पावसाळा सुरू झाला की वर्तमानपत्रांचे मथळे रस्त्यांवर पडलेले खड्डे, त्यामुळे होणाऱ्या अपघातांच्या वृत्तांनी भरलेले असतात. खड्डे वेळेत, योग्य पद्धतीने बुजवणे हे सरकारी यंत्रणांचे काम असते. पण त्यासाठी त्यांना ‘अचूक मार्ग’ दाखवणे हे ‘रस्ता.एआय’ या अपचे उद्दिष्ट आहे. रस्त्यावरचे खड्डे चुकवून अपघात रोखण्यासाठी वाहनचालकांनाही या अपची मदत होणार आहे. या संकल्पनेविषयी सांगताहेत एआय युनिका टेक्नॉलॉजीज् या स्टार्टअपचे संस्थापक ए. राहुल…

खड्ड्यांमुळे होणारे जीवघेणे अपघात, जखमींच्या मागे लागणारं आयुष्यभराचं दुखणं ही स्थिती उद्विग्न करणारी आहे. रस्त्याच्या स्थितीवर देखरेख करण्यासाठी एआयची मदत झाली तर सरकारी यंत्रणांचा वेळ, पैसा तर वाचेलच पण लोकांचे अनमोल जीव वाचतील या विचारातून आमच्या कंपनीचं ‘रस्ता.एआय’ हे ॲप जन्माला आलं. मी आणि माझे गुंतवणूक भागीदार नरेंद्र काळे मिळून ही एआय युनिका टेक्नॉलॉजीज् ही पुणेस्थित कंपनी सप्टेंबर २०२३ मध्ये सुरू केली. सुरुवातीला १० महिने आम्ही संशोधन आणि विकासाच्या टप्प्यावर होतो. त्यानंतर आमचं पहिलं प्रोडक्ट तयार झालं आणि ते आम्ही शीव-पनवेल हायवेवर वापरलं. त्याचं सादरीकरण आम्ही अनेक ठिकाणी केलं आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला.

मी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून कॉम्प्युटर इंजिनीअरिंग पूर्ण केलं. त्यानंतर सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीमधून एमबीए केलं. तेथून येथे आल्यानंतर इंटर्नशिपच्या कालावधी विविध प्रकल्पांवर काम केल्यानंतर मला हे लक्षात आलं की ‘रोड कंडिशनिंग मॉनिटरिंग’ हे एक चांगलं कार्यक्षेत्र आहे. माझी मूळ संकल्पना खरे तर पुढच्या ५-१० वर्षांमध्ये ज्या स्वयंचलित गाड्या रस्त्यावर धावणार आहेत, त्यांना लागणारा डेटा उभा करणारी डेटा बँक तयार करायची आहे. हे माझे उद्दिष्ट आहे. त्यासाठी खरे तर मी ही कंपनी उभी केली होती. मात्र त्या माहितीचा उपयोग आता सरकारसाठी होतो आहे.

खड्डा पडण्याआधीच अलर्ट

कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून ‘रस्ता.एआय’ ॲप रस्त्यांची स्थिती दर्शवणाऱ्या सूचना देते, पूर्वानुमानाधारित विश्लेषण करते, रस्त्याचे आठ प्रकारचे दोष दाखवते, ३६० अंशातून आभासी तपासणी (व्हर्च्युअल इन्स्पेक्शन) करते. पथदिवे बंद असणे, अतिक्रमण, पदपथ नीट नसणे, एखाद्या रस्त्यावर आधी असलेली झाले आणि कमी झालेली झाडे अशा विविध ६५ प्रकारांची यादी या ॲपमुळे मिळते आणि शासनापर्यंत पोहोचवता येते. जिथे पारंपरिक सर्वेक्षणांना आठवडे लागतात, तिथे ‘रस्ता.एआय’ ९० मिनिटांत डेटाचे विश्लेषण करते. हे ॲप खड्डे केवळ ओळखत नाही, तर त्यांचा अंदाज लावतो, म्हणजेच रस्त्यावर पडणाऱ्या भेगांचा अभ्यास करून पुढील आठ दिवसांत कुठे खड्डा पडू शकतो याची माहिती आधीच मिळते, जेणेकरून सरकारी यंत्रणा योग्य वेळी पावले उचलू शकतील आणि नागरिक सुरक्षित मार्ग निवडू शकतील.

खड्डे का पडतात?

