल्या सरावाचे विश्लेषण करून आपले कम्फर्ट झोन आणि आव्हानात्मक वाटणारे प्रश्नप्रकार शोधले आणि त्यावर आधारित सराव केला त्यांना सी सॅट पेपरमध्ये चांगले गुण मिळाले आहेत.

पूर्वतयारी

वरील विश्लेषणाच्या अनुषंगाने विभागवार तयारी व पेपर सोडविणे या दोन्हीसाठी योजना ठरवायला हवी.

या पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील तर सरावाशिवाय पर्याय नाही. हा सराव केवळ बरोबर उत्तरे शोधण्यापुरता मर्यादित असून चालणार नाही. वेळेचे नियोजन करून बरोबर उत्तरे शोधण्याचे तंत्र आत्मसात करावे लागेल.

प्रश्नांचे स्वरूप ओळखीचे होईपर्यंत वेळ न लावता ते सोडवण्याचा प्रयत्न करणे आणि एकदा प्रश्नप्रकार ओळखीचा झाला की मग वेळ लावून कमीत कमी वेळेत तो सोडविण्याचा सराव करणे अशी तयारी जास्त परिणामकारक ठरते.

सरावासाठी सर्वात सोपा आणि परिणामकारक पर्याय म्हणजे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका. यांच्या सरावातून कोणत्या घटकावर आपले प्रभुत्व आहे, कोणता घटक अजून तयारी केल्यास जमू शकतो, कोणता घटक खूपच अवघड वाटतो या बाबी व्यवस्थित समजून घेता येतील आणि तयारीची दिशा ठरविण्यास मदत होईल.

सरावामध्ये सर्वात आधी थोड्या फार तयारीने आत्मविश्वास वाढू शकेल अशा घटकांची तयारी करावी.  त्यानंतर आत्मविश्वास असलेल्या घटकांचा सराव करावा.

पेपर दोनमध्ये ५६ पानी पेपर आणि ऐनवेळी आकलन व विश्लेषण करून सोडविण्याचे प्रश्न असे स्वरूप असल्याने खूपच कठीण वाटणारे प्रश्न ऐनवेळच्या तयारीचा भाग होऊ शकत नाहीत. अशा घटकांसाठी थोडा जास्त वेळ लागतो व त्यांचा समावेश दीर्घकालीन व्यवस्थापनामध्ये असणे आवश्यक असते.

जितका पेपर सोडविण्याचा सराव जास्त असेल तितकी यशाची शक्यता जास्त असते हे खरेच. पण जेवढ्या प्रश्नपत्रिका सोडविल्या असतील त्यांचे विश्लेषण करून स्पर्धेत आपण कुठे आहोत आणि अजून किती आणि कोणती तयारी गरजेची आहे याचा वारंवार आढावा आवश्यक आहे.

आयोगाचा साधारणपणे ५६ पानांचा पेपर १२० मिनिटांत वाचून सोडवायचा असतो. सलग सोडवत गेले तर ८० व्या प्रश्नापर्यंत पोहोचणासाठी दिलेला वेळ कधीच पुरणार नाही. यासाठी अवघड वाटणारे उतारे आणि प्रश्न बाजूला ठेवून गुण मिळवून देणारे प्रश्न आधी सोडविणे आवश्यक असते. पुरेसा सराव केलेला असेल तर उतारा किंवा प्रश्नाच्या सुरुवातीलाच तो वेळेत सोडविता येईल की नाही हे चटकन लक्षात येते. अवघड प्रश्न / उतारा बाजूला ठेवून गुण मिळवून देणाऱ्या प्रश्नाकडे वळता येते.

सी सॅटमध्ये १०० ते १२० गुण मिळवायचे असतील उत्तीर्ण होण्यासाठी २५% निगेटिव्ह मार्किं गचे गुण वजा करता एकूण किमान ४० ते ५० प्रश्नांचे गुण आवश्यक ठरतील. त्यासाठी निगेटिव्ह मार्किं ग नसलेले शेवटचे पाच प्रश्न आणि निगेटिव्ह मार्किं ग असलेले कमाल ५० ते ५५ प्रश्न असे एकूण जास्तीत जास्त  ५५ ते ६० प्रश्न सोडविण्याचे उद्दिष्ट ठरवणे योग्य ठरेल.

या पेपरमधील घटकांच्या तयारीबाबत पुढील लेखांमध्ये चर्चा करण्यात येत आहे. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: State service pre exam 2 january 2022 c sat introduction and preparation akp

Next Story
रोजगार संधी
ताज्या बातम्या