मिलिंद आपटे
मी २००९ साली बॅचलर इन अकाउंटिंग अँड फायनान्समध्ये पदवी घेतली. मधल्या काही वर्षांमध्ये एमकॉम करताना एमपीएससी स्पर्धांचा अभ्यास नोकरी सांभाळून केला. पण उत्तीर्ण झालो नाही. गेली ९ वर्षे मी मुंबई महापालिकेत वित्त विभागात कार्यरत आहे. सध्या माझे वय ३६ वर्षे आहे. मला बी. कॉम. ला ८२ टक्के तर एम. कॉमचे गुण ६२ टक्के आहेत. मला सध्या वाटते की करिअर प्लान करताना मी कमी पडलो. मला प्राध्यापक होण्याची इच्छा आहे. त्यासाठी सध्याची नोकरी सांभाळून नेट, सेट परीक्षा देऊन तसेच शिकवणी वर्गात एखादा विषय शिकवायला सुरुवात केली तर भविष्यात एखाद्या महाविद्यालयात (कायमस्वरुपी / शासकीय) प्राध्यापक म्हणून संधी मिळू शकते का? – स्वप्नील दळवी
– आपली इच्छा खूप चांगली आहे, शक्य सुद्धा आहे, आपल्यापुढे सध्या दोन आव्हाने आहेत एक म्हणजे नोकरी सांभाळून नेट सेट देणे आणि उत्तीर्ण होणे, त्यानंतर प्राध्यापक म्हणून संधी मिळणे. मी नकारात्मक बोलत नाही पण प्राध्यापक म्हणून नोकरी मिळणे हे अत्यंत कठीण जाईल, पण अर्थातच प्रयत्न नक्कीच करायला हवा, एक सल्ला असाही देता येईल की कोणत्या शिकवणीमध्ये शिकवायला जाऊन तुमची इच्छा पूर्ण लगेच होईल व समाधान मिळेल, तुमच्यासारखे शिक्षक होण्याची इच्छा ठेवणारे फार कमी आहेत, पर्याय नसल्याने शिक्षकी पेशा निवडणारे जास्त आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ती कळकळ दिसत नाही. त्यामुळे अशी सुरुवात नक्की करता येईल. खूप शुभेच्छा.
सर मी बी.ए. पहिल्या वर्षात शिकत आहे मला दहावीत ८८.४० टक्के आणि बारावीत ८८.६७ टक्के गुण आहेत. तसेच दहावीपासून यूपीएससी माझ्या मनात रुजली आहे. आता बीए करत यूपीएससीचा अभ्यास करण्यासाठी सांगलीला आले आहे. पण इथल्या आजुबाजूच्या मानसिकतेप्रमाणे मलाही असे वाटते की त्याआधी भरती करावी पण एकीकडे असेही वाटते की लक्षपूर्वक यूपीएससीवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. पण नेमके काय करू याचा प्रश्न पडला आहे.-राणी एडगे
– एक तर मला ‘‘त्याआधी भरती करावी’’ याचा अर्थ नेमका कळलेला नाही तरी तर्क लावून असा अर्थ काढतो की आधी कोणत्याही नोकरीला प्राधान्य द्यावं की यूपीएससीकडे पूर्ण लक्ष केंद्रित करावे, असा प्रश्न असावा. यावर मत असा की अशा परिस्थित तुमच्या प्रार्थमिक गरजेनुसार निर्णय घ्यावा, म्हणजे लवकर पैसे कमावणे गरजेचे असेल तर लगेच मिळण्याऱ्या नोकरीला प्राधान्य द्यावे पण वेळ देऊ शकत असाल तर यूपीएससी कडे पूर्ण लक्ष द्यावे. अंतिम ध्येय यूपीएससी असावे. खूप शुभेच्छा.
careerloksatta@gmail. com