आशुतोष शिर्के
भारतीय विद्यार्थ्यांना आठवड्याला ३६ तास लेक्चर्स ऐकायची सवय असते. नोट्स आयत्या मिळतात. त्यामुळे त्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये गेले की केवळ बारा तास लेक्चर्स आणि बाकीचा वेळ स्व-अध्ययन याचा अर्थच लक्षात येत नाही.

भारतीय विद्यार्थी आणि जगातील इतर देशांमधून येणारे विद्यार्थी यांच्यामध्ये प्रमुख फरक काय आढळतो, असा प्रश्न या विद्यापीठांमध्ये अध्यापन करणाऱ्या काही प्राध्यापकांना विचारले असता मिळालेले उत्तर हे आपल्या अभ्यास-पद्धतीबद्दल आणि विचार पद्धतीबद्दल काही प्रश्न उभे करते.

बहुसंख्य भारतीय विद्यार्थ्यांची मानसिकता (जेवणाबाबत असते तशी) अभ्यासाबाबतही ‘आम्हाला आयतं वाढा, मग आम्ही खाऊ’ अशी असते असे मत अनेक प्राध्यापकांचे आहे. ‘सेल्फ-डायरेक्टेड स्टडी’ म्हणजे एका विशिष्ट दिशेने ठरवून शोध घेत केलेलं स्व-अध्ययन या पद्धतीचा परिचयसुद्धा आपल्याकडच्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना सहसा मिळतच नाही . घोकंपट्टीवर बेतलेली भारतातील परीक्षा पद्धती याला जबाबदार आहे हे खरे,परंतु परदेशात जाऊन उच्च शिक्षणाची स्वप्ने पाहाणाऱ्यांनी तरी या वेगळ्या अभ्यास तंत्राचा मागोवा घ्यायला हवा. परदेशात प्रवेश घेताना GRE, GMAT किंवा TOEFL सारख्या परीक्षांची तयारी करण्यावर योग्य भर दिला जातो, परंतु अभ्यास करण्याच्या पद्धतीतील होणाऱ्या प्रचंड बदलाकडे आपले विद्यार्थी किंवा त्यांना मार्गदर्शन करणारे सल्लागारही पूर्णत: दुर्लक्ष करतात, असे मत जर्मनीतील एका मित्र प्राध्यापकांनी माझ्याकडे मागे नोंदवले होते. या एका कारणामुळे सुरुवातीच्या दोन वर्षांचा अभ्यासक्रम भारतीय मुली-मुलांना खूपच कठीण जातो असे या सरांचे निरीक्षण असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या विद्यार्थ्यांना भारतीय महाविद्यालयांमधून आठवड्याला ३६ तास लेक्चर्स ऐकायची सवय असते. प्राध्यापक नोट्सच्या नावाने अपेक्षित उत्तरे नियमितपणे लिहून देत असतात. त्याची घोकंपट्टी केली की परीक्षेचा अभ्यास तयार! अपेक्षित प्रश्नसंच सोडवणे म्हणजे अभ्यास असे मानणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये गेले की केवळ बारा तास लेक्चर्स आणि बाकीचा वेळ स्व-अध्ययन याचा अर्थच त्यामुळे लक्षात येत नाही.

यासाठी स्व-अध्ययनाचे तंत्र समजून घ्यायला हवे. आज इंटरनेटवरून उपलब्ध असणार्या Massive Open Online Courses ( MOOC/ MOOL) चा वापर विद्यार्थ्यांना यासाठी करता येऊ शकतो. खान अॅकेडमी, तसेच आजकाल प्रचलित झालेल्या Coursera, edX, Udemy, NPTEL सारख्या ऑनलाइन साधनांचा उपयोग करता येऊ शकतो. कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI) आधारित साधने, चॅटजीपीटी किंवा इतर learning companions, योग्य पद्धतीने वापरली (आयती उत्तरे तयार करण्यासाठी नव्हे) तर स्व-अध्ययन अधिक परिणामकारक ठरू शकते.

