अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या अर्थव्यवस्था घटकाची तयारी कशी करावी याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. अर्थव्यवस्था घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहीत करण्यात आला आहे:
अ) भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्याोग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी
ब) शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी
मुद्देनिहाय तयारी कशी करावी ते पाहू.
राष्ट्रीय उत्पन्न, परकीय व्यापार, मुद्रा, बँकिंग आणि राजकोषीय नीती:
राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. सकल देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी), सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीएनपी) यातील फरक समजून घेणे व त्याबाबतची अद्यायावत आकडेवारी माहीत असणे आवश्यक आहे.
भारताच्या परकीय व्यापारातील महत्त्वाचे भागीदार देश, सर्वात जास्त आयात / निर्यात होणारे देश किंवा संघटना, आयातीमधील व निर्यातीमधील सर्वाधिक मूल्य / वाटा असणाऱ्या वस्तू या बाबींचा टेबल फॉरमॅटमध्ये अभ्यास करता येईल. यातील महत्त्वाच्या बाबींची मागील वर्षाच्या आकडेवारीशी तुलना करता आल्यास उत्तम. यासाठी त्या त्या वर्षीच्या आर्थिक पाहणी अहवालातील प्रकरणे पहावीत.
हेही वाचा >>> चौकट मोडताना : ठेच खाऊन आलेले शहाणपण
चलनविषयक मूलभूत संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. त्या आधारे रिझर्व्ह बँक, तिचे अधिकार, कार्ये, विविध दर यांचा आढावा घ्यावा.
बँकिंग विषयक विविध व्याजदर, बँकिंग क्षेत्रातील महत्त्वाच्या चालू घडामोडी यांचा आढावा घ्यायला हवा.
राजकोषविषयक संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. राजकोषीय तूट, आधिक्य, त्यांचा अर्थ, कारणे, परिणाम या बाबी यापूर्वी परीक्षेत विचारल्या गेल्या नसल्या तरी प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरुन त्यांवरील प्रश्न विचारले जाण्याची शक्यता गृहीत धरायला हवी.
● शेती, उद्योग
शेती क्षेत्र याचा अर्थ प्राथमिक क्षेत्र असा घेऊन अभ्यास करायचा आहे. कृषी, पशुपालन, मत्स्यव्यवसाय या सर्व बाबींचा समावेश अभ्यासामध्ये करायला हवा.
या क्षेत्रातील वृद्धीचे ट्रेन्ड, कमी उत्पादकतेची कारणे, उत्पादनास चालना देणाऱ्या विविध योजना यांचा बारकाईने अभ्यास आवश्यक आहे.
महत्त्वाचे उद्याोग व त्यांच्यासाठी प्रसिद्ध शहरे / क्षेत्रे, महारत्न, नवरत्न, मिनीरत्न कंपन्या, सार्वजनिक उद्याोगांचे खासगीकरण धोरण, खासगी उद्याोगांचे प्रकार, उद्याोग क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीच्या मर्यादा यांचा आढावा घेणे आवश्यक आहे. प्राथमिक व उद्याोग क्षेत्राचा जीडीपी मधील वाटा, आयात व निर्यातीमधील वाटा माहीत असायला हवा.
● दारिद्य्र व बेरोजगारी:
दारिद्य्र अभ्यासासाठी नेमलेल्या समित्यांच्या अहवालातील मुख्य शिफारशी माहीत असायला हव्यात.
रोजगारविषयक सर्व मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. रोजगारविषयक निर्देशांक व ठळक अद्यायावत आकडेवारी नेमकेपणा माहीत असायला हवी.
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेची दारिद्य्रविषयक अहवाल व आकडेवारी अद्यायावत करून घ्यावी.
पंचवार्षिक तसेच इतर योजनात दारिद्य्र निर्मूलनासाठी राबवलेले कार्यक्रम त्याची उद्दिष्ट्ये आणि परिणाम यांचा आढावा घ्यावा.
