एका चित्रामध्ये हजार शब्दांची ताकद असते, हे वचन तर सर्वश्रुत आहे. एखाद्या कंपनीचे किंवा उत्पादनाचे बोधचिन्ह तयार करताना बराच सखोल विचार करणे गरजेचे असते. प्राइमो अँजेलीच्या मते, कोणतेही बोधचिन्ह कंपनीच्या कारभाराशी सुसंगत, लाखात उठून दिसणारे, स्मरणात राहणारे, लवचिक (कोणत्याही माध्यमावर, कोणत्याही आकारात तेवढेच खुलून दिसणारे) व एकमेव असावे. कार्ल स्लेजरफेल्डच्या मते, जगात प्रत्येकालाच सर्वच भाषा अवगत नसतात. त्यामुळे एक प्रभावशाली बोधचिन्ह (जे भाषेच्या चौकटी ओलांडून संवाद साधू शकते,) ही प्रत्येक बिझनेसची गरज बनली आहे. कंपनीचे बोधचिन्ह हे कंपनीबद्दल / कंपनीच्या उत्पादनांबद्दल ग्राहकांच्या मनात जागृती निर्माण करण्याचे व त्याचबरोबर स्मृती जपण्याचे काम करते आणि म्हणूनच बोधचिन्ह साकारताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात-
१) कोणतेही बोधचिन्ह हे साधे सोपे असावे. ते ओळखणे सोपे असते आणि सहज लक्षातही राहते. उदा. आयबीएम कंपनीचा लोगो (बोधचिन्ह). यालाच ‘कीप इट सिंपल स्टुपिड’ असे संबोधतात.
२) लोगो (बोधचिन्ह) हे संस्मरणीय असावे उदा. मॅकडोनाल्डचे बोधचिन्ह.
३) बोधचिन्ह हे सहसा काळ्या पांढऱ्या संगतीमध्ये असावे उदा. WWF चे पांडाच्या रूपातील बोधचिन्ह. रंगीत बोधचिन्ह प्रिंट करण्याचा खर्च जसा जास्त असतो, तसेच त्याच्या रंगसंगतीची योग्य निवड करणे हेही एक आव्हान असते. काळ्या-पांढऱ्या रंगसंगतीचा अजून एक फायदा म्हणजे पांढऱ्या पृष्ठभागावर काळे बोधचिन्ह किंवा काळ्या पृष्ठभागावरील पांढरे बोधचिन्ह उठून दिसते.
४) बोधचिन्ह लवचिक असावे. याचा अर्थ ते कोणत्याही मटेरियलवर (उदा. कागद, भिंत, टी-शर्टसारखे कपडे वगैरे वगैरे) तितक्याच सहजतेने व सुंदरतेने प्रिंट / रंगवता यायला हवे.
५) बोधचिन्ह हे कंपनीच्या बिझनेसशी सुसंगत असावे. उदा. ३८२ १ ४२ (टॉइज आर अस) हे लहान मुलांसाठी खेळणी बनविणाऱ्या कंपनीचे बोधचिन्ह, बिझनेसला अनुरूप असेच आहे. दुसरे उदा. म्हणजे मेजर लीग बेसबॉलचे बोधचिन्ह.
६) याचा अर्थ असा मात्र नव्हे की, ओढून ताणून अट्टहासाने बिझनेसशी संबंधितच बोधचिन्ह निवडावे. डोळ्यासमोर आणून पाहा की मर्सिडीजचे बोधचिन्ह कार नाही किंवा स्टारबक कॉफी शॉपचे बोधचिन्ह कॉफीकप नाही. याच्या उलट इंजिनीअरिंग क्षेत्रातील छ&ळ चे उदाहरण घ्या. त्यांचे बोधचिन्ह हे आखीव-रेखीव आहे, जे इंजिनीअरिंगसाठी लागणाऱ्या उपकरणांनीच चितारता येते. अशा रीतीने अप्रत्यक्षपणे कंपनी कोणत्या क्षेत्रात आहे, हे बोधचिन्हावरून सुचवले जाते.
७) बोधचिन्ह हे प्रथम पेपर / पेन्सिल वापरून कागदावर रेखाटावे. एकच बोधचिन्ह न रेखाटता, जमेल तितक्या कल्पना वापरून अनेक पर्याय रेखाटावेत. त्यातील एक-दोन निश्चित केल्यावरच त्यांना संगणकीय सॉफ्टवेअरमध्ये टाकून बारीकसारीक तपशिलांनी सजवावे.
८)  हे बोधचिन्ह कोणाचीही नक्कल (अगदी १० टक्केसुद्धा) वाटता कामा नये, याची पुरेपूर काळजी घ्यावी.
९) बोधचिन्ह हे त्या क्षेत्रातील जाणकारांकडून / प्रशिक्षित लोकांकडून बनवून घ्यावे. हौशी-नवख्या लोकांनी चितारलेल्या बोधचिन्हात व्यावसायिकता प्रतिबिंबित न होण्याची शक्यता असते. लक्षात ठेवा बोधचिन्ह हे कंपनीची तहहयात ओळख असते तेव्हा इथे कोणत्याही प्रकारची तडजोड नको.
१०) बोधचिन्ह हे चित्र व शब्दांचे मिळून बनू शकते. अशा वेळी चित्राच्या मध्ये शब्द लिहिणे टाळा. शब्द चित्राच्या खाली, वर किंवा बाजूला असावेत. उदा. प्युमाचे बोधचिन्ह, लॅकोस्टेचे बोधचिन्ह.
११) कधीही लोगोला चौकटीमध्ये (फ्रेममध्ये) बंदिस्त दाखवू नये. त्यामुळे त्याचा उठाव कमी होतो.
१२) subtraction या प्रकारामध्ये बोधचिन्ह निश्चित करण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासले जाते. अनावश्यक किंवा गर्दी वाढविणाऱ्या शब्दांना, रंगांना, कलाकुसरीला वगळले जाते. उदा. वेन्डी हॅमबर्गरच्या बोधचिन्हातून अनावश्यक कलाकुसर, शब्द व चौकट गाळून बोधचिन्हाला सुटसुटीत, मोकळेढाकळे बनवले गेले.
१३) ‘लॉक अप व्हर्जन’ या प्रकारात बोधचिन्हामध्ये चित्र व शब्द दोन्ही वापरता येतात, पण गरज पडल्यास केवळ शब्द किंवा केवळ चित्र वापरूनदेखील मूळच्या बोधचिन्हाची ओळख पटवून दिली जाऊ शकते. उदा. नाइकेच्या बोधचिन्हामध्ये स्वूश अर्थात (बरोबरची खूण) व जस्ट डू इट हे शब्द असतात, पण केवळ बरोबरची खूण वापरून किंवा केवळ शब्द वापरूनही नाइकेच्या ब्रँडची ओळख ताजी करून देता येते. जेव्हा शब्द व चित्र एकत्र असतात तेव्हा लॉक अप व्हर्जन तयार होते. दुसरे उदा. एअर इंडियाचे बोधचिन्ह ज्यात शेपटीचे चित्र व शब्द दोन्ही असतात. तर मग पुढच्या वेळी बोधचिन्ह तयार करताना या गोष्टी ध्यानात ठेवणार ना?