प्रवीण निकम
नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे. अनेक जण त्यांचे पदवीचे किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून पुढील वाटचालीसाठी नक्की काय करावे? यावर विचार करीत असतील. आपल्या आवडीच्या क्षेत्रातच एखादी शिष्यवृत्ती मिळाली तर पुढील शिक्षण करता करता नवं काहीतरी भरीव शिकता देखील येईल असा विचार देखील अनेकांच्या मनात घोळत असेल. त्यामुळेच आजच्या लेखात आपण एका नव्या स्कॉलरशीप विषयी जाणून घेऊ. टाटा समूह जो स्वत:च्या दानशूरपणाबद्दल जगप्रसिद्ध आहे. याच टाटा ट्रस्ट करून शिक्षण क्षेत्रातील युवकांसाठीही बरेच काही घडत असते. उच्च शिक्षणासाठी अनेक शिष्यवृत्त्या टाटा ट्रस्टकडून दिल्या जातात त्यातील युवतींसाठी दिल्या जाणाऱ्या एका महत्त्वाच्या ‘लेडी मेहेरबाई डी टाटा एज्युकेशन ट्रस्ट शिष्यवृत्ती’ या शिष्यवृत्ती बद्दल आज जाणून घेऊया.
सर दोराबजी टाटा यांच्या पत्नी लेडी मेहेरबाई डी टाटा यांच्या स्मरणार्थ स्थापित केलेला हा एक शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे. या शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट सामाजिक कार्य, सामाजिक विज्ञान, शिक्षण, आरोग्यसेवा आणि औषध यासारख्या विशिष्ट क्षेत्रात परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे. ही शिष्यवृत्ती २१ ते ३५ वयोगटातील भारतीय महिलांसाठी खुली आहे, ज्यांच्याकडे मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून प्रथम श्रेणीची पदवी किंवा समतुल्य आहे आणि त्यांना पदव्युत्तर पदवी किंवा पदविका कार्यक्रमासाठी परदेशातील प्रतिष्ठित विद्यापीठात स्वीकारण्यात आले आहे. ‘लेडी मेहेरबाई डी टाटा एज्युकेशन ट्रस्ट शिष्यवृत्ती’ ही ट्यूशन फीसाठी ३ ते ६ लाख रुपये इतकी आहे. या शिष्यवृत्तीमध्ये ट्यूशन फी, राहण्याचा खर्च आणि प्रवास खर्च यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. शिष्यवृत्तीची रक्कम अभ्यासाच्या अभ्यासक्रमावर आणि कार्यक्रमाच्या कालावधीनुसार बदलते. या शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष नक्की काय असतील? असं विचारलं तर लेडी मेहेरबाई डी टाटा एज्युकेशन ट्रस्ट शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी, अभ्यासाच्या विहित क्षेत्रातील महिला उमेदवारांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
१. नामांकित संस्थेतून पदवीचा कार्यक्रम पूर्ण केला असावा.
२. मागील पात्रता परीक्षांमध्ये सतत शैक्षणिक उत्कृष्टता प्राप्त केलेली असावी.
३. यूएस, यूके किंवा युरोपियन विद्यापीठात अर्ज केला आहे किंवा प्रवेश घेतला आहे.
४. किमान २ वर्षांचा कामाचा अनुभव (प्राधान्य, आवश्यक नाही)
या गोष्टींची पूर्तता करणाऱ्या युवतींना या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्थात असे असले तरी कोणते विषय यात समाविष्ट केले जातील हे जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. तर यासाठी काही विषयांची निवड केली गेली आहे ज्यात समाजशास्त्र, मानसशास्त्र, कायदा – ज्यात केवळ महिला आणि मुलांशी संबंधित बाबींवर विशेषीकरण असणारा अभ्यासक्रम, शिक्षण – शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम, विशेष गरजा असलेल्या मुलांचे शिक्षण आणि कल्याण, लिंग अभ्यास – महिला आणि मुलांविरुद्ध हिंसा (घरगुती हिंसाचार आणि इतरांद्वारे, म्हणजे घरातील हिंसाचार आणि इतरांद्वारे) भारतीय महिलांशी संबंधित एकल, एकल माता आणि विवाहित महिला, बाल आरोग्य – विकास आणि पोषण, आरोग्य धोरण आणि आरोग्य शिक्षण- मानसिक आरोग्य, सार्वजनिक आरोग्य – सामुदायिक आरोग्य सेवा, पुनरुत्पादक आरोग्य, महामारीविज्ञान किशोरांच्या गरजा विकासासाठी संवाद – महिला आणि मुलांशी संबंधित समस्यांवर लक्ष केंद्रित, समुदाय विकास, ग्रामीण विकास, सार्वजनिक धोरण, सार्वजनिक प्रशासन, सामाजिक धोरण, सामाजिक विकास, शाश्वत विकास – महिला आणि मुलांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित असणारा अभ्यासक्रम तसेच कारागृहातील स्त्रिया यांसारख्या उपरोक्त क्षेत्रांमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.
अशा असंख्य महत्त्वपूर्ण विषयांचा या शिष्यवृत्तीसाठी विचार केला गेला आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज प्रक्रियेमध्ये कागदपत्रे सबमिट करणे आणि अर्ज भरणे गरजेचे आहे. उमेदवारांनी खालील तपशीलांसह igpedulmdtet @tatatrusts. org वर ईमेलद्वारे टाटा ट्रस्टकडून अर्जाच्या लिंकसाठी विनंती केली की आपल्याला अर्ज उपलब्ध होतो. यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांसोबतच इतर माहितीही विद्यार्थ्याने घेणे आवश्यक आहे जसे परदेशात आपण निवड असलेल्या अभ्यासासाठीचा कोर्स आणि स्पेशलायझेशन किंवा मास्टर्ससाठी परदेशात कोणते विद्यापीठ आहे?,प्रत्येक विद्यापीठासाठी आवश्यक शिक्षण शुल्क किती आहे? यातील काही रक्कम जर विद्यार्थी भरू शकत असेल तर ती किती असेल? याचा ही विचार करावा लागतो. शिष्यवृत्तीसाठी निवड करताना निवड प्रक्रियेमध्ये अर्जदारांचे शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखत यांचा समावेश होतो. अर्जदारांना त्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेच्या आधारे आणि त्यांच्या अभ्यासाच्या क्षेत्रातील कामाच्या अनुभवाधारित निवडले जाते. निवडलेल्या अर्जदारांना जुलै २०२४ च्या मध्यापर्यंत एक ईमेल प्राप्त होईल. त्यांना निधीचा पुरावा किंवा त्यांच्या आर्थिक क्षमतेचे दस्तऐवज सादर करावे लागतील. शॉर्टलिस्ट केलेले उमेदवार विश्वस्त मंडळाच्या मुलाखतीतून जातील. मुलाखतीत उमेदवाराच्या कामगिरीवर अवलंबून शिष्यवृत्ती दिली जाते. अशा प्रकारे उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक युवतींसाठी उंच भरारी घेण्यासाठी साह्यभूत ठरणारी व विषयांची विविधता असणारी ही शिष्यवृत्ती अनेकांच्या पंखांना बळ देणारी ठरेल यात काही शंका नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही https:// www. tatatrusts. org/ our- work/ individual- grants- programme/ education- grants या वेबसाईटची मदत घेऊ शकता.