राज्य सेवा मुख्य परीक्षेतील भाषा विषयांच्या पेपरची रचना ही उमेदवारांच्या त्या-त्या भाषेतील आकलन आणि अभिव्यक्तीची क्षमता तपासण्यासाठी केलेली आहे हे लक्षात येते. यातील आकलन विषयक प्रश्नांची तयारी कशी करावी ते या लेखामध्ये पाहू.
इंग्रजी भाषा पेपरमध्ये उताऱ्यावरील प्रश्न आणि सारांश लेखन अशा दोन प्रकारे आकलनविषयक प्रश्न विचारले जाणार आहेत. आकलनासाठी देण्यात येणारे उतारे पुस्तके, वृत्तपत्रे इ. वेगवेगळ्या स्राोतांमधून घेतले जातात. याबाबत सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे दिलेले उतारे समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी शांतपणे उतारे वाचणे महत्त्वाचे आहे. पण हे वाचन व आकलन वेळेच्या मर्यादेत होण्यासाठी सराव गरजेचा आहे. आकलनाचे प्रश्न सोडवण्यासाठी कशा प्रकारे तयारी करावी ते पाहू.
उताऱ्यावरील प्रश्न
वस्तुनिष्ठ पेपरमधील उताऱ्यांवरील प्रश्न आणि वर्णनात्मक पेपरमधील प्रश्न यांमध्ये मूलभूत फरक आहे हे लक्षात घेऊन तयारी करावी लागेल. वस्तुनिष्ठ पेपरमध्ये आधी प्रश्न वाचून उतारे वाचायला सुरुवात केली आणि उत्तराचा योग्य पर्याय शोधला अशी पद्धत काही वेळा उपयोगी पडू शकते. पण वर्र्णनात्मक पद्धतीमध्ये उतारा समजून घेऊन सविस्तर उत्तरे लिहायची असतात. त्यामुळे पेपर सोडविण्याची पद्धत त्यानुसार घडविणे आवश्यक आहे. आणि त्यानुसार सराव केला पाहिजे.
नागरी सेवा परीक्षेचा पेपर पाहिला तर १५ गुणांसाठी एक असे पाच प्रश्न विचारण्यात येतात असे दिसते. राज्य सेवा परीक्षेमध्ये सध्या हा पॅटर्न असेल असे गृहीत धरुन सध्या तयारी करायला हरकत नाही. यासाठी UPSC चेच पेपर घेऊन सराव करता येईल.
१५ गुणांच्या प्रश्नांसाठी उतारा समजून घेऊन साधारणपणे १० ते १२ वाक्यात उत्तर लिहावे असे आयोगाला अपेक्षित आहे. पण हे उत्तर पाल्हाळीक किंवा मुद्द्यांची पुनरावृत्ती होऊ न देता लिहिणे आवश्यक आहे. त्यासाठी संपूर्ण उतारा व्यवस्थित वाचणे गरजेचे आहे.
५-५ गुणांच्या पाच प्रश्नांसाठी तीन उतारे अशी रचनासुद्धा शक्य आहे. २०२५च्या मुख्य परीक्षेनंतरच याबाबत स्पष्टता येईल. अशा कमी गुणांच्या प्रश्नांची उत्तरे साधारणपणे पाच वाक्यांत देणे योग्य राहील. किमान या वर्षी तरी अशा प्रकारच्या प्रश्नांची तयारी ठेवावी.
फक्त उत्तरे शोधण्यासाठी वरवर उतारा वाचणे किंवा खूप बारकाईने वाचत बसणे दोन्ही टाळायला हवे.
आधी उतारा वाचून घ्यावा. याच वेळी वस्तुनिष्ठ माहिती (एखादी यादी/आकडेवारी दिली असल्यास) तसेच संज्ञा अधोरेखित कराव्यात.
पहिल्या वाचनानंतर प्रश्न पाहावेत. काही वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले असतील तर त्यांची उत्तरे लिहून घ्यावीत.
संकल्पनात्मक व आशय विचारणारे प्रश्न पाहून त्यांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा पुन्हा एकदा वाचावा.
दुसऱ्या वाचनातून आशयाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देता येतील. उताऱ्याला शीर्षक देणे, लेखकाचा हेतू, उद्देश अशा प्रकारचे प्रश्न याबाबत विचारले जातात. शीर्षक छोटेसे व समर्पक असावे.
प्रश्नांची उत्तरे स्वत:ची शब्दयोजना करून लिहावीत. उताऱ्यातून कॉपी-पेस्ट करू नयेत.
उताऱ्यातील प्रश्नांच्या तयारीसाठी एखादी Question Bank घेऊन आधी वेळ न लावता उत्तरे लिहिण्याचा सराव करावा. उत्तरे बरोबर देण्याचा आत्मविश्वास आला की वेळ लावून सराव करावा. यानंतर काही उतारे घेऊन त्यावर स्वत:च प्रश्न तयार करायचा प्रयत्न करावा.
सारांश लेखन
साधारणपणे ८००-८५० शब्दांच्या उताऱ्याचा १/३ इतक्या शब्दमर्यादेत सारांश लिहिणे अपेक्षित आहे.
उत्तरपत्रिकेत या प्रश्नासाठी टेबलच्या स्वरूपात वेगळे पान दिलेले असते व प्रत्येक चौकोनात एकच शब्द लिहायचा असतो. त्यामुळे टेबलच्या किती ओळींमध्ये तुमचा सारांश पूर्ण होईल, हे लक्षात येते.
काही उमेदवार एक-एक परिच्छेद वाचून त्याचा सारांश लिहित जाण्याची पद्धत वापरतात. मोठ्या आणि सविस्तर उताऱ्यांच्या सारांश लेखनासाठी काही वेळा ही पद्धत सोपी वाटते. पण यामध्ये प्रत्येक परिच्छेदाचा एक तृतीयांश सारांश लिहायचे अतिरिक्त ओझे तयार होते आणि त्यासाठी त्याचे शब्द मोजण्यात अनावश्यक वेळ वाया जातो. शिवाय एखादे वेळेस एखाद्या सात -आठ वाक्याच्या परिच्छेदामध्ये एखादेच वाक्य /मुद्दा महत्वाचा असेल तर एखाद्या परीच्छेदातील प्रत्येक वाक्य/मुद्दा उताऱ्याच्या आशयानुसार महत्त्वाचे असू शकते.
त्यामुळे आधी संपूर्ण उतारा वाचून उताऱ्यातील कोटेशन्स, मुद्दा समजावून देण्यासाठी उद्धृत केलेली उदाहरणे, याद्या, सविस्तर आकडेवारी इ. अधोरेखित करून ठेवावे. उताऱ्याच्या विषयानुसार यातील बहुतांश मटेरिअल प्रत्यक्ष सारांश लिहिताना गाळून टाकावे लागणार आहे.
संपूर्ण उतारा वाचून समजून घेतल्यावर एकेका परिच्छेदाचा सारांश लिहीत जावा किंवा शब्द मर्यादा लक्षात ठेवून आपली स्वत:ची रचना करुन सारांश लिहावा. विचारले असेल तरच समर्पक शीर्षक द्यावे.
सारांश आपल्या शब्दांत लिहावा पण स्वत:चे मतप्रदर्शन, संज्ञा, संकल्पनांचे स्पष्टीकरण करु नये.
आकलनाच्या सरावासाठी वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधील संपादकीय/अग्रलेख, मासिकांतील लेख यांचे सारांश लेखन करायला हवे. steelframe.india@gmail.com
