व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी उमेदवारांना मार्गदर्शन करताना उमेदवारांच्या अनेक समस्या आमच्यापुढे येत असतात. यातल्या काही समस्या आणि त्यांचा सामना कसा करायचा हे आजच्या लेखात आपण पाहणार आहोत.

बहुतेक वेळा उमेदवारांच्या बाबतीत हे होतं की विषयाची तयारी व्यवस्थित केलेली असते, सगळी माहिती उमेदवारांकडे असते, विषयाचे सर्व पैलू माहीत असतात. पण प्रत्यक्षात प्रश्न विचारला जातो तेव्हा नेमकं उत्तर देता येत नाही. किंवा कोणते मुद्दे मांडायचे आणि कोणते नाही याबाबत गोंधळ होतो. त्यामुळे उत्तरामध्ये सुसूत्रता येत नाही. आणि एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर नीट देता आलं नाही की उमेदवाराचा आत्मविश्वास जातो.

रशिया-युक्रेन युद्धाबद्दल तुमचं काय मत आहे किंवा इस्रायल-हमास संघर्षाबद्दल तुमचं काय मत आहे हा बऱ्याच वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घडामोडींनुसार अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जाण्याच्या शक्यता असतात. अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये भारताची अधिकृत भूमिका काय आहे हे मांडणं महत्त्वाचं असतं. रशिया युक्रेन प्रश्नांना हे सांगणं महत्त्वाचं आहे की कोणत्याही प्रकारच्या हिंसेला भारताचा विरोध आहे. त्यामुळे युद्ध थांबवून सामोपचाराने प्रश्न सोडवण्याला भारताचा पाठिंबा आहे.

दोन देशांच्या प्रश्नामध्ये भारताने हस्तक्षेप करणं योग्य नाही, परंतु भारत जागतिक शांततेचा पुरस्कार करत असल्यामुळे दोन्ही देशांनी चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवावा हीच भूमिका योग्य आहे. यात मग असे उपप्रश्न विचारले जाऊ शकतात की रशिया आणि भारताचे सौहार्दाचे संबंध बऱ्याच वर्षांपासून आहेत मग भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर रशियाला पाठिंबा द्यायला नको का? या प्रश्नाचं उत्तर मुद्देसूद द्यायला पाहिजे. भारताचे आणि रशियाचे संबंध मैत्रीपूर्ण आहेतच आणि राहतीलही पण जागतिक शांतता हे महत्त्वाचं तत्व आहे आणि भारत त्या तत्त्वाशी तडजोड करणार नाही. भारत आणि रशियामध्ये अनेक स्तरांवर व्यापार सुरू असतो आणि तो दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा आहे. जागतिक शांतता आणि सलोखा हा सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. त्याचा व्यापार सुरळीत चालण्याशीही संबंध आहे.

इस्रायल-हमास याबद्दलही भारताने डी-हायफनेशन ( De- hyphenation) ला आंतराराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा दिला आहे. म्हणजे दोन राष्ट्रमध्ये संबंध तणावाचे असले तरी भारताचे या दोन्ही राष्ट्राशी सौहार्दाचे संबंध आहेत. हा मुद्दा सर्वात पहिल्यांदा नमूद केला पाहिजे. त्यानंतर सामोपचाराने आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवले पाहिजेत या मुद्द्याचा उल्लेख केला पाहिजे.

कोणत्याही प्रश्नामध्ये उमेदवाराला त्याचं मत विचारलं असलं तरी ते मांडण्यापूर्वी भारताची अधिकृत भूमिका सांगितली पाहिजे. त्या भूमिकेला जर उमेदवाराचा पाठिंबा असेल तर त्याने ते स्पष्ट केले पाहिजे. परंतु उमेदवाराचे मत भारताच्या अधिकृत भूमिकेपेक्षा वेगळे असेल तर त्याची सगळी कारणमीमांसा तयार असली पाहिजे. आणि ही भूमिका अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने आणि नम्रपणे मांडता आली पाहिजे. उमेदवाराला मत विचारले असेल तरच त्याने आपले मत मांडावे नाहीतर भारताची अधिकृत भूमिका मांडून उत्तर संपवले पाहिजे.

आपली मते हिरिरीने मांडायची कितीही इच्छा असली तरी उमेदवाराने प्रश्न व्यवस्थित ऐकूनच उत्तर दिले पाहिजे. अशा प्रश्नाचे उत्तर देताना शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्वरित उपाय आणि दीर्घकालीन उपाय या पद्धतीने ते मांडावे. उत्तर देत असताना शांतचित्ताने आणि संयत पद्धतीने बोलणे महत्त्वाचे आहे. रशियाने सरळ युक्रेन ताब्यात घेतला पाहिजे यासारखी आक्रमक वा एकाकी विधाने अजिबातच करू नयेत. समतोल उत्तर देण्याकडे उमेदवाराचा कल असला पाहिजे.

