डॉ.भूषण केळकर,  डॉ.मधुरा केळकर
आपण मागील लेखात २०३० मध्ये कोणती कौशल्ये महत्त्वाची असतील हे बघितले. आज आपण नोकरीचे स्वरूप कसे बदलते आहे त्याचे काही वर्तमान आयाम पाहू. त्यावरून एआय यापुढे शिकणे कसे अत्यावश्यक असेल हेही स्पष्ट होईल. चीनच्या ‘डार्क फॅक्टरी’सारख्या फॅक्टरी भविष्यात उभ्या राहिल्या तरी आपले करिअर त्यात झाकोळले जाऊ नये याची काळजी घ्यायला हवी.

अॅक्सेंचर या ग्लोबल कन्सल्टिंग व तंत्रज्ञान सेवा पुरवठादार कंपनीने अलीकडच्या तिमाहीत ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढल्याचे जाहीर केले आहे. कंपनीने हे स्पष्ट केले आहे की कर्मचाऱ्यांना एआय आणि डेटा-संबंधित कामांमध्ये रीस्किलिंग (पुन्हा कौशल्य प्रशिक्षण) करण्याचा प्रयत्न केला आहे, पण ज्या कर्मचाऱ्यांमध्ये त्यासाठी क्षमता दिसली नाही, त्यांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला गेला. ‘इंटेल’चे नवीन सीईओ यांनी हे ठरवले की कंपनी वेगाने अधिक कार्यक्षम, कमी खर्चातील रूपात काम करेल, आणि त्यासाठी विपणन कामे एआयकडे हस्तांतरित करेल. ‘इंटेल’च्या या निर्णयामुळे विपणन टीमचा आकार कमी होण्याची शक्यता आहे. ‘मायक्रोसॉफ्ट’मध्ये देखील नुकतच पंधरा हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले, आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ यांनी म्हटले आहे की जरी कंपनी नफ्यात वाढ करत आहे, तरीही नोकरकपात आवश्यक आहे कारण ग्राहकांच्या गरजांनुसार कामाचा स्वरूप बदलत आहे.

भारतामध्ये ‘टीसीएस’ या आयटी कंपनीने सुमारे १२,००० कर्मचारी (२ कामगार) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीएसने हे म्हणाले आहे की हे ‘स्कील्स मिसमॅच’ आणि ‘प्रोजेक्ट नसणे’ या कारणांमुळे आहे.

पण तज्ज्ञांचे मत आहे की ही कर्मचारी कपात एआय-ऑटोमेशन आणि कामाच्या स्वरूपातील बदल यामुळेच होत आहेत. अनेक एकजिनसी कामे — कोडिंग, सॉफ्टवेअर टेस्टिंग, इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट — हे एआयच्या मुळे कार्यक्षमतेने केले जाऊ शकतात. खरंतर, काही अंदाजांनी असे सांगितले जाते की पुढील २-३ वर्षांत चार ते पाच लाख आयटी कामे भारतात कमी होऊ शकतात. म्हणून ही सर्व उदाहरणे हे दर्शवतात की एआयमुळे नोकरकपात ही एक सामान्य दिशा होत आहे !!

‘अँथ्रोपिक’चे सीईओ-डारिओ अमोदेइ यांनी अलीकडच्या काळात स्पष्ट इशारा दिला आहे की एआय मधील प्रगतीमुळे एंट्री-लेव्हल व्हाइट-कलर नोकऱ्यांपैकी ५० कामे पुढील ५ वर्षांत नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यांनी अशी शक्यता मांडली की बेरोजगारी दर १०-२० पर्यंत जाऊ शकतो. ‘ओपन एआय’चे सीईओ- सॅम ऑल्टमन यांनी सुद्धा हे म्हटले आहे की काही क्षेत्रे पूर्णपणे नष्ट होतील — म्हणजेच त्या क्षेत्रांत मानवी कामगारांची आवश्यकता पूर्णपणे संपेल.

हे फक्त आयटीमध्येच घडते आहे असे नाही तर अमेरिकन टॅरिफ वगैरे प्रकारांमुळे अन्य क्षेत्रात सुद्धा हे घडते आहे. या सर्व घटनांमुळे भारतातील आयटी क्षेत्रामध्ये व अन्य क्षेत्रात पण एक अस्थिर स्थिती निर्माण झाली आहे — ‘‘माझी नोकरी सुरक्षित आहे का?’’ — असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे.

आजच्या लेखाचे शीर्षक आहे ‘‘डार्क फॅक्टरी ‘‘ याचे कारण म्हणजे आता चीन सारख्या देशात पूर्णपणे स्वयंचलित फॅक्टरीच्या फॅक्टरी उभी राहिली आहे की ज्यात दिवेच नाहीत! दिवे का नाहीत तर तिथे जिवंत कर्मचारीच लागत नाहीत आणि मशीन २४ तास वायरलेस सिग्नलनी एकेमएकांशी बोलून काम करत राहतात. प्रकाश लागतच नाही आणि म्हणून ‘‘डार्क फॅक्टरी’’ !!

एआयमुळे नोकरी कमी होण्याचा धोका ही नुसती कल्पना नसून —आयटी सकट डार्क फॅक्टरीसारखे सर्वच उद्याोग, तंत्रज्ञान व व्यवस्थापनाच्या निवडींमध्ये प्रत्यक्ष दिसणारी वास्तवता आहे आणि महाराष्ट्र-भारतही यापासून वंचित राहणार नाही. यामुळे सर्वात पहिले नोकरी गमावणारे म्हणजे एंट्री लेव्हल, मध्यम स्तरातील कर्मचारी सर्वाधिक असतील. यावर उपाय म्हणजे लोकांना नवी कौशल्य शिकावी लागतील आणि एआय, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, क्लाउड कौशल्ये आत्मसात करून निरंतर शिक्षण करावे लागेल. म्हणूनच आपण या पुढील काही लेखात नेमकी कोणती एआय टूल्स वापरायला हवीत हे तपशीलात जाऊन शिकू.

bhooshankelkar@hotmail.com/mkelkar_2008@yahoo.com