स्व-अध्ययनाचा सराव करताना आपल्या विशिष्ट विषयाबद्दल दहा पूर्ण पानांचा एक दीर्घ निबंध आपल्याला तयार करता आला पाहिजे, हे लक्षात घ्यावे. हा निबंध ओघ असलेला, तर्कपूर्ण आणि सभेसमोर सादर करता येण्याजोगा असला पाहीजे. ज्या विषयात उच्च-शिक्षणाची झेप घ्यायची त्या विषयाची इतकी तयारी असली पाहिजे.

काही प्राध्यापकांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या आणखी एका त्रुटीकडे लक्ष वेधले. त्यांच्या मते, बहुतांश भारतीय विद्यार्थी केवळ कोर्स किंवा अभ्यासक्रमाचाच विचार करतात. उदहणार्थ, MBA ची चलती आहे तर MBA करायचे हे आधी ठरते, आणि मग त्या कोर्सचा शोध आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतला जातो. याचं मूळ कारण आहे आपण करियरबद्दल सखोल आणि दूरगामी विचार केलेलाच नसतो. आपल्या शिक्षणपद्धतीमधून हा विचार विकसित करण्याचा कोणताही प्रयत्न होत नाही. आजूबाजूचे लोक, समाजही खुरटलेला विचार देत राहतो.

परदेशी उच्च शिक्षणासाठी जायची तयारी म्हणून का होईना, आपला करिअर बाबतचा विचार अधिक दूरगामी असेल हे पाहिले पाहिजे. म्हणजे माझ्या स्वत:च्या क्षमता, कौशल्यं,आणि व्यक्तिमत्त्व या सर्वांचा साकल्याने विचार करून निर्णय झाला पाहिजे. जे करिअर भविष्यातील पंचवीस ते तीस वर्षे सातत्याने अनुसरायचे, त्याबद्दल अधिक माहिती घेऊन, शक्या-शक्यतांचा विचार करून मग अभ्यासक्रमाच्या निर्णयापर्यंत येता येऊ शकेल. यासाठी भारतीय विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी आपल्या विचार पद्धतीत बदल करण्याची गरज आहे असे या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्राध्यापक मित्राचे मत आहे. स्वत: मधील क्षमता आणि जीवन कौशल्यं यांचा शोध आणि विकास ही एक प्रक्रिया आहे,आणि ती स्वत:मध्ये घडून येण्यासाठी,पदवी प्राप्त झाल्यावर किमान दोन वर्षे प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेण्याची नितांत आवश्यकता आहे असे अनेक प्राध्यापक आवर्जून सांगतात. या दोन वर्षांमध्ये काम करत असताना, जबाबदारी घेणे, पार पाडणे, प्रॉब्लेम्स येणे, ते सोडवणे, गटाने काम करणे, बांधिलकी मानणे अशा अनेक जीवन कौशल्यांच्या शोधात आपण स्वत:चा शोधही घेतो आणि म्हणूनच अशा प्रत्यक्ष अनुभवाचे महत्त्व लक्षात घेउन, प्रसंगी कमी मोबदल्यात काम करायलाही विद्यार्थ्यांनी तयार राहीले पाहिजे. या दोन वर्षांच्या कालावधीत नोकरी करता-करता परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याच्या योजनेची आखणी आणि तयारी केली पाहिजे. युरोपातील अनेक देशांमधील विद्यार्थी अशीच पार्श्वभूमी असणारे असतात. त्यामुळे शिक्षणातील त्यांचा आवाका हा कितीतरी मोठा असल्याचे अनेक प्राध्यापकांनी नमूद केले.

विद्यार्थीदशेमध्ये अर्थार्जन करायचे नसते वगैरे पुरातन विचार आता पालकांनी बाजूला ठेवायला हवेत. नव्या पद्धतीने मुली-मुलांची तयारी सुरू करायला हवी. विद्यार्थ्यांनी करायचे काम किंवा नोकरी ही अर्थार्जनापेक्षा स्थानिक समाजाशी एकरूप होण्यासाठी आणि एक जबाबदार विद्यार्थी होण्यासाठी अत्यंत गरजेची आहे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे ज्यांना परदेशामध्ये जाऊन उच्च शिक्षण घ्यायचे आहे त्यांनी पदवी बरोबर किंवा सुट्टीमध्ये काहीतरी ‘अर्थ’पूर्ण काम सुद्धा हाती घ्यायलाच हवे .

mentorashutosh@gmail.com