डॉ. श्रीराम गीत
सर, मी १२ वी सायन्सला शिकत आहे. मला यूपीएससीची तयारी करायची आहे. पण मी बारावी नंतर काय करावं, ग्रॅज्युएशन कशात करावं? यूपीएससी ची योग्य तयारी कशी करावी याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.
– शंतनु किशोर बोरवार.
शंतनू, तुझे दहावीचे, अकरावीचे कोणतेच मार्क व घेतलेले विषय असे काहीच कळवलेले नाहीस आणि बारावीनंतर मी पुढे काय शिकावे हा प्रश्न मलाच विचारत आहेस. अशा वेळी मला यूपीएससीची परीक्षा द्यायची इच्छा आहे याला मी भाबडेपणा असे म्हणतो. आत्ताच्या मिनिटाला कलेक्टर बनणे, आयएएस, यूपीएससी हे सर्व शब्द विसरून जावेस. फक्त बारावीच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. बारावी सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी व गणित असे चार विषय असतात. तू जे विषय घेतले असतील त्यात प्रत्येकी ७० मार्क मिळवणे हे एकुलते एक ध्येय ठेव. त्यानंतर सीईटीची परीक्षा होते. पीसीबीची वेगळी व पीसीएमची वेगळी. दोन्ही नक्की दे. त्यातून तुला फार्मसी, इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर अशा स्वरूपाचे रस्ते उपलब्ध होऊ शकतात. पीसीबीमध्ये उत्तम मार्क मिळवून नीटमध्ये पाचशे गुण मिळवू शकलास तर मेडिकल वा पॅरा मेडिकलचा विचार करता येऊ शकेल. कला शाखेत बीएचा विचार नको. करियर मंत्र वाचणाऱ्या अन्य वाचकांनी स्वत:बद्दलची माहिती विषय वारी, मार्कानुसार कळवावी म्हणजे उत्तर देणे जास्त नेमकेपणाने मला शक्य होईल. उत्तराच्या गरजेनुसार फक्त माहिती छापली जाते. बाकीची माहिती गोपनीय ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो.
हेही वाचा >>> करिअर मंत्र
माझा मुलगा ७८ टक्के घेऊन बारावी झाला. सीईटीला ९१ टक्के मिळाले आणि जेईईला ७५ टक्के मिळाले. हे जे टक्के मिळाले ते काही खास अभ्यास न करता मिळाले आहेत, खेळताना पडल्यामुळे ४ महिने घरीच होता. त्यामुळे कॉलेज चागलं मिळाल नाही म्हणून १ वर्ष गॅप देऊन घरी ऑनलाईन अभ्यास सुरू आहे,मनाने करतो लक्ष देण्याची गरज पडत नाही, सुरुवातीला एनडीएबद्दल त्याचा विचार आहे. बारावी आणि जेईईच्या टक्क्यांवरती एसएसबी देऊन आला. पण निवड नाही झाली. पण चांगलं कॉलेज मिळावं म्हणून मी स्वत: सर्च यूट्यूब वर केले असता बिट्स पिलानी कॉलेज सारखे आलेत जिथे २५ ते ३० लाख खर्च आहे, जे मी अफोर्ड करू शकतो पण त्यांच्या सांगण्यानुसार प्लेसमेंट नक्की मिळते काय? एनडीएची तयारी करू द्यायची काय? की दुसरे काही उत्तम राहील यावर मार्गदर्शन करावे. मुलगा हुशार आहे सर फक्त चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे.
– ओंकार मठपती. आपला प्रश्न माझ्याकडे नुकताच आला आहे. आपण तो कधी विचारला आहे व मुलगा कधी बारावी झाला आहे या सगळ्याचा संदर्भ मला लागणे जरा कठीण जात आहे. मी गृहीत धरलेल्या गोष्टी पुढील प्रमाणे. मागील महिन्यात झालेल्या एनडीए व नेव्हीच्या प्रवेश परीक्षेत त्याला यश मिळालेले नाही. बिटस् पिलानीचे प्रवेश त्यांचे परीक्षेतून आहेत. मुलाचे आजवरचे सगळे मार्क चांगले आहेत. पण बिटसचा रस्ता तीव्र स्पर्धेतून सुरू होतो. पैशातून नाही. आयआयटी खालोखाल ते संपतात. एक साधासा रस्ता मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग चांगल्या सीजीपीएने म्हणजे साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान ठेवून त्याने पूर्ण करावे. त्यानंतरचे चार वर्षात त्याला इंजिनीअरिंग पदवीधर म्हणून आर्मी नेव्ही एअर फोर्समध्ये कमिशन घेता येऊ शकते. अन्यथा चांगल्यापैकी नोकरी मिळू शकते किंवा एमएस करायला तो अमेरिकेत जाऊ शकतो. बारावी नंतरचा डिफेन्सचा प्रवेश हा खूप कठीण असतो. मात्र पदवीधर म्हणून आपल्याला प्रयत्न करण्याकरता वयानुसार समज व क्षमता वाढल्यानंतर तीन ते चार वेळा संधी मिळते. या दिशेने आपला विचार व चर्चा असावी.