पंकज व्हट्टे

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम विचारात घेतला असता असे लक्षात येते की, उमेदवाराने ‘भारताचा इतिहास आणि भारताची स्वातंत्र्य चळवळ’ या घटकाचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. हा अभ्यासक्रम केवळ एका ओळीत नमूद केला असल्यामुळे परीक्षेची अपेक्षा समजून घ्यायला हवी. तसेच इतिहास विषय समजून घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी यापूर्वीच्या पूर्व परीक्षेत या घटकांवर विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा अभ्यास करणे सहाय्यक ठरू शकते.

upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
mpsc Mantra Study of economic and social development current affairs
mpsc मंत्र : आर्थिक व सामाजिक विकास, चालू घडामोडींचा अभ्यास
purpose of green revolution in india,
UPSC-MPSC : भारतात हरितक्रांती राबविण्यामागाचा उद्देश काय होता? त्याचा परिणाम काय झाला?
mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips
MPSC मंत्र : भूगोल मूलभूत अभ्यास

इतिहास म्हणजे इतिहासकार निर्मित भूतकाळाविषयीचे ज्ञान होय. भारताच्या इतिहासाची सर्वासाधारणपणे चार कालखंडात विभागणी केली जाते- प्राचीन कालखंड (इसवीसन पूर्व पाच लाख वर्षे ते इसवीसन ६४७), आद्य मध्ययुगीन कालखंड (इसवीसन ६४७ ते १२०६), मध्ययुगीन कालखंड (इसवीसन १२०६ ते १७५७) आणि आधुनिक कालखंड (१७५७ ते वर्तमानकाळ.)            

या लेखामध्ये आपण प्राचीन भारतीय कालखंड हा घटक समजून घेणार आहोत. प्राचीन भारतीय कालखंडामध्ये अश्मयुग, सिंधू खोऱ्यातील संस्कृती, वैदिक कालखंड, महाजनपदाचा काळ, मौर्य कालखंड, मौर्योत्तर कालखंड, गुप्त कालखंड आणि गुप्तोत्तर कालखंड या घटकांचा समावेश होता. या काळाचे राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक आयाम समजून घेणे महत्त्वाचे आहे. कला आणि संस्कृती याबाबत आपण वेगळय़ा आणि स्वतंत्र लेखामध्ये जाणून घेऊ. या काळाचा अभ्यास करताना कला आणि संस्कृती यांचा वेगळा आणि स्वतंत्र अभ्यास करणे टाळावे. कारण कला आणि संस्कृती त्या-त्या कालखंडातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक आयामांपासून वेगळय़ा करता येत नाहीत. कला आणि संस्कृतीचा विकास हा संबंधित कालखंडातील आर्थिक, राजकीय आणि सामाजिक आयामांवर अवलंबून असतो.

पूर्व परीक्षेला सामोरे जाताना कोणत्या घटकांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे हे समजून घेऊ. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना प्राचीन भारतातील महत्त्वाची स्थळे, त्यांची वैशिष्टय़े यावर भर द्यायला हवा. या घटकांवर पूर्व परीक्षेत वारंवार प्रश्न विचारला जातो. उदा. २०२१ सालच्या पूर्व परीक्षेत बुर्झहोम, चंद्रकेतूगढ आणि गणेश्वर या स्थळांवर प्रश्न विचारले गेले होते. अश्मयुगीन कालखंडातील स्थळे आणि त्यांची वैशिष्टय़े विद्यार्थ्यांना नेमकी माहीत असायला हवीत. २०१९ सालच्या पूर्व परीक्षेत हडप्पा संस्कृतीच्या स्थळाबाबत प्रश्न विचारला गेला होता. त्यामुळे येत्या काळात प्राचीन कालखंडातील महत्त्वाची स्थळे आणि त्यांची वैशिष्टय़े याबाबत प्रश्न विचारला जाऊ शकतो.

सिंधू संस्कृतीबाबत यापूर्वी विचारल्या गेलेल्या प्रश्नांवरून असे लक्षात येते की, सिंधू संस्कृतीची स्थळे, त्यांचे मूळ आणि विस्तार, त्यांची व्यवच्छेदक वैशिष्टय़े, या स्थळांवर आढळून आलेल्या महत्त्वाच्या गोष्टी आणि या स्थळांचा ऱ्हास कसा झाला याची माहिती विद्यार्थ्यांनी करून घ्यायला हवी. याचबरोबर सिंधू संस्कृतीचे राजकीय, धार्मिक आणि सामाजिक आयाम समजून घेण्यावर भर द्यावा. वैदिक कालखंड आणि उत्तर वैदिक कालखंड यांचा अभ्यास करताना सामाजिक राजकीय आणि आर्थिक आयामांची तुलनात्मक माहिती, उत्क्रांती जाणून घेण्यावर भर द्यावा.        

