या सदरात आपण नवउद्यामींची ओळख करून घेतो. नव्या दमाच्या तरुणांमध्ये सळसळता उत्साह असतो. पण वयाच्या ५८ व्या वर्षी नवोन्मेषाने भारलेल्या डॉ. हर्ष सेठी यांनी आपल्या संशोधनाचे पेटंट घेऊन त्रिनॅनो टेक्नॉलॉजीज प्रा. लि.हे स्टार्टअप सुरू केले. सौरऊर्जेसाठी लागणाऱ्या पॅनेलवरच्या विशिष्ट प्रकारच्या कोटिंगचे संशोधन त्यांनी केले. या कोटिंगमुळे सौर पॅनेलचे आयुष्य तर वाढतेच शिवाय कार्यक्षमतेतही वाढ होते. सेठी यांच्या या प्रवासाबद्दल जाणून घेऊ त्यांच्याच शब्दांत…

माझा जन्म मुंबईतला, पण वडील नोकरीनिमित्त अजमेरला होते, तेथेच माझे शालेय शिक्षण झाले. नागपूर व्हीएनआयटी मधून मी मटेरिअल सायन्स अँड मेटलर्जीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. २०१९ मध्ये अमेरिकन नॅशनल युनिव्हर्सिटीमधून मॅनेजमेंट विषयात पीएचडी केली. पदवीनंतर दोन-तीन वर्षे नोकरी केली. पण नोकरीत मन कधी रमलं नाही. एकासोबत भागीदारीत काम सुरू केलं होतं, माझा नफ्यात ७ टक्के वाटा होता. नवी मुंबईत तो कारखाना होता, पण त्या मुख्य भागीदाराचे निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलांनी कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुन्हा सहा महिने नोकरी केली. पुन्हा व्यवसायाकडे वळलो. त्या तीन वर्षात तीन-चार प्रकारचे मटेरिअल सायन्सशीच निगडित व्यवसाय करून पाहिले. पण कोणताही व्यवसाय करायचा तर भांडवलाचा प्रश्न यायचा. बँकेकडून त्या काळात (९० च्या दशकात) कर्ज मिळणंही सुलभ नव्हतं. घरी पैसे नव्हते. मी अवघ्या १५ हजारातून एक व्यवसाय सुरू केला होता. सर्व व्यवसायांनी भांडवलाअभावी सुरू होताच काही महिन्या, वर्षांत मान टाकली. मग पुन्हा सहा-सात वर्षे नोकरी केली आणि ठरवलं की आधी भांडवलं उभं करायचं आणि मगच व्यवसाय सुरू करायचा.

अक्षय्य ऊर्जेला चालना

१९९९ मध्ये मी निऑन इन्फोटेक नावाची कन्सल्टिंग कंपनी सुरू केली. कंपनीचा मालक, कामगार सर्व काही मी एकटाच होतो. मोठ्या कंपनींना आपण लक्ष्य करायचे असे ठरवले. पहिली ऑर्डर मला तीन वर्षांनी आली. तोपर्यंत मी महिन्याची गुजराण करण्यासाठी पार्ट टाइम लहान लहान नोकऱ्या करायचो. पत्नीने हातभार लावला. २००७ पर्यंत ही कंपनी सेट झाली आणि त्याची वाढ होऊ लागली. मुंबई, जयपूर, बंगळुरूत छोटी कार्यालये उघडली.

देशाबाहेर म्यानमारमध्येही सेवा दिली. थायलंडमधील कंपन्यांना माझी कंपनी इंजिनीअरिंग सॉफ्टवेअर सोल्युशन्सचे पर्याय देत असे. तेव्हा तेलाच्या किमती वाढू लागल्याने सरकारने इथेनॉल आणि अन्य अक्षय्य पर्यायी ऊर्जेला प्रोत्साहन देणे सुरू केले. सौर ऊर्जेसाठी खूप सवलती दिल्या.

