आशुतोष शिर्के
शिक्षणाबद्दलचा आपला दृष्टिकोन मुळातून तपासून बघणे आवश्यक आहे. परदेशी शिक्षण घ्यायला कशासाठी जायचे? मुळात माझ्या मुलीला तिच्या विषयाचा सखोल अभ्यास करण्यामध्ये रस आहे का? तो कसा वाढवता येईल? हा विचार व्हायला हवा आणि मुलांनाही द्यायला हवा.
‘‘भविष्यात तिला परदेशीच सेट्ल व्हायचे आहे सर, त्यामुळे त्याच दृष्टिकोनातून कोर्स आणि युनिव्हर्सिटी सुचवा.’’ हे वाक्य मला नवे नाही. किंबहुना परदेशी उच्च-शिक्षण घेऊ इच्छिणार्या नव्वद टक्के मुली आणि मुलांचा (आणि त्यांच्या पालकांचा ) तोच इरादा असतो.
बुद्धी, क्षमता, आवडीचे काम, उत्तम मोबदला, ह्या निकषांवर जो समाज, जो प्रदेश, माणसांना जगाच्या पाठीवर जिथे कुठे वाव देइल, जिथे मनासारखं काम करता येईल, तिथे आपल्या मुलांनी स्थायिक व्हावं हा विचार खरं म्हणजे आपल्या मध्यमवर्गाने कित्येक वर्षांपूर्वी आत्मसात केला आहे. उगाच नाही आपले अनेक नातेवाईक, शेजारी- पाजारी, आप्तजन अनेक वर्षांपासून परदेशी जाऊन स्थिर झाले आहेत. त्यांच्या मेहनतीचा, प्रयत्नांचा आणि हुशारीचा आपल्याला अभिमानही आहे.
परदेशी उच्च शिक्षणाचा विचार करताना ‘‘परदेशी गेल्याने मला आधुनिक जगामध्ये ज्या ज्ञान आणि कौशल्याची गरज आहे ती सारी विकसित करता येतील आणि त्यामुळे माझ्या उज्ज्वल भवितव्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे.’’ असे विचार योग्यच आहेत. ‘‘परदेशी जाऊन जागतिक दर्जाच्या शिक्षण-संस्थेमध्ये शिक्षण घेता येईल’’ हे स्वप्न असण्यात काहीच गैर नाही. ‘‘माझ्या विषयात मला सखोल ज्ञान घ्यायचे आहे’’ हा विचार सुद्धा महत्त्वाचा आहे. पण या विचारांमध्ये पालक आणि मुलं काहीशी गफलत करत असलेले लक्षात येते.
‘‘उज्ज्वल भवितव्यासाठी परदेशी शिक्षण हा एक उत्तम मार्ग आहे’’ इथपासून सुरू झालेला विचार, ‘‘परदेशामध्ये जाऊन शिक्षण हा उज्ज्वल भवितव्याचा एकमेव मार्ग त्यामुळे काहीही करून तो मिळवायलाच हवा. न मिळाल्यास जीवन निरर्थक आहे ’’ या विचारापर्यंत पालक-विद्यार्थी कधी येऊन ठेपतात हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. अशा विद्यार्थ्यांची मानसिकता आणि एकूणच भवितव्य मग भयाण असते. परदेशातील शिक्षण पद्धती, विशेषत: जगात आघाडीवर असणाऱ्या आधुनिक देशांमधील शिक्षण-पद्धती प्रगत आहे हे तर खरे आहेच. पण म्हणजे परदेशातील प्रत्येक शिक्षण संस्था उत्तमच आहे असे मात्र नाही.
बऱ्याच वेळा पालक आपल्या अतृप्त इच्छा आणि अपूर्ण स्वप्नं पूर्ण करण्याचे माध्यम म्हणून मुलांकडे पाहतात. मुले नकळतपणे त्यांच्या या बोजाचा स्वीकार करून चुकीच्या पद्धतीने महत्त्वाकांक्षी बनतात. जणू काही येन-केन प्रकारेण कुठल्यातरी परदेशी शिक्षण-संस्थेमध्ये प्रवेश मिळवण्यातच आपल्या जीवनाची इति-कर्तव्यता आहे असे मानायला लागतात. ह्यातून योग्य मार्गाची निवड चुकण्याची शक्यता दाट होते. आणि परदेशी जाण्याचे मार्ग बंद झाले तर मग ही मुलं नकारात्मकतेने ग्रासून जातात. हे सर्रास होत असलेले मी आज पाहात आहे.
