Foreign universities coming to India : भारतातील विद्यार्थ्यांना आता उच्च शिक्षणासाठी आपला देश सोडण्याची गरज भासणार नाही, कारण भारतातच आता जागतिक दर्जाच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी पाच विद्यापीठे सुरू होणार आहेत. राज्य शासनाच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत या परदेशी विद्यापीठांना त्यांच्या कॅम्पस स्थापनेसाठी आशयपत्र (LOIs) प्रदान करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पाचही परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस महाराष्ट्रातील नवी मुंबईत उभारण्यात येत आहेत.
मुंबईतील हॉटेल ताज येथे ‘मुंबई रायझिंग : क्रिएटिंग अॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत या पाच जागतिक विद्यापीठांना (एलओआय) आशयपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय शिक्षण सचिव तथा विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष विनित जोशी, अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल तसेच पाचही परदेशी विद्यापीठांचे मुख्य अधिकारी उपस्थित होते.
पाच परदेशी विद्यापीठांची नावं
१) अॅबर्डीन विद्यापीठ (University of Aberdeen), युनायटेड किंगडम
२) युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (University of York), युनायटेड किंगडम
३) युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (University of Western Australia), ऑस्ट्रेलिया
४) इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (Illinois Institute of Technology), अमेरिका
५) इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन (Istituto Europeo di Design – IED), इटली
तर वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ चेन्नईमध्येदेखील स्वतःचे कॅम्पस स्थापन करणार आहे.
प्रवेश कधी सुरू होईल?
यूजीसीकडून एलओआय जारी झाल्यानंतर या विद्यापीठांना आता त्यांच्या तयारीला अंतिम रूप देण्यासाठी सुमारे १८ महिने आहेत. असे सांगितले जाते की, या विद्यापीठांमध्ये पहिले प्रवेश सत्र डिसेंबर २०२६ पूर्वी सुरू होऊ शकते.
कुठे उभी राहणार ही पाचही परदेशी विद्यापीठे?
ही सर्व परदेशी विद्यापीठे नवी मुंबईजवळ बांधल्या जाणाऱ्या एका विशेष शैक्षणिक क्षेत्रात स्थापन केली जातील, ज्याला ‘आंतरराष्ट्रीय शिक्षण शहर’ असे नाव देण्यात आले आहे. हे शैक्षणिक शहर सिडकोद्वारे (महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ) उभे केले जात आहे. सुमारे पाच किलोमीटर परिसरात एकूण १० परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस स्थापन करण्याची योजना आहे.
हे भारतातील पहिलेच शैक्षणिक केंद्र असेल, जिथे विद्यार्थी परदेशात न जाता जागतिक दर्जाचे शिक्षण घेऊ शकतील.