चॅट जीपीटीसारख्या एलएलएमकडून आपल्याला अपेक्षित असलेली कामं करून घेणं आणि या कामांमध्ये सुसूत्रता आणणं; हे एजंटिक एआयचं मुख्य काम असतं. हे काम कुठल्याही प्रकारचं असू शकतं.

एजंटिक एआय म्हणजे चॅट जीपीटी, जेमिनी यांच्यासारख्या लार्ज लँग्वेज मॉडेल्स (एलएलएम) कडून जवळपास सगळे काम करून घेणारं सॉफ्टवेअर. यासाठी आपण एजंट तयार करायचे आणि या एजंटना एलएलएमकडून काम करून घेण्यासंबंधीच्या सूचना द्यायच्या. एजंटिक एआय सॉफ्टवेअर लिहिण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी सगळ्यात पहिला पर्याय म्हणजे ‘नो कोड-लो कोड’ सॉफ्टवेअरचा असतो. याचा सोपा अर्थ म्हणजे जवळपास काहीच ‘कोड’ न लिहिता; म्हणजेच अक्षरश: शून्य प्रोग्रॅमिंग करून एजंटिक एआय सॉफ्टवेअर तयार करायचं असतं.

सॉफ्टवेअर न लिहिता सॉफ्टवेअर तयार करण्याचा हा अद्भुत प्रकार खरोखरच थक्क करून सोडणार आहे. यासाठी प्रामुख्यानं ‘एन एट एन’ नावाची वेबसाइट वापरली जाते. इथे एजंटिक एआयचं सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी दृश्य स्वरूपात सगळं उपलब्ध असतं. आपल्याला त्यामधलं जे हवं असेल ते ठोकळ्यांच्या माळेप्रमाणे एकापुढे एक असं रचत जायचं; अशी ही युक्ती असते.

अर्थातच हे अगदी इतकं सरळ-सोपं नसतं. आपल्याला यात काही ‘सेटिंग्ज’ करावे लागतात, पण ज्याला पायथन भाषा येत नाही किंवा एकूणच प्रोग्रॅमिंगचा गंधही नसतो अशा माणसालाही थोड्याशा प्राथमिक प्रशिक्षणानंतर एजंटिक एआयचे सोपे प्रकार यातून तयार करता येऊ शकतात.

व्यावसायिक प्रकारचं सॉफ्टवेअर तयार करत असताना मात्र कदाचित ‘नो कोड-लो कोड’ प्रकारचे एजंट तयार करण्यातून मर्यादा येऊ शकतात. याचं कारण म्हणजे अशा प्रकारे एजंट तयार तर होतात; पण कदाचित खूप क्लिष्ट प्रकारचं काम या एजंटकडून करून घ्यायचं असेल तर कदाचित काही विशिष्ट प्रसंगांमध्ये या ‘लो कोड-नो कोड’ प्रकारात आपल्याला हवी असलेली लवचिकता मिळू शकत नाही. अशा वेळी एजंट तयार करण्यासाठी आपल्याला प्रोग्रॅम म्हणजेच ‘कोड’ लिहिण्याचाच पर्याय वापरावा लागतो. तरीसुद्धा एजंटची संकल्पना, तो तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी अशा मुद्दयांसंबंधीची चांगल्यापैकी जाण ‘नो कोड-लो कोड’ पर्यायातून उपलब्ध होऊ शकते. तसंच अतिक्लिष्ट प्रकारचे एजंट वगळता इतर जवळपास सगळ्या प्रकारचे एजंट यातून तयार होऊ शकतात.

एजंटिक एआय तयार करण्यासाठीचा दुसरा पर्याय म्हणजे ‘ओपन एआय’चा वापर करणं. जगप्रसिद्ध चॅट जीपीटी तयार करणारी कंपनी म्हणजे ‘ओपन एआय’. या कंपनीनं ज्या प्रकारे कुणालाही कुठल्याही प्रकारची माहिती मिळवण्यासाठी चॅट जीपीटीचं तंत्रज्ञान जगासमोर खुलं करून दिलं, त्याच्याच जोडीला सॉफ्टवेअर लिहित असलेल्या प्रोग्रॅमर मंडळींना त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये चॅट जीपीटीसारखी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठीसुद्धा उपाययोजना केलेल्या आहेत.

त्या वापरून एजंटिक एआयचं सॉफ्टवेअर तयार करता येतं. म्हणजे समजा मागे उदाहरण दिलं होतं त्याप्रमाणे आपल्याला गुंतवणूकयोग्य अशी सर्वोत्तम कंपनी कुठली; याचं उत्तर हवं असेल तर त्यासाठी आपण एजंट सॉफ्टवेअर लिहू शकतो. हा एजंट आपल्याला हवी असलेली सगळी माहिती मिळवून, त्यामधली नेमकी वेचक माहिती निवडून, त्याचं विश्लेषण करून, शेवटी आपल्यासमोर नेमकं उत्तर ठेवण्यासाठी चॅट जीपीटीकडे जाऊ शकतो. हे कसं साधणार? कारण चॅट जीपीटीला वापरायचं तर तर आपल्याला त्याची वेबसाइट उघडून तिथे आपला प्रश्न टाईप करावा लागतो. यासाठीच एजंट सॉफ्टवेअरमध्ये चॅट जीपीटीला वापरण्यासाठीचा प्रश्न आपण भरू शकतो आणि पाठवू शकतो; म्हणजे यासाठी चॅट जीपीटीची वेबसाइट प्रत्यक्ष उघडून त्यात प्रश्न टाईप करत बसण्याची गरज उरत नाही. ते काम आपल्या वतीनं एजंटच करतो.

या सगळ्यातून एजंटची संकल्पना आपल्या लक्षात आली असेल. चॅट जीपीटीसारख्या एलएलएमकडून आपल्याला अपेक्षित असलेली कामं करून घेणं आणि या कामांमध्ये सुसूत्रता आणणं; हे एजंटिक एआयचं मुख्य काम असतं. हे काम कुठल्याही प्रकारचं असू शकतं.

उदाहरणार्थ सहल आयोजित करत असलेल्या कंपनीला आपल्या ग्राहकांच्या पसंतीनुसार त्यांना सहलीचं वेळापत्रक आखून द्यायचं असेल तर त्यासाठी ग्राहकांना हव्या असलेल्या गोष्टी कोणत्या ही माहिती ग्राहकांकडून घेऊन ती एलएलएमकडे पाठवून द्यायची आणि त्याला छानशी सहल घडवून आणण्यासाठीचं वेळापत्रक बनवायला सांगायचं. अशी असंख्य उदाहरणं घेता येतील.

akahate@gmail.com