एआयचा प्रभाव सगळ्या क्षेत्रांवर पडत असताना ज्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातूनच एआयचा उगम झाला त्या क्षेत्रावर त्याचा प्रचंड मोठा परिणाम होणं अगदी स्वाभाविकच आहे. म्हणजेच ज्या प्रकारे एआयमुळे अनेक क्षेत्रांमधल्या रोजगारांवर मोठी संकटं येण्याची चिन्हं दिसतात, अगदी तसाच प्रकार दस्तुरखुद्द माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या बाबतीतच घडताना दिसतो. यामुळे नव्यानं या क्षेत्रात येऊ पाहणारे तरुण-तरुणी यांच्या मनात काहीसा संभ्रम तर दिसतोच; पण याहून जास्त गोंधळ हा या क्षेत्रात आधीपासून कार्यरत असूनही एआयशी आपल्या कामाचा थेट संबंध नसलेल्या लोकांच्या मनात जास्त प्रकर्षानं दिसतो. एआयनं निर्माण केलेली अस्वस्थता, अस्थिरता आपल्या कामाशीच नव्हे तर आपल्या रोजीरोटीच्याच मुळाशी येण्याची भीती त्यांना भेडसावत असल्याचं आढळून येतं. या पार्श्वभूमीवर एआयमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात निर्माण होत असलेल्या नव्या संधींची माहिती घेणं सगळ्यांसाठीच अत्यावश्यक झालेलं आहे. त्याचाच हा धावता आढावा.

एआयमुळे निर्माण होत असलेल्या माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित असलेल्या रोजगारांमधला पहिला आणि खूप मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करून देणारा पर्याय म्हणजे ‘एआय डेव्हलपर’चा असेल. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून असंख्य क्षेत्रांमधले बहुविध प्रश्न सोडवण्यासाठीची कौशल्यं यासाठी विकसित करावी लागतील. त्यासाठी आधी उल्लेख केल्याप्रमाणे गणित आणि संख्याशास्त्र यांच्यामधल्या काही मूलभूत गोष्टी, पायथन ही संगणकीय भाषा, माहिती साठवणं तसंच तिचा सुयोग्य वापर करणं यासाठीची कौशल्यं, एआय, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, नवनर्मितीक्षम (जनरेटिव्ह) एआय अशा तंत्रज्ञानांची ओळख अशा गोष्टी समजून घेणं आणि त्यांचा भरपूर सराव करणं गरजेचं आहे. दुसरा ‘डेटा सायंटिस्ट’चा रोजगारही खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करताना दिसतो. त्याविषयी आपण आधी स्वतंत्रपणे बोललो असल्यामुळे त्याची पुनरुक्ती इथे टाळली आहे.

एआयच्या संदर्भातला एक महत्त्वाचा आणि तरीसुद्धा त्या मानानं कमी चर्चेत असलेला रोजगाराचा पर्याय ‘एआय कन्सल्टंट (सल्लागार)’ हा असेल. एआयचा वापर कुठल्याही व्यवसायाच्या वृद्धीसाठी करणं, त्यातही नुसती वरवरची सल्ला देण्यापुरती भूमिका न बजावता कृतिशीलता दिसेल अशा प्रकारचे सल्ले देणं यासाठी हे काम महत्त्वाचं ठरेल. साहजिकच हे काम करत असलेल्या लोकांना संबंधित व्यवसाय आणि एआय या दोन्ही गोष्टींची जाण असणं आवश्यक ठरेल. म्हणजेच इथे एआयच्या तंत्रज्ञानावर तुलनेनं कमी भर असेल आणि त्या मानानं एआयच्या व्यवसायावर होत असलेल्या परिणामाची जाण असणं जास्त महत्त्वाचं ठरेल. म्हणजेच इथे निरनिराळ्या उद्याोगांच्या आणि व्यवसायांच्या कामकाजाची जाण असलेल्या ‘डोमेन एक्स्पर्ट’ लोकांना जास्त संधी असेल. एआयच्या वापरामुळे होत असलेल्या परिणामांची जाण जोपासणं अशा लोकांना आवश्यक आहे.

कुठलाही सध्याचा व्यवसाय चालवत असताना त्यामध्ये एआयचं तंत्रज्ञान समाविष्ट करणं हे तसं सोपं काम नाही. यासाठी पारंपरिक व्यवसायाच्या चौकटी काहीशा मोडून किंवा वाकवून त्यामध्ये एआय योग्य प्रकारे आणणं हे मोठं आव्हान असेल. अनेक सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये सध्या जे काहीसे वरिष्ठ लोक ‘प्रॉजेक्ट मॅनेजर’ किंवा ‘प्रोडक्ट मॅनेजर’ यासारख्या पदांवर काम करतात त्यांना ‘एआय प्रोडक्ट मॅनेजर’ म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होईल. अर्थातच यासाठी त्यांना एआयच्या व्यावसायिक वापरासंबंधीच्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. तसंच एआयचं प्रत्यक्ष काम करणारे तंत्रज्ञ आणि व्यवसाय चालवणारे लोक यांच्यामधली दरी भरून काढण्याचं आव्हानही त्यांना पेलावं लागेल.

एआयच्या संदर्भात नैतिकता, कायदा अशा अनेक प्रश्नांची चर्चा वारंवार होते. कुठलीही संस्था किंवा कंपनी एआयचा वापर करत असताना या बाबतींमधल्या चौकटींचं कुठे उल्लंघन तर करत नाही ना; हा कळीचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कारण अनेक कंपन्यांना महागड्या कायदेशीर कारवायांना यामुळे सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.

काही वेळा तर याचे थेट परिणाम माणसाच्या जगण्याशीच निगडित असल्यामुळे नुसतं वरवरची मलमपट्टी करून हा प्रश्न निकालात काढणं कंपन्यांना परवडणार नाही. काही कंपन्या सुरुवातीला असं करतीलही; पण त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागले असल्याचं दिसताच इतर कंपन्या सावध होऊन आधीपासूनच या बाबतीमध्ये काळजी घेतील. या सगळ्या कामासाठी नैतिकता, कायदा, एआय, व्यवसाय या सगळ्या गोष्टींची किमान तोंडओळख असलेल्या लोकांची गरज भासणार आहे. यामुळे ‘एआय एथिकल ऑफिसर’, ‘एआय लीगल ऑफिसर’ अशी पदं अनेक कंपन्यांमध्ये निर्माण होतील.

सध्या आयटीमध्ये असलेल्यांनी एआयमध्ये कसं यायचं याविषयी विस्तारानं पुढच्या वेळी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

akahate@gmail. Com