टीममध्ये काम करताना आपला वैयक्तिक अजेंडा बाजूला ठेवून संघटनात्मक काम करण्याची व कंपनीची उद्दिष्टे व प्राधान्य यांना प्रथम महत्त्व देण्याची व जाणून घेण्याची गरज असते.

नवीन नोकरी लागल्यानंतर प्रत्येकालाच काही ना काही प्रमाणात कार्यालयीन राजकारणाला (ऑफिस पॉलिटिक्स) सामोरे जावे लागते. या कार्यालयीन राजकारणामध्ये अनेक घटक कार्यरत असतात. काही घटक प्रशासकीय पातळीवर असतात तर काही घटक व्यक्तिगत पातळीवर परिणाम करताना दिसतात. व्यक्ती तितक्या प्रकृती तेवढे त्यांचे विविध स्वभाव आणि त्यांच्या वागण्याच्या विविध पद्धती आपल्याला कोणत्याही टीममध्ये काम करताना दिसून येतात. परंतु टीममध्ये काम करताना आपला वैयक्तिक अजेंडा बाजूला ठेवून संघटनात्मक काम करण्याची व कंपनीच्या उद्दिष्टे व प्राधान्य यांना प्रथम महत्त्व देण्याची व जाणून घेण्याची गरज असते.

ऑफिस पॉलिटिक्सवर परिणाम करणारे घटक

● वैयक्तिक महत्त्वाकांक्षा – बऱ्याच जणांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा ऑफिसमधील वातावरणावर व कामकाजावर परिणाम करताना दिसतात. अतिरिक्त महत्त्वाकांक्षांमुळे प्रत्येक निर्णयामध्ये हस्तक्षेप करणे, स्वत:चे सतत महत्त्व वाढवणे असे बरेचदा वागले जाते. विशेषत: नवीन नोकरी मिळालेले कर्मचारी तेवढे अनुभवी नसतात अशा वेळी काही जण आपल्या अधिकाराचा वापर वैयक्तिक पातळीवर टीका करणे, सतत चुका काढणे असा करताना दिसून येतात. काही जणांना टीम मधील नवीन सदस्य आपल्या धाकामध्ये राहावे असे देखील वाटत असते त्यामुळे सतत त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, लक्ष ठेवणे अशा वागण्याच्या पद्धती अनुभवास येतात.

● भावनिक असुरक्षितता – काही कर्मचारी भावनिक दृष्ट्या असुरक्षित असतात. त्यामुळे ते भविष्यातील आपले कंपनीतील स्थान कसे राहील याविषयी सतत चिंता करतात. असे कर्मचारी इतरांशी वागताना राजकारण खेळताना दिसतात. बऱ्याचदा अपुरी माहिती पुरवतात महत्त्वाची माहिती लपवून ठेवतात. काही वेळा द्विअर्थी बोलतात, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला कोणताही स्पष्ट संदेश मिळत नाही.

● कमकुवत नेतृत्व – कंपनीतील अधिकारी व्यक्ती जर नेतृत्व गुणांमध्ये कमकुवत असेल तर अशावेळी कंपनीतील कर्मचारी त्या व्यक्तीचा गैरफायदा घेताना दिसतात किंवा मनमानी करतात. अशावेळी कंपनीत नवीन नोकरी मिळालेल्या व्यक्तीला आपण नक्की कोणाचे ऐकायचे किंवा कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे याविषयी साशंकता निर्माण होताना दिसते. परिणामी कंपनीतील जुने कर्मचारी कार्यालयीन राजकारणाचा उपयोग करताना दिसतात.

● भावनिक बुद्धिमत्ता – कंपनीतील सहकाऱ्यांबरोबर नातेसंबंध सक्षम राहण्यासाठी त्याचबरोबर स्वत:चे भावनिक व्यवस्थापन नीट करण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता अत्यंत महत्त्वाची ठरते. भावनिक बुद्धिमत्ता जर अपुरी असेल तर बरेच कर्मचारी कंपनीतील पॉलिटिक्समुळे स्वत:ला त्रास करून घेतात. वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्तींशी कशाप्रकारे जुळवून घ्यायचे हे त्यांना समजत नाही. परिणामी सततचा भावनिक संघर्ष होतो या सगळ्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होताना दिसून येतो.