अनेक सधन पालक अगदी दहावी किंवा बारावी इयत्ता झाल्यानंतर लगेच मुलांना परदेशी पाठवण्याची योजना करू लागले आहेत. काही वेळा परदेशी जाण्याचा या महत्त्वाकांक्षेमध्ये मग्न असलेली मुलं काही वेगळीच स्वप्न रंगवू लागतात. माध्यमांमधून दिसणारा आणि भासणारा पाश्चात्य संस्कृतीमधील मुक्तपणा त्यांच्या या वयातील मनाला भुरळ घालत असतो.
पालक जवळ नसले तर अमर्याद स्वातंत्र्य मिळेल ही कल्पना त्यांना आकर्षक वाटत असते. त्यातूनच आपला आत्मविश्वास वाढेल असेही त्यांना वाटत असते. अशा विचारांमुळे हे विद्यार्थी परदेशामध्ये गेल्यावर अभ्यासाव्यतिरिक्त इतर नको त्या गोष्टीकडे वळलेले मी पाहत आहे. एका वेगळ्या संस्कृतीमध्ये जाऊन वास्तव्य करताना एक जो सांस्कृतिक धक्का सुरुवातीला बसतो, तो पचवण्याची क्षमता कोवळ्या वयामध्ये मुलांमध्ये असण्याची शक्यता कमी असते.
या साऱ्यातून एक गोष्ट समोर येते आणि ती म्हणजे मुलांना परदेशी शिकायला पाठवताना, त्यांनी किमान पदवीपर्यंतचे शिक्षण भारतात घ्यावे. पालकांच्या भावनिक आधाराशिवाय रोजच्या जगण्यातले लहान-मोठे निर्णय घेण्यासाठी जी परिपक्वता हवी ती ह्या वयापर्यंत येते. निर्णय आवेगावर आधारित न घेता सद्सद्विवेक बुद्धीवर आधारित असले पाहिजेत ही जाणीवही याच वयात होऊ लागते.
शिक्षणाबद्दलचा आपला दृष्टिकोन मुळातून तपासून बघणे आवश्यक आहे ते यामुळेच. शिक्षण का घ्यायचे? परदेशी शिक्षण घ्यायला कशासाठी जायचे? मुळात माझ्या मुलीला तिच्या विषयाचा सखोल अभ्यास करण्यामध्ये रस आहे का? तो कसा वाढवता येईल? हा विचार करायला हवा आणि मुलांनाही द्यायला हवा. शिक्षणाचा विचार केवळ ग्राहक होऊन करायचा की त्यापुढे जाऊन ज्ञान लालसा आणि कौशल्य-विकास हे आपले साध्य करायचे ही स्पष्टता त्यांना आणि आपल्याला मिळाली पाहिजे.
आपली मुलं ही भविष्यातील जगाची नागरिक असणार आहेत. आणि भविष्यातील जगात राष्ट्रा-राष्ट्रांमधील सीमा रेषा अधिकाधिक धूसर होत जाणार आहेत. आपली मुली-मुलं ही त्या अर्थाने वैश्विक-नागरिक असणार आहेत. त्यांची मूल्य ही नव्या जगातील मूल्य असणार आहेत. आपली मूल्य त्यांच्यावर लादणे हे सुद्धा योग्य नाही. आज त्यांनी कोणताही ज्ञानमार्ग घेऊन त्यामध्ये संशोधन किंवा महत्त्वाचे काम केले, ते कोणत्याही देशात राहून केले तरी त्याचा उपयोग अखंड मानवतेला होणार आहे.
परदेशी उच्च शिक्षण आणि त्या अनुषंगाने अशा सार्या मुद्द्यांवर आपण घरी चर्चा करीत राहिलं पाहिजे.
mentorashutosh@gmail.com