राष्ट्रीय महामार्गांवर जास्त खड्डे पडत नाहीत आणि पडलेच तर जेथे डोंगर, दरडीतून पाणी येऊन साचते, तेथे पडतात. जेथे सांडपाणी जाण्यासाठी योग्य व्यवस्था असते, जिथे पाणी साचत नाही तेथे खड्डा पडत नाही. आणि काँक्रीटीकरण हा तर यावरचा उपाय नक्कीच नाही. त्याचे दुष्परिणाम आपल्याला काही वर्षांनी पाहायला मिळतील.

देखभाल आवश्यक

आपल्याकडे रस्ता तयार तो, तेव्हा तो कंत्राटदाराच्या दोष दायित्व कालावधीत (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड) मध्ये असतो. हा काळ म्हणजे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर काही ठराविक कालावधीसाठी, साधारणपणे १२ ते २४ महिन्यांपर्यंत, कंत्राटदाराला कामातील दोषांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी सोपवण्यात येते. या काळात, बांधकाम किंवा कामातील त्रुटी आढळल्यास, कंत्राटदाराला ती दुरुस्त करून द्यावी लागते, ज्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च लागत नाही. कंत्राटदार या काळात रस्त्याची योग्य देखभाल करतो का ते पाहण्यासाठी काही मानकं ठरलेली आहेत. ही मानकं तपासण्यासाठी विशिष्ट यंत्रणा आहे. ही यंत्रणा आतापर्यंत मेकॅनिकल होती. तपासणी करण्याऱ्या यंत्रांची मर्यादा होती. शिवाय ‘डिफेक्ट लायबिलिटी पिरियड’च्या डिजिटल नोंदी नसायच्या. या तपासणीसाठी आमच्या कंपनीने यंत्रणा तयार केली. आम्ही आमचा स्वत:चा डेटा सेट गोळा केला. रस्त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी लायब्ररी विकसित केल्या. त्यावर रिसर्च प्रोजेक्ट तयार करून फायनल प्रोडक्ट तयार केले.सरकारचा कनिष्ठ अभियंता रस्त्याचे मॅपिंग करताना प्रत्येक खड्डा न खड्डा तपासू शकत नाही. पण आम्ही गुगलसारखा स्वत:चा स्ट्रीट व्ह्यू विकसित केला आहे. त्या माध्यमातून आम्ही रस्त्यांवरील खड्ड्यांचे मॅपिंग करू शकतो. आमची ४७ लोकांची टीम यावर काम करते. एआयमधील कॉम्प्युटर व्हिजन आम्ही वापरतो. स्ट्रीट व्ह्यू, कॅमेरा, डेटा कलेक्शन मेथडॉलॉजी, एआयचे मॉडेल हे सर्व आम्ही तयार केले आहे. आम्ही सुरुवातीला त्या भागाचं बेस मॅपिंग करून देतो. नंतर त्या जिल्ह्यातील सर्व सरकारी अभियंत्यांना आम्ही आमचं अप देतो जे मोफत असतं. त्या माध्यमातून त्यांचं काम अधिक सुकर होतं. ‘रस्ता.एआय’ ॲप सह नागरिकांसाठी आमचे रस्ता रिपोर्ट ॲप आहे.

सरकारी संस्थांसोबत काम

लातूरचा पूर्ण जिल्हा, पुणे महानगरपालिकेसोबत काही प्रायोगिक तत्त्वावर प्रोजेक्ट करत आहोत. सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआयडीसी सोबत काम करत आहोत. महाराष्ट्राबाहेर बिहारमध्ये आम्ही काम करत आहोत.

हेही वाचा

सन्मान

वर्ल्ड रोड फेडरेशनचे नियम आहेत, त्याचे तंतोतंत पालन करणारी आमची एकमेव कंपनी आहे. शासनाच्या अभियंत्याची काय गरज आहे त्यावर थेट काम करणारे आमचे एकमेव प्रोडक्ट आहे. याचे पेटंटही आमच्याकडे आहेत. नॅसकॉमने ‘गेम चेंजर इनोव्हेशन ऑफ दी इयर’ हा पुरस्कार आमच्या कंपनीला मिळाला. राज्य शासनाचा महाराष्ट्र स्टार्टअप कप आम्ही जिंकलो.

आमचे मूळ उद्दिष्ट आहे की भारतातील सर्व रस्ते नेटवर्कचा एक मोठा डेटा उभा करणे आणि अशी इकोसिस्टीम विकसित करणे जेणेकरून वाहनचालकांना वेळ मिळावा, त्यांना अलर्ट मिळावा आणि अपघात रोखले जावेत.

(शब्दांकन : मनीषा देवणे)