आय-२० म्हणजे अमेरिकेतील ठरावीक विद्यापीठामध्ये परदेशी विद्यार्थ्याला प्रवेश मिळालेला आहे, याचं विद्यापीठाकडून विद्यार्थ्याला दिलं गेलेलं अधिकृत पत्र. या पत्रामध्ये विद्यार्थ्याचे नाव, अभ्यासक्रमाची माहिती, फी,राहण्याचा खर्च, अभ्यासक्रमाचा कालावधी इत्यादी गोष्टी नमूद केलेल्या असतात.

आय-२० मिळवण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्याने प्रवेश मिळालेल्या विद्यापीठाला त्याची स्वीकृती (Acceptance) कळवणं आवश्यक आहे. SAT, ACT, IELTS किंवा TOEFL सारख्या परीक्षांचे गुण आणि शैक्षणिक प्रोफाईल लक्षात घेऊन विद्यापीठ प्रवेश देत असते. तेव्हा अनेक विद्यापीठांनी जर विद्यार्थ्याला प्रवेश दिले असतील तर त्यांची तुलना करून स्वत:साठी आर्थिकदृष्ट्या योग्य असलेले विद्यापीठ विद्यार्थ्याने निवडायला हवे. त्या विद्यापीठाला स्वीकृती कळवली की विद्यापीठाचे अॅडमिशन ऑफिस आय-२० लेटर विद्यार्थ्यांच्या ईमेलवर पाठवतं. आय-२० पाठवताना विद्यापीठाला अमेरिकेत शिक्षण आणि राहणीसाठी आवश्यक असलेली किमान एका वर्षाची रक्कम तुमच्याकडे उपलब्ध आहे, याचे आर्थिक पुरावे झ्र बँक स्टेटमेंट, एफडी, शिष्यवृत्ती पत्र झ्र सादर करणे आवश्यक असते.

आय-२० मिळाल्यानंतर पहिली औपचारिक पायरी म्हणजे SEVIS आय-९०१ शुल्क भरणे होय. हे शुल्क SEVIS (स्ट्ुडंट अँड एक्स्चेंज व्हिजिटर इन्फॉर्मेशन सिस्टीम) मध्ये तुमची नोंदणी करण्यासाठी असते. फी भरल्यानंतर मिळालेली पावती व्हिसा इंटरव्ह्यूच्या वेळी आवश्यक असते. त्यानंतर विद्यार्थ्याला ऑनलाइन डीएस-१६० फॉर्म भरावा लागतो. हा नॉन-इमिग्रंट व्हिसा अर्ज असून त्यामध्ये वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील, प्रवासाचा उद्देश, पत्ता, फोटो आणि पासपोर्ट तपशील अचूकपणे भरावे लागतात. हा फॉर्म भरल्यानंतर पुढील सोपस्कार असतो यूएस व्हिसा अपॉईंटमेंट्सचा. अमेरिकन इमिग्रेशनशी संबंधित संकेतस्थळावर आवश्यक व्हिसा शुल्क भरून दोन अपॉईंटमेंट्स घ्याव्या लागतात – OFC (बायोमेट्रिक्स) आणि अमेरिकेच्या दूतावासातील मुलाखत. ओएफसी प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे फिंगरप्रट्सिं आणि फोटो घेतले जातात. यासाठी पासपोर्ट, डीएस-१६० कन्फर्मेशन पेज आणि अपॉईंटमेंट कन्फर्मेशन इत्यादी गोष्टींची आवश्यकता असते. त्यानंतरचा मुख्य टप्पा म्हणजे व्हिसा इंटरव्ह्यूचा. व्हिसा इंटरव्ह्यू विद्यार्थ्याने निवडलेल्या किंवा जवळच्या अमेरिकन दूतावास किंवा वाणिज्य दूतावासामध्ये होतो. व्हिसा इंटरव्ह्यूसाठी आय-२०, SEVIS शुल्काची पावती, डीएस-१६० कन्फर्मेशन, पासपोर्ट, आर्थिक पुरावे, शैक्षणिक कागदपत्रे आणि प्रवेश पत्र ही सर्व कागदपत्रे घेऊन उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे उत्तरे द्यावीत. व्हिसा मंजूर झाल्यानंतर पासपोर्टवर एफ-१ स्टुडंट व्हिसा शिक्का लागतो आणि विद्यार्थी अधिकृतपणे अमेरिकेत शिकण्यासाठी पात्र ठरतो. त्यानंतर प्रवासाची तयारी करावी, तिकीट बुक करावे.

अमेरिकेत अभ्यास करताना आरोग्य विमा घेणे अनिवार्य असते. त्यासाठी विद्यापीठाच्या सूचनांनुसार लसीकरण पूर्ण करून आरोग्याशी संबंधित आवश्यक दस्तऐवज सादर करा. अमेरिकेत पोहोचल्यानंतर विद्यापीठ आयोजित करणाऱ्या ओरिएंटेशन प्रोग्राम मध्ये नक्की सहभागी व्हा, कारण यामध्ये तुम्हाला कॅम्पस,अभ्यासक्रम, नियम आणि नवीन वातावरणाशी जुळवून घेण्याबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन मिळते. या सर्व गोष्टींचे नियोजन व बुकिंग हे जाण्यापूर्वी करणे योग्य.

थोडक्यात, आय-२० हा केवळ प्रवेशपत्र नसून तुमच्या संपूर्ण परदेशी शिक्षण प्रवासाची किल्ली आहे. त्यानंतरची प्रत्येक पायरी – SEVIS फी, डीएस-१६० फॉर्म, अपॉईंटमेंट, बायोमेट्रिक्स, व्हिसा इंटरव्ह्यू -काळजीपूर्वक आणि नियोजनबद्धरीत्या पूर्ण केल्यावरच तुम्ही अमेरिकेतील शिक्षणाच्या दिशेने पहिले पाऊल टाकू शकता.