डॉ.श्रीराम गीत

सगळय़ात सोपी मिळवण्यासाठी, अभ्यासासाठी, शिकण्यासाठी पदवी कोणती? त्याचवेळी याच निकषांवर सर्वात कठीण असलेली पदवी कोणती? याचे अनेकांना चक्रावणारे उत्तर आहे बॅचलर ऑफ आर्ट्सची. क्वचितच कोणी ते होकारार्थी मान्य करेल. पण आजचा लेख वाचल्यावर त्यातील अनेकांमध्ये मतपरिवर्तन होण्याची शक्यता आहे. अतिशय तीव्र स्पर्धा असलेल्या आयआयएम किंवा यूपीएससी या दोन्हीमध्ये उत्तम यश मिळवण्यासाठी आणि त्याचवेळी सर्वागाने कारकीर्द बहरण्यासाठी आजवर अनेकांना याच बीए पदवीने साथ दिली आहे. आंतरराष्ट्रीय संबंध, नामवंत अर्थतज्ञ, गाजलेले मानसतज्ञ, विविध वृत्तपत्रांचे स्तंभलेखक, जाणकार राजकीय विश्लेषक, जागतिक, अर्वाचीन वा प्राचीन इतिहासावर अधिकार वाणीने भाष्य करणारे, जगाला भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नावर शास्त्रोक्त उत्तर शोधण्यासाठी भूगोलाचा अभ्यास करणारे, आणि साऱ्या जीवनाच्या तत्त्वज्ञानावर अधिकारवाणीने भाष्य करणारे पहिल्या शैक्षणिक पदवीची सुरुवात बीए नेच करतात.

या उलट सर्वात सोपी कोणत्याही गावात उपलब्ध, कोणताही विषय घेऊन प्रथम वर्ग मिळवता येणारी, सर्व भाषांतून उपलब्ध किंवा एखाद्या भाषेतून पदवी घेऊन  करता येणारी, मुख्य म्हणजे  प्रवेशासाठी कुठेही अडचण न येणारी ९९.९९ टक्के विद्यार्थ्यांच्या पसंतीची पदवी म्हणजे बीए च.

 मनात उद्दिष्ट ठेवून वाटचाल

 फरक एवढाच की पहिल्या गटात मोडणारे सर्वच जण अभ्यासू व तीव्र स्पर्धेची तयारी करणारे असतात. केवळ हुशारी असा निकष न लावता आंतरशाखीय वाचन व अवांतर वाचन याची आवड त्यांनी लहानपणापासून जोपासलेली असते. भाषा व व्याकरण शुद्ध लिहिणे यावर त्यांचा कायमच भर असतो. वृत्तपत्र वाचनाशी त्यांचे वावडे नसते. सर्व स्वरूपाच्या बातम्या वाचताना त्यांची प्रगल्भता वाढत जाते. एखाद्या विषयावर स्वत:चे मत मांडण्याची त्यांची क्षमता वाढत जाते. एखाद्या विषयावर स्वत:चे मत मांडण्याची त्यांची क्षमता त्यांनी विकसित केलेली असते व तशी वृत्ती बाळगलेली असते. थोडक्यात सांगायचे झाले तर आज माझे कॉलेज झाले. आजचे तीन तास मजेत संपले. आता उद्या सकाळपर्यंत मी काय करू? हा प्रश्न त्यांना कधीच पडत नाही.

९९.९९ टक्क्यांचा गट

 दुसऱ्या गटातील विद्यार्थी मार्काच्या दृष्टीने विविध पातळीवर असू शकतात. ५० वा ५२ टक्के मार्कापासून ८० वा ८२ टक्के पर्यंतचे सारे विद्यार्थी या गटात मोडतात. मात्र पाठय़पुस्तके सोडता त्यांचे वाचन फक्त कोणीतरी दिलेल्या नोट्स वाचून, पाठ करून मार्क मिळवण्या पुरते असते. शहरात कोणती वृत्तपत्रे छापली जातात त्यांची