महाजनपदकालीन इतिहासाचा अभ्यास करताना तीन महत्त्वाचे आयाम – राज्यसंस्थेची निर्मिती, ग्रीक आणि पर्शियन ही परकीय आक्रमणे, श्रमण परंपरा समजून घेणे आवश्यक आहे. महाजनपदे या घटकाची तयारी करताना गौतम बुद्ध यांचे समकालीन राजे कोणते या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. परकीय आक्रमणे आणि त्यांचे भारतीय उपखंडावर झालेले परिणाम यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. श्रमण परंपरेतील जैन आणि बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानावर प्रश्न विचारले जातात. वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या आयुष्यातील महत्त्वाची स्थळे, घटना, व्यक्ती यांचा सुद्धा अभ्यास महत्त्वाचा आहे.    

मौर्य कालखंडाचा अभ्यास करताना उमेदवारांनी मौर्य घराण्यातील पहिले तीन सम्राट (चंद्रगुप्त, िबदुसार आणि अशोक), कौटिल्याचे अर्थशास्त्र आणि अशोकाचे स्तंभालेख आणि शिलालेख यांचा अभ्यास करावा. मौर्योत्तर कालखंडात अनेक राजघराणी उदयाला आली. या कालखंडाचा अभ्यास करताना नागरीकरण, दक्षिण भारतातील राज्यसंस्थेची निर्मिती, राजकीय संघर्ष, मोठय़ा प्रमाणावर वाढणारा व्यापार या घटकांवर लक्ष केंद्रित करावे.    

दक्षिण भारतात इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये महापाषाण युग संपुष्टात आले आणि संगम कालखंडाची सुरुवात झाली. संगम कालखंडातील राज्यसंस्था, अर्थव्यवस्था आणि समाज याचे मूलभूत आकलन करून घेणे आवश्यक आहे. २०२३ सालच्या पूर्व परीक्षेमध्ये संगम साहित्यात उल्लेख असणाऱ्या प्राचीन कालखंडातील दक्षिण भारतीय बंदराबाबत प्रश्न विचारला गेला होता.

गुप्त कालखंड या घटकाची तयारी करताना गुप्त साम्राज्याच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक या आयामांसोबतच गुप्त साम्राज्याचे प्रशासन यावर भर द्यावा.

२०१४ सालच्या पूर्व परीक्षेमध्ये मध्ययुगीन कालखंडासंदर्भात ‘महत्तर’ हे नामाभिधान असणाऱ्या प्रशासकीय पदाबद्दल प्रश्न विचारला होता. ‘महत्तर’ हे पद गुप्त कालखंडातील असून ते मध्ययुगीन कालखंडामध्ये देखील प्रचलित होते हे लक्षात घ्यायला हवे. २०२३ सालच्या पूर्व परीक्षेमध्ये गुप्त साम्राज्याशी समकालीन असणाऱ्या इतर राजघराण्यांबाबत प्रश्न विचारला होता. यातील काही राजघराणी गुप्तोत्तर काळातदेखील अस्तित्वात होती. म्हणजेच या कालखंडाचा अभ्यास करताना गुप्त साम्राज्याशिवाय इतर राजघराण्यांची देखील माहिती असणे अपेक्षित आहे.     

एकूणच, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेसाठी प्राचीन भारत या घटकाची तयारी करताना प्राचीन भारताच्या विविध आयामांचे सर्वसाधारण आकलन असणे आवश्यक आहे. तसेच काळानुसार कोणते बदल घडत गेले याचा अंदाज असणे अपेक्षित आहे. आपण उपरोक्त चर्चा केलेल्या घटकांशिवाय शिलालेख, चलनी नाणी आणि फाहीयान, ह्युएन त्संग आणि इित्सग यासारख्या परकीय प्रवाशांबद्दल, त्यांनी नोंदवलेल्या निरीक्षणाबद्दल माहिती असणे अपेक्षित आहे. प्राचीन कालखंडातील सांस्कृतिक समृद्धी, विशेषत: मौर्योत्तर आणि गुप्त काळातील, हा परीक्षेच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा भाग आहे. त्याबद्दल आपण स्वतंत्र लेखामध्ये माहिती घेऊया.