● लैंगिक असमानता – काही ठिकाणी स्त्री-पुरुष असा भेदभाव केला जातो. अशा लैंगिक असमानतेमुळे कर्मचाऱ्यांशी मतभेद होताना दिसतात. सर्व कर्मचाऱ्यांना समान संधी मिळत नाहीत. बऱ्याचदा केलेल्या कामाचे श्रेय दिले जात नाही.

कार्यालयीन राजकारणावर मात करण्यासाठी उपाययोजना

● स्वत:च्या क्षमतांवर विश्वास ठेवा.- आपल्यामध्ये असलेल्या क्षमता व अंगभूत कौशल्यांवर विश्वास ठेवा आदर करा व योग्यवेळी योग्य ठिकाणी त्याचा वापर करायला शिका.

● यशस्वी संवाद कौशल्य अंगीकारा. – आपल्याबरोबर काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांशी योग्य प्रकारे खुला संवाद ठेवल्यास एकमेकांविषयी गैरसमज होत नाहीत. तसेच आपल्याबरोबर कोणी राजकारण खेळण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला स्पष्ट भाषेमध्ये होकार किंवा नकार कळवा ज्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला गृहीत धरणार नाही व तुमचा गैरफायदा देखील घेण्याचा विचार करण्याची शक्यता कमी होईल.

● भावनिक बुद्धिमत्ता आत्मसात करा. – आपल्याबरोबर काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांशी नातेसंबंध सक्षम राहण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता विकसित करा ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला नक्की काय म्हणायचे आहे व तिच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत हे समजायला मदत होईल तसेच स्वत:च्या व इतरांच्या विचार, भावना व वर्तन याविषयी उत्तम आकलन होण्यास मदत होईल.

● तटस्थ व वस्तुनिष्ठ राहायला शिका. – कोणत्याही प्रसंगात कोणाचीही बाजू घेऊ नका. कंपनीच्या हिताचे काय आहे, याचा विचार करा. कोणत्याही घटनेकडे तटस्थपणे पाहायला शिकल्यास व्यक्तीचे व परिस्थितीचे आकलन लगेच होण्यास नक्कीच मदत होईल. तसेच तटस्थ राहिल्यामुळे दोन्ही बाजूंचा विचार साकल्याने करता येईल.

● शांत व संयमी राहण्याचा प्रयत्न करा. – कंपनीतील राजकारणाचा सामना करताना कुठल्याही गोष्टीला लगेच प्रतिक्रिया देणे टाळा त्याचबरोबर मनाविरुद्ध काही घडले तर कुठलीही गोष्ट व्यक्तिगत पातळीवर घेऊ नका. शांत व संयमी राहिल्यामुळे आपल्या वर्तनातील चुका टाळण्यास नक्कीच मदत होईल.

● सकारात्मक व व्यावसायिक दृष्टिकोन ठेवा. कामाच्या ठिकाणी सकारात्मक रहा. नकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यामुळे वरिष्ठांबरोबर नातेसंबंध बिघडू शकतात व त्याचा तुमच्या कार्यप्रणालीवर परिणाम होताना दिसतो. सकारात्मक राहिल्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास नक्कीच मदत होते.

● समुपदेशकांची मदत घ्या. कार्यालयीन राजकारणामुळे सतत ताणतणावांना सामोरे जावे लागत असेल तर योग्य वेळी समुपदेशक किंवा मानस तज्ञांची मदत घ्या, ज्यामुळे तणाव हलका होण्यास मदत होईल व तणावाचे शरीर मनावर होणारे नकारात्मक परिणाम टाळण्यास प्रतिबंध करता येईल.

● मजबूत नेटवर्क तयार करा. आपल्या क्षेत्रात व आपल्या कंपनीत काम करणाऱ्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे उत्तम नेटवर्क तयार होईल व तुम्हाला जेव्हा मदतीची गरज असेल त्यावेळी तुम्ही निर्माण केलेले चांगले नेटवर्क तुमच्या कामी नक्कीच येईल.

कंपनीतील कोणत्याही राजकारणामध्ये भाग घेण्याऐवजी आपण आपले लक्ष जर आपले काम व आपल्याला दिलेल्या जबाबदाऱ्या यांच्याकडे लक्ष दिले व कुठल्याही नकारात्मक गोष्टींचा घटनांचा व्यक्तिगत पातळीवर परिणाम न होऊन देण्याची खबरदारी घेतली तर नोकरीत मधील राजकारणाला आपल्याला यशस्वीरित्या सामोरे जाता येईल याची मला नक्कीच खात्री वाटते.

drmakarandthombare@gmail.com