डॉ मिलिंद आपटे
१) माझे वय २५ वर्षे आहे. मी २०२२ ला अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मी काम केले पण माझे मन तिथे लागत नसल्यामुळे मी आता एमपीएससीचा अभ्यास सुरू केला आहे, तर माझा खूप गोंधळ उडतो आहे. नेमके काय वाचायचे, कोणता विषय महत्त्वाचा आहे, मला काही कळत नाही. सर मला माझ्या वयानुसार मी कसा अभ्यास करायला पाहिजे, त्याबाबत कृपया मार्गदर्शन करा.- कुणाल शेंडे
तुमची अभियांत्रिकीमधील पदवी व विषय सांगितला नाहीत, आपण जे काम केलेत त्याचे स्वरूप संगितले नाहीत, त्यामुळे मन का लागत नव्हते त्याचा अंदाज किंवा त्यामागील मानसिकता मी समजू शकलो नाही आता सुद्धा तुमचा गोंधळ उडतो त्याच्या कारणाचा अंदाज मी बांधू शकत नाही त्याकरता तुम्हाला समुपदेशनाची गरज आहे असे प्रथम दर्शनी दिसतेय. असो. एमपीएससीचा अभ्यास हा वयानुसार नसतो तो सगळ्यांना सारखाच असतो. तुम्ही निर्णय घेतलाय त्यामुळे काही टिप्स देतो त्याचा उपयोग होईल.
सर्वात प्रथम राज्य सेवा पूर्वपरीक्षेसाठी ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाचे मन लावून वाचन करावे. मागील कमीत कमी दहा वर्षांतील प्रश्नपत्रिकांचे संकलन आणि वाचन, प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण अध्ययन साहित्य जमवणे, अभ्यास नियोजन, सराव प्रश्नपत्रिका सोडवणे. बाजारात उपलब्ध असलेल्या मार्गदर्शक साहित्यावर अवलंबून न राहता विषयांची संदर्भ पुस्तके वाचणे उत्तम. जसे विज्ञान, भूगोल या विषयांसाठी आठवी ते दहावीपर्यंतच्या शालेय पाठ्यपुस्तकांचे वाचन. प्रत्येकाने आपल्या वाचनाचा, पाठांतराचा वेग लक्षात घेऊन अभ्यासाचे नियोजन करावे. ठरावीक दर्जेदार पुस्तकांचीच उजळणी करणे उत्तम . सुरुवातीला प्रत्येक घटकाचे प्राथमिक वाचन करावे. मग द्वितीय वाचन शांतपणे करावे. यात न समजलेला भाग अधिक चांगल्या पद्धतीने वाचण्यावर भर द्यावा.
२) मी २६ वर्षीय एलएलएमचा पदव्युत्तर पदवीधारक (२०२५) आहे. मी पुढील वर्षी यूपीएससी सीएसई परीक्षा देण्याचा प्रयत्न करणार आहे. मला केवळ दोनच प्रयत्न, तेही अत्यंत गांभीर्याने करायचे आहेत. यशस्वी झालो नाही तर माझ्याकडे ‘प्लान बी’ तयार आहे. मी अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी ठेवू, कशी सुरुवात करू? – दिनेश चकाते
— एलएलएम झाल्यानंतरचा आपला प्लान चांगला आहे आणि आक्रमक आहे, अशा विचारांनी पुढे जाणे एका अर्थी चांगले, पण यामध्ये एक ताण राहील त्याला सांभाळा. अभ्यासक्रम समजून घ्यावा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या यूपीएससी अभ्यासक्रमाशी परिचित होणे हे गरजेचे. यामुळे कोणत्या विषयांवर लक्ष केंद्रित करायचे हे कळेल आणि व्यर्थ बाबींवर वेळ वाया घालवण्याचे टाळता येईल. इतिहास, भूगोल, राजकारण, अर्थव्यवस्था, पर्यावरण, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी यासह प्रत्येक विषयासाठी मानक पाठ्यपुस्तके, संदर्भ पुस्तके आणि यूपीएससी अभ्यास साहित्य गोळा करावे.
दररोज एक विश्वासार्ह वर्तमानपत्र वाचण्यास सुरुवात करा आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांसाठी मासिक चालू घडामोडी मासिके वाचा. सुरुवातीस फक्त बातम्या वाचा, संपादकीय वाचणे टाळा, भारतीय राजकारण आणि अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया तयार करण्यासाठी मूलभूत पुस्तकांपासून सुरुवात करावी. इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र यासारख्या विषयांसाठी एनसीईआरटीची पाठ्यपुस्तके (सहावी ते बारावी) वाचा, कारण त्यामुळे एक भक्कम पाया तयार होतो. पर्याय कोणता निवडावा याचे उत्तर – वरील वाचन बऱ्यापैकी झाल्यावर तुम्हाला त्यातील एक विषय निवडताना मदत होईल कारण हे विषय आवडीवर अवलंबून आहे. ४८ विषयांमधून तुला निवडायचे आहे, पण कोणत्या पर्यायी विषयामधील यशस्वी होण्याचे प्रमाण जास्त आहे याचा विचार करणे उत्तम.