सुहास पाटील

माझे २०२३ साली बीई संगणकशास्त्र ९.२२ सीजीपीए ने पूर्ण झाले. त्याच वर्षी माझी एका कंपनीमध्ये निवड झाली. निवड होऊन १ वर्ष झाले तरी मला रुजू केले नाही, तसे कोणालाच केले नाही. या काळात मी विविध कंपन्यांत मुलाखत देत होते. त्यातून एका कंपनीमध्ये मीडिया ट्रेनी या पदासाठी निवड झाली. ते पद घ्यावे की नाही या बद्दल मार्गदर्शन करावे. मला यूपीएससी द्यायची आहे. मला हे नोकरी करताना जमेल काय? त्यासाठी तयारी कशा पद्धतीने करावी? कृपया मार्गदर्शन करावे. – गायत्री पवार.

मीडिया ट्रेनी म्हणून नोकरी घ्यायला काहीही हरकत नाही. पहिली गोष्ट पगार चालू होईल. या कामाचा विविध अंगाने स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगच होईल. किमान तीन वर्षे स्पर्धा परीक्षेचा परिपूर्ण अभ्यास नोकरी करत असताना करावा. रोज एक तास व रविवारी सहा तास असा अभ्यास त्यासाठी गरजेचा आणि उपयोगी असतो. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यास नोकरीमध्ये गॅप घेऊन मुख्य परीक्षा देता येईल. या पद्धतीत आत्मविश्वास वाढेल व यशाची शक्यता दुणावेल. आधी मध्ये कॉम्प्युटरची नोकरी मिळाल्यास ती घ्यायची की नाही हा निर्णय तुझाच राहील. मात्र ती नोकरी करताना अभ्यासाची शक्यता किंवा वेळ अजिबात मिळणार नाही.

मी आपल्या करिअर वृत्तांत या सदराचा नियमित वाचक आहे. माझ्या मुलीने सध्या बारावीची परीक्षा दिली आहे. तिला वैद्यकीय शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. त्यासाठी क्लासेस ही लावले आहेत. तिचा नीटचा अभ्यास चालु आहे. माझा प्रश्न असा आहे की

(१) जर तिला वैद्यकीय शाखेत प्रवेश नाही मिळाला तर प्लॅन ‘बी’ म्हणून फॉरेन्सिक सायन्स या शाखेत प्रवेश घेतला तर तो निर्णय योग्य राहील का?

(२) यासाठी महाराष्ट्रातील चांगले शासकीय तसेच खासगी महाविद्यालय कोणते व कोठे आहेत?

(३) हा कोर्स केल्यावर कोणकोणत्या क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत?

(४) या महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात का? नसेल तर प्रवेश मिळण्यासाठी १२ वी त किती गुण असले तर प्रवेश मिळतो? उत्तर मिळावे ही विनंती.  – पराग डिक्कर, जालना</p>

बॅचलर्स इन फॉरेन्सिक मेडिसिन या अभ्यासक्रमाचा जितका गवगवा किंवा चर्चा आहे, तितकी पदवीनंतर त्यामध्ये नोकरीची शक्यता कमी असते. मुलांना या विषयाचे खूप आकर्षण असते. वास्तव मात्र वेगळेच आहे. या क्षेत्रातील मोजक्या प्रमुख नोकऱ्या सरकारी क्षेत्रात आहेत. शास्त्र विषयातील पदवी घेतल्यानंतर यातीलच मास्टर्स अभ्यासक्रम पूर्ण केल्यास चांगला फायदा होतो. गुजरात राज्यात फॉरेन्सिक विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. बारावी नंतर जायचे असल्यास तेथील प्रवेश परीक्षा देऊन प्रवेश घ्यावा. नीट परीक्षेद्वारे किंवा सीईटी द्वारे हाती काही न लागल्यास फार्मसीचा विचार आपली कन्या करू शकते. तो जास्त उपयुक्त आहे. दोन्ही क्षेत्रात काम करणारी मंडळी शोधावीत. त्यांच्याशी चर्चा करून आपणास योग्य, नेमकी व सखोल माहिती नक्की मिळेल.