भारत पाकिस्तान संबंधांबद्दलही प्रश्न विचारले जाऊ शकतात. इथेही मत विचारले असेल तरच व्यक्त करावे नाहीतर भारताची अधिकृत भूमिका काय, या प्रश्नाचे वेगवेगळे अँगल्स याबद्दल बोलून उत्तर संपवावे. भारत पाकिस्तान प्रश्न सोडवण्याच्या बाबतीतही भारताची भूमिका ही हिंसेच्या आणि पाकिस्तानचा पाठिंबा असलेल्या दहशतवाद्यांच्या कारवायांविरोधातच राहिली आहे. भारताच्या सुरक्षेला आणि स्वायत्ततेला धोका असेल तर स्वसंरक्षणाचा मार्ग भारत स्वीकारू शकतोच.

दहशतवादाला ठोक प्रत्युत्तर आणी चर्चांच्या माध्यमातून प्रश्नांची सोडवणूक याला महत्व देत भारताने कायमच या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणे टाळले आहे. अशाप्रकारे उत्तर देणे हे केव्हाही योग्य ठरते. यावर अर्थातच अनेक उपप्रश्न-प्रतिप्रश्न विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ. भारत पाकिस्तानमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ( LOC) आणि भारत व चीन देशातील प्रत्यक्ष ताबा रेषा ( LAC) या दोन्हीत काय फरक आहे? १९९९ च्या कारगिल युद्धासंबंधित ‘ऑपरेशन विजय’ भारताने कसे यशस्वी केले? मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा विषयक धोरणात कोणते महत्त्वाचे बदल झाले? २६/११ सारखा मुंबईवर झालेला हल्ला जर आज पुन्हा झाला तर त्याच्या प्रतिकारासाठी किंवा असा हल्ला भारतावर न होऊ देण्यासाठी भारताची काय तयारी आहे? काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती न होऊ देण्यासाठी कोणती पावले उचलावी लागतील? या हल्ल्याला प्रत्युत्तर देणारे ‘ऑपरेशन सिंदूर’ कसे पार पडले? भारत पाकिस्तान मधील १९६१ च्या सिंधू नदी जल कराराबद्दल आपणास काय माहिती आहे? पहलगाम च्या दहशतवादी कारवाया नंतर या करारात काय बदल झाले? दहशतवाद, नक्षलवाद आणि उग्रवाद यामध्ये काय फरक आहे? पहलगाम ला झालेला दहशतवादी हल्ला हा देशांतर्गत सुरक्षेचा प्रश्न आहे की बाह्यसुरक्षेचा? राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ( NIA) पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या गुन्ह्याचा शोध कसा लावला?

व्यक्तिमत्त्व चाचणीमध्ये व्यवस्थित उत्तरं देणे हे कौशल्याचं काम आहे. खूप गुळमुळीत उत्तरं दिली किंवा फारच जपून जपून उत्तरं दिली तर बोर्डाचे सदस्य, ह्यह्ण क्लासमध्ये शिकवलेली उत्तरं आम्हाला सांगू नका, तुमचं वैयक्तिक मत काय ते सांगाह्णह्ण अशाप्रकारे बोलू शकतात . यामुळे उमेदवाराने गडबडून जायचं नाही. बोर्डाचे सदस्य दिवसाला १० उमेदवारांच्या मुलाखती घेतात. ते सगळेच उमेदवार तयारी करून येतात. त्यामुळे तीच तीच ठरावीक, साचेबद्ध उत्तरं बोर्डाला नकोशी वाटणं यात आश्चर्यकारक काहीच नाही.

उमेदवारांनी म्हणूनच उत्तरांमध्ये तोच तोचपणा येणार नाही याची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे आणि जेवढ्या नैसर्गिक पद्धतीने बोर्डाशी संवाद साधता येईल तेवढा तो साधला पाहिजे. त्यासाठी विविध वृत्तपतत्रांचे संपादकीय वाचणे किंवा संसद चॅनेलवरील त्या विषयावर होत असलेले विशेष पॅनल डिस्कशन पाहून आपल्या नोट्स तयार करणे गरजेचे आहे.

आणखी काही ट्रिकी प्रश्न आणि त्यांची उत्तरं याबद्दल पुढच्या लेखात.

mmbips@gmail.com, supsdk@gmail.com