रोजगार निर्मितीसाठीच्या तसेच स्वयंरोजगाराबाबबतच्या महत्त्वाच्या योजना व त्यातील तरतुदी माहीत करून घ्याव्या.
कौशल्य विकासासाठीच्या योजना व त्यातील तरतुदी माहीत करून घ्याव्या.
अशा योजनांमधील तरतुदी, लाभार्थ्यांचे निकष, लाभाचे स्वरूप, उद्दीष्टे यांचा अभ्यास आवश्यक आहे. त्यासाठी मूळ दस्तावेज पाहणे जास्त चांगले.
● लोकसंख्या अभ्यास :
सन २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीमधून एकूण लोकसंख्या, लोकसंख्यावाढीचे प्रमाण, लोकसंख्येची घनता, साक्षरता, लिंग गुणोत्तर, बाल लिंग गुणोत्तर, नागरी व ग्रामीण लोकसंख्या, नागरीकरण, अनूसूचित जाती व जमातीच्या लोकसंख्येचे प्रमाण अशा घटकांचा टेबल फॉरमॅटमध्ये नोट्स काढून अभ्यास करणे सोपे व व्यवहार्य ठरेल. या घटकांसाठी देशातील पहिल्या तीन क्रमांकावरील राज्ये, महाराष्ट्राचा क्रमांक, महाराष्ट्रातील पहिल्या तीन क्रमांकावरील जिल्हे तसेच शेवटच्या तीन क्रमांकावरील राज्ये /जिल्हे माहीत असायला हवेत.
वरील सर्व मुद्द्यांचा सन २०११ व सन २००१ मधील आकडेवारी / माहितीशी तुलना करणारा टेबल करता आल्यास तोही उपयुक्त ठरेल.
राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, धोरणाची उद्दिष्ट्ये, दीर्घकालीन आणि अल्पकालीन ध्येय. राष्ट्रीय लोकसंख्या आयोग – रचना, उद्दिष्ट्ये, कार्यपद्धती हे घटक वस्तुनिष्ठ तयारीमध्ये समाविष्ट करावेत.
जन्मदर, मृत्यूदर, जननदर, जन्मावेळचे आरोग्यमान यांबाबत ठळक बाबी व आकडेवारीचा आढावा घ्यावा.
लोकसंख्याशास्त्रातील सिद्धांत व मूलभूत संकल्पनांची ओळख करून घेतल्यास उपयुक्त ठरेल.
● शासकीय अर्थव्यवस्था
अर्थसंकल्प मुद्द्यामध्ये याबाबतची कायदेशीर प्रक्रिया, अर्थसंकल्पातील तूट/आधिक्य व त्याचे परिणाम, यातील संकल्पना समजून घ्यायला हव्यात. त्या त्या वर्षातील अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी, योजना यांचा अभ्यास गरजेचा आहे.
महसुली उत्पन्न, करांचे प्रकार व त्यांचा एकूण महसूलातील वाटा माहीत असायला हवेत.
लेखा व लेखापरीक्षण याबाबत भारताचे नियंत्रक व लेखापरीक्षक यांचे अधिकार व कार्ये समजून घ्यावीत.
● चालू घडामोडी
व्यापार सुलभता/ दारिद्र्य/ भूक/ लिंगभाव असमानता/ मानव विकास हे जागतिक निर्देशांक व त्यातील भारताची कामगिरी याचा आढावा घ्यायला हवा. याबाबत विशिष्ट उल्लेखनीय मुद्दे महित असावेत.
आर्थिक विकासामध्ये आर्थिक पाहणी अहवाल, अर्थसंकल्प, विविध आर्थिक निर्देशांक व अहवाल, पायाभूत सुविधा व इतर अर्थविषयक योजना आणि असल्यास नवे कायदे वा तरतुदी यांचा समावेश होतो. या सर्व बाबी चालू घडामोडींचाच एक भाग आहेत.