Success Story Of IPS Shakti Awasthi : यूपीएससी म्हणजेच नागरी सेवा परीक्षा ही सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. ही परीक्षा पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते. तिसरा टप्पा म्हणजे मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची कोणालाच काही कल्पना नसते. जिथे प्रीलिम्स ऑब्जेक्टिव्ह, मुख्य परीक्षा सब्जेक्टिव्ह, व्यक्तिमत्त्व चाचणीसंदर्भातील असंख्य प्रश्न विचारले जातात. तर आज आपण अशा एका आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट जाणून घेणार आहोत. ज्यांना आयपीएस मुलाखतीत बॉलीवूडच्या चित्रपटासंबंधित (3 Idiots) एक प्रश्न विचारण्यात आला. या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव शक्ती मोहन अवस्थी, असे आहे.
शक्ती मोहन अवस्थी हे मूळचे लखनऊचे आहेत. लखनऊमध्येच त्यांनी स्वतःचे प्रारंभिक शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांनी बिहारमधील प्रतिष्ठित बीआयटी मेसरा येथून अभियांत्रिकीमध्ये बी.टेक. केले. शैक्षणिक पार्श्वभूमीने त्यांच्या यूपीएससी तयारीचा भक्कम पाया घातला.
शक्ती मोहन अवस्थी २०१८ मध्ये नागरी सेवा परीक्षा देऊन १५४ व्या रँकसह उत्तीर्ण झाले आणि स्वतःचे आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. पण, त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यांना ध्येय गाठण्यासाठी तीन प्रयत्न करावे लागले. पहिल्या प्रयत्नात त्यांनी मुलाखतीच्या फेरीत प्रवेश केला आणि दुसऱ्या प्रयत्नात त्यांची आयआरएस (भारतीय महसूल सेवा)साठी निवड झाली. मात्र, तिसऱ्या प्रयत्नात ते आयपीएस अधिकारी बनले.
एका पॉडकास्टदरम्यान, शक्ती मोहन अवस्थी यांनी त्यांच्या नागरी सेवा भरतीच्या लेखी परीक्षेसाठी दिलेल्या मुलाखतीदरम्यानची एक मनोरंजक घटना शेअर केली. यादरम्यान त्यांना ‘३ इडियट्स’ (3 Idiots) चित्रपटाबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता. बॉलीवूडच्या लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘३ इडियट्स’. या चित्रपटात अभिनेते आमिर खान, आर. माधवनबरोबर शर्मन जोशीसुद्धा मुख्य भूमिकेत होता.
तुम्ही अभिनेता शर्मन जोशी सारखे दिसता
तर “शक्ती मोहन अवस्थी अभिनेता शर्मन जोशी यांच्यासारखे दिसतात”, असे त्यांना युपीएससी मुलाखतीत सांगितले गेले. त्यानंतर “हा चित्रपट पहिला आहे का”, असेसुद्धा विचारले?’ त्यावर ‘हो’ असे म्हणत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर मुलाखत घेणाऱ्या पॅनेलने त्यांना त्या चित्रपटातील प्रसिद्ध मुलाखतीदरम्यानचा तो डायलॉग बोलून दाखवण्यास सांगितला. शक्ती मोहन अवस्थी यांनी “तुम्ही तुमचा जॉब तुमच्याकडे ठेवा, मी माझा अॅटिट्यूड माझ्याकडे ठेवतो” हा डायलॉग बोलून दाखविल्यानंतर त्यांच्या मुलाखतीचा शेवट झाला. सुरुवातीला त्यांची निवड होईल अशी त्यांना खात्रीच नव्हती. पण, त्यांना याच मुलाखतीत १९० गुण मिळाले, जे त्यांच्या आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांतील सर्वाधिक गुण होते.
सध्या शक्ती मोहन अवस्थी सेंट्रल नोएडाचे उपायुक्त म्हणून काम करीत आहेत. त्यांनी यापूर्वी आझमगड आणि मुरादाबादमध्ये सहायक पोलिस आयुक्त यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. दिल्ली नॉलेज ट्रॅकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यूपीएससी इच्छुकांना मौल्यवान सल्ला दिला की, स्टॅण्डर्ड प्रश्नांच्या तयारीवर भर द्यावा; पण लक्षात ठेवलेली उत्तरे देण्यापूर्वी सावधगिरी बाळगावी, शांतपणे व आत्मविश्वासाने बोलावे. कारण- मुलाखत ही व्यक्तिमत्त्वाची चाचणी असते. त्यांनी इच्छुकांना चेहऱ्यावर नैसर्गिक स्मित राखण्यासाठी, आत्मविश्वासाने खोलीत प्रवेश करण्यासाठी आणि संयोजित पद्धतीने बोलण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांचा प्रवास आणि सल्ला यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत यश मिळविण्यासाठी इच्छुक असलेल्या असंख्य व्यक्तींसाठी प्रेरणादायी आहे.