संशोधनाला सुरुवात

आमची एक ग्राहक तेल कंपनी कोकणात होती. त्यांनी आम्हाला सोलर प्लान्ट लावण्यास सांगितले. पण ग्रामस्थ त्या सोलर पॅनेलच्या वर चढून ते साफ करायचे. त्यामुळे पॅनेलला सूक्ष्म भेगा पडल्या. कंपनीने आम्हाला प्रोडक्ट आणखी विकसित करायला सांगितले. दरम्यानच्या काळात एका सेमिनारमध्ये माझ्या अन्य दोनपैकी एक सहसंस्थापक डॉ. अंशु दांडिया यांच्याशी माझी ओळख झाली. त्या हरित रसायनांमधील तज्ज्ञ आहेत. तिसरे सहसंस्थापक डॉ. तनुज्जल बोरा हे नॅनो टेक्नॉलॉजीतील तज्ज्ञ आहेत. आम्ही तिघांनी मिळून हे कोटिंगचे संशोधन केले. २०१८ तल्या जानेवारीत आम्ही त्या कोकणातल्या कंपनीतल्या छपरावर हे पॅनेल लावले. नंतर दोन वर्षांनी कोविड आला. ते पॅनेल दोन वर्षे नीट टिकले होते. आम्ही पुन्हा त्या कंपनीकडे गेलो, तोपर्यंत त्यांचे चारपैकी दोन संचालक निवृत्त झाले होते, एक दुसरीकडे गेले. एकच राहिले, ते म्हणाले की माझा या प्रकल्पात कधीच इंटरेस्ट नव्हता. म्हणजे चार वर्षे संशोधन करूनही माझा हा व्यवसायही बसण्याच्या मार्गावर होता. समोर काहीच दिसत नव्हतं. त्या वेळी मला दिल्लीला जाण्याचा योग आला.

त्रिनॅनोचा जन्म

माझ्या एका मित्राच्या ओळखीच्या अक्षय्य ऊर्जा मंत्रालयात वैज्ञानिक आहेत. त्यांना मी आमच्या संशोधनाविषयी सांगितले. त्यांनी आम्हाला सांगितले की तुमच्या उत्पादनाची नव्याने चाचणी करावी लागेल. त्यांनी सांगितल्यानुसार आम्ही पॅनेलची चाचणी केली. त्यांनी स्टार्टअप नुसार आमच्या कंपनीचे स्ट्रक्चर बदलून नव्याने कंपनी सुरू करावी लागली. उत्पादनाचे पेटंट फाईल केले. चाचणीचे निकाल अत्यंत सकारात्मक आले. २०२२ मध्ये आमचे स्टार्टअप त्रिनॅनो टेक्नॉलॉजीज प्रा. लि. सुरू झाले. हा नॅनो कोटिंगचा थर इनऑरगॅनिक सिरामिक ऑक्साइड मटेरियल पासून तयार होतो, जो इलेक्ट्रो डिपोझिशन प्रक्रयिेद्वारे सोलर पॅनलवर लावला जातो. यामुळे दाट जंगलातही प्रकाश खेचला जातो. लाइट ट्रॅपिंग (प्रकाश शोषणे), सेल्फ क्लिनिंग (स्व-स्वच्छता) आणि अँटी रिफ्लेक्शन (प्रतिबिंब विरोधी) अशी याची तीन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत त्यावरूनच कंपनीचं नाव ‘त्रिनॅनो’ ठेवले. आता कंपनीचे अदानी, टाटा, वारी यासारख्या मोठ्या कंपन्या आमच्या ग्राहक आहेत.

कोटिंगची वैशिष्ट्ये

हे कोटिंग केसाहून कमी जाडीचे ०.४-मायक्रॉनचे असते. जेथे सोलर पॅनलवर तेथील नैसर्गिक वातावरणामुळे धूळ, रेती, आर्द्रता साचते, पक्ष्यांच्या विष्ठेमुळे पॅनलवर प्रकाशाचा अडथळा निर्माण होतो, तेथे हे विशिष्ट कोटिंग असलेले पॅनल उत्तम काम करतात. त्यांची कार्यक्षमता या कोटिंगमुळे वाढते. ऊर्जा उत्पादन ४ टक्क्यांनी वाढवते, आयुष्य २-३ वर्षे वाढवते आणि स्वच्छता आवश्यकता ५५ टक्क्यांनी कमी करते. राजस्थानचे रेतीने भरलेले वातावरण असो की मुंबईतील आर्द्रता, कोणत्याही वातावरणात हे त्रिनॅनो टेक्नॉलॉजीज प्रा. लि. कंपनीने बनवलेले कोटिंग उत्कृष्ट काम करते. कंपनीने या तंत्रज्ञानाचे पेटंटही दाखल केले आहेत.

कंपनीला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सन्मान मिळाले. फोर्ब्र्ज इंडिया मॅगझिनमध्ये १०० भारतीय स्टार्टअपच्या यादीत त्रिनॅनोचा समावेश झाला.

तरुणांना मार्गदर्शन

आव्हाने अनेक असतात. पण आपला स्वत:वर विश्वास असला पाहिजे. उद्याोगाची मानसिकता तर हवीच, पण चिकाटी हवी. तुमचे तंत्रज्ञान सिद्ध झाले तरी त्याचे व्यवसायात रुपांतर होण्यास वेळ लागतो. तेवढा धीर धरायला हवा.

(शब्दांकन : मनीषा देवणे)