Success Story NEET 2025 Topper Utkarsh Awadhiya: नुकत्याच जाहीर झालेल्या नीट २०२५ या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत मध्य प्रदेशातील इंदूरच्या उत्कर्ष अवधियाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशामुळे तीन पिढ्यांपासून असलेले, त्याच्या कुटुंबातील पहिला डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
या परीक्षेत दुसरा क्रमांक पटकावल्यानंतर उत्कर्ष म्हणाला की, “माझ्या आजोबांचे स्वप्न होते की माझ्या वडिलांनी डॉक्टर बनावे, पण ते पूर्ण होऊ शकले नाही. माझ्या वडिलांचेही माझ्यासाठी असेच स्वप्न होते आणि मला त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे होते. याचबरोबर मला मानवी शरीराबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे आणि म्हणूनच मी डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला.”
उत्कर्षने मिळवलेल्या या यशाबाबत बोलताना त्याचे बँक व्यवस्थापक असलेले वडील आलोक अवधिया म्हणाले की, “विविध कारणांमुळे मी माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. आता माझ्या मुलाने ते स्वप्न पूर्ण केले आहे आणि आमच्या कुटुंबाला त्याचा अभिमान आहे.”
उत्कर्षने नीट परीक्षेची तयारी एका योजनाबद्ध दृष्टिकोनातून केली. यासाठी तो प्रत्येक विषय शिकल्यानंतर त्याचा नियमित सराव करायचा. “प्रत्येक विषयाचा अभ्यास केल्यानंतर, मी प्रशिक्षण मॉड्यूलमधून त्या विषयांशी संबंधित वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवायचो, त्यामुळे याचा मला खूप फायदा झाला.”
एनसीआरटी अभ्यासक्रमाचा सराव उत्कर्षच्या तयारीचा भक्कम पाया होता. “मी सराव चाचण्यांमध्ये सर्व विषयांसाठी एनसीआरटीचा अभ्यास करायचो. म्हणून परीक्षेच्या एक महिना आधी, मी एनसीआरटीच्या अभ्यासक्रमाची दहा हून अधिक वेळा उजळणी केली होती. सराव परीक्षांमध्ये मी ज्या चुका करायचो त्याची एक यादी बनवली होती. प्रत्येक सराव परीक्षेनंतर, मी त्यात माझ्या चुका लिहायचो आणि माझ्या शंका घेऊन शिक्षकांकडे जायचो.”
उत्कर्षने नीटची तयारी करताना अभ्यास आणि इतर गोष्टींमध्येही योग्य संतुलन राखले होते. याबाबत त्याने सांगितले की, “दररोज शिकवणीनंतर मी ६ ते ७ तास अभ्यास करायचो. सलग २ तास अभ्यास केल्यानंतर १५-२० मिनिटांचा ब्रेक घ्यायचो ज्यामध्ये मी माझ्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत वेळ घालवत असे. मी व्हॉलीबॉल आणि फुटबॉलसारखे खेळ देखील खेळायचो.”
सोशल मीडियाबाबत बोलताना उत्कर्ष म्हणाला की, “मी माझ्या तयारीदरम्यान कधीही सोशल मीडियाचा वापर केला नाही. मी आठवड्यातून एकदा संपर्कात राहण्यासाठी त्याचा वापर करायचो. भविष्यात नीट परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांना हे माहित असले पाहिजे, तुम्ही सोशल मीडियावर जितके कमी राहाल तितकी तुमची तयारी चांगली होईल. सोशल मीडिया लक्ष विचलित करणारी आणि तुमचा वेळ वाया घालवणारी गोष्ट आहे.”