मिलिंद आपटे

● मी सध्या बीएमसीसी, पुणे येथे बीकॉमच्या तृतीय वर्षाला आहे. मला दहावीला ८७ होते व बारावी कॉमर्सला ८२ होते. माझा प्रथम व द्वितीय वर्षाचा सीजीपीए – ७.७७ आहे. मला एमपीएससीची परीक्षा द्यायची आहे. तर मी सुरुवात कशी करू?

दीपाली जाधव

– या प्रश्नाचे उत्तर तसेही पूर्वी बरेचदा दिले आहे. तुमची पदवी कोणत्या विषयात आहे त्याचा फायदा हा फक्त पर्यायी विषय निवडीवेळी कामाला येतो, जसे तुमच्या बाबतीत अर्थशास्त्र हा विषय निवडून तयारी करता येईल. सर्वात प्रथम राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाचे मन लावून वाचन करावे. मागील कमीत कमी दहा वर्षांतील प्रश्नपत्रिकांचे संकलन आणि वाचन, प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण अध्ययन साहित्य जमवणे, अभ्यास नियोजन, सराव प्रश्नपत्रिका सोडवणे. बाजारात उपलब्ध असलेल्या मार्गदर्शक साहित्यावर अवलंबून न राहता विषयांची संदर्भ पुस्तके वाचणे उत्तम. प्रत्येकाने आपल्या वाचनाचा, पाठांतराचा वेग लक्षात घेऊन अभ्यासाचे नियोजन करावे.

ठरावीक दर्जेदार पुस्तकांचीच उजळणी करणे उत्तम . सुरुवातीला प्रत्येक घटकाचे प्राथमिक वाचन करावे. मग द्वितीय वाचन शांतपणे करावे. यात न समजलेला भाग अधिक चांगल्या पद्धतीने वाचण्यावर भर द्यावा. एक अभ्यासू वृत्ती जोपासावी लागेल, वृत्तपत्रातील फक्त बातम्यांकडे भर द्यावा, तूर्तास संपादकीय टाळावे, मिळालेल्या माहितीच्या आधारे तुमचे मत आधी तयार करण्याची क्षमता तयार करावी मग संपादकीय वाचावे.

careerloksatta@gmail. com