नवीन नोकरी मिळाल्यानंतर नोकरीच्या ठिकाणी इतर अनेक घटकांशी जुळवून घेताना आपण स्वतः देखील आपल्या कामाचे उत्तरदायित्व घेण्याची सवय आत्मसात केली तर त्याचे अत्यंत दूरगामी चांगले परिणाम होताना नक्कीच दिसून येतील.
कामाचे उत्तरदायित्व (Accountability) म्हणजे नुसते आपल्याला दिलेले काम पूर्ण करणे असे नव्हे तर आपण केलेले काम व काम करताना घेतलेल्या निर्णयाच्या परिणामाला स्वतः जबाबदार असणे. कामाचे उत्तरदायित्व घेणे ही एक वृत्ती आहे ती निश्चितच जोपासावी लागते. बहुतेक वेळा अनुकूल घडलं की माझ्या प्रयत्नांनी घडलं आणि प्रतिकूल घडलं की त्याला दुसरी व्यक्ती जबाबदार किंवा सरळ आपल्या नशिबाला दोष देऊन आपण हात झटकतो. नवीन नोकरी मिळाल्यानंतर नोकरीच्या ठिकाणी इतर अनेक घटकांशी जुळवून घेताना पण स्वतःला आपल्या कामाचे उत्तरदायित्व घेण्याची सवय आत्मसात केली तर त्याचे अत्यंत दूरगामी चांगले परिणाम होताना नक्कीच दिसून येतील. असे केल्यामुळे कामाच्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निभावणे शक्य होते त्याचबरोबर टीममधील अनेक प्रकल्पांमध्ये सक्रिय सहभाग घेतला जातो तसेच टीममधील इतर सदस्यांबरोबर एक विश्वासाचे व दृढतेचे नाते निर्माण होण्यास नक्कीच मदत होते. तसेच आपण केलेल्या कामाबद्दल तुम्ही तुमच्या वरिष्ठांकडून वेळोवेळी अभिप्राय मागू शकता ज्यामुळे कामात झालेल्या चुका दुरुस्त करण्यास नक्कीच मदत होते. कामाचे उत्तरदायित्व घेण्याच्या सवयीमुळे आपल्याला आपण केलेल्या कामाची मालकी व जबाबदारी घेण्याची सवय अंगवळणी पडण्यास नक्कीच मदत होते. असे केल्यामुळे तुमची व्यावसायिक प्रतिमा सुधारण्यास पुष्कळ वाव मिळतो त्याचबरोबर करिअरमध्ये यशस्वी वाटचाल करण्यास नक्कीच मदत होते.
(कामाचे उत्तरदायित्व वाढवण्याचे यशस्वी मार्ग)
१. सक्रिय सहभाग वाढवा. कंपनीतील कार्यप्रणालीबद्दल संपूर्ण जाणून घ्या आणि त्यामध्ये तुमची भूमिका लक्षात घेऊन तुमचा सक्रिय सहभाग वाढवा.
२. पारदर्शकता ठेवा. आपण केलेल्या कामाची माहिती वेळोवेळी आपल्या सहकाऱ्यांना व वरिष्ठांना कळवा. आपल्या कामात काही चुका झाल्या असतील तर त्या प्रांजळपणे कबूल करा व चुका दुरुस्त करण्यासाठी तुम्ही केलेल्या प्रयत्नांची देखील वरिष्ठांना माहिती द्या.
३. कौशल्ये आत्मसात करा. कंपनीत काम करताना त्याच्याशी निगडित जबाबदाऱ्या निभावताना विविध कौशल्य आत्मसात करा ज्यामुळे तुम्ही तुमच्या कंपनीसाठी एक मौल्यवान व्यक्ती बनू शकाल.
४. वेळोवेळी कामाचा अभिप्राय मागवा व स्वीकारा. तुम्ही काम करत असलेले सहकारी व तुमचे व्यवस्थापक यांच्याकडून तुम्ही केलेल्या कामाबद्दल वेळोवेळी अभिप्राय मागवा. कामाचा अभिप्राय मागवण्याची सवय निर्माण केल्यामुळे कामांमध्ये येणाऱ्या अडचणी व होणाऱ्या चुका सुधारण्यास नक्कीच मदत होईल. कामाचा अभिप्राय नकारात्मक आला तरी देखील तो स्वीकारा व स्वतःच्या कार्यपद्धतीमध्ये जाणीवपूर्वक बदल करा.
५. स्पष्ट ध्येय व अपेक्षा निश्चित करा. आपल्याकडून कंपनीच्या नक्की काय अपेक्षा आहेत त्याचबरोबर कंपनीची ध्येय व उद्दिष्टे लक्षात घेऊन आपल्या कामाची पद्धती व वाटचाल त्या दिशेने नक्की होत आहे ना, हे वेळोवेळी तपासून बघा.
६. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. काम करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यामुळे यशस्वी होण्याची शक्यता अधिक वाढते त्याचबरोबर आपल्या कामाच्या प्रक्रियेतून आपल्याला खूप काही शिकता येते ज्यामुळे आपण अनुभव संपन्न होत जातो. नकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यामुळे कामांमध्ये संदिग्धता निर्माण होते व त्यामुळे आपण केलेल्या कामाच्या परिणामांची जबाबदारी घ्यावीशी वाटत नाही. आपण केलेल्या चुकांना संपूर्ण टीम जबाबदार आहे असे वाटू लागते.
७. सुस्पष्ट व मोकळा संवाद ठेवा. आपल्या सहकाऱ्यांबरोबर सुस्पष्ट व खुला संवाद ठेवल्यामुळे कामांमध्ये येणाऱ्या अडथळे दूर होण्यास नक्कीच मदत होते त्याचबरोबर एकमेकांविषयी विश्वास दृढ होऊन टीम वर्क सुधारते. टीम बरोबर नियमित बैठका व फीडबॅक सत्रे घेतल्यामुळे कामांमध्ये अधिक सुस्पष्टता येण्यास नक्कीच मदत होते.
८. प्रकृतीवर सकारात्मक परिणाम. कामाचे उत्तरदायित्व घेण्याची सवय निर्माण केल्यामुळे त्याचे प्रकृतीवर देखील उत्तम परिणाम दिसून येतात. कर्मचारी तणावरहित राहण्यास मदत होते. आत्मविश्वास टिकून राहतो व वर्तमान काळात राहण्याची सवय निर्माण होण्यास मदत होते ज्यामुळे आपल्यामध्ये सकारात्मक विचार व भावनांची निर्मिती होताना दिसते ज्याचे आपल्या तब्येतीवर चांगलेच परिणाम होतात.
एकंदरीतच उत्तरदायित्व ही केवळ व्यवस्थेची अपेक्षा नसून ती प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वतःमध्ये निर्माण करण्याची मनोवृत्ती आहे. एक जबाबदार कर्मचारी हा त्या-त्या संस्थेचा भविष्य काळातील आधारस्तंभ आहे असे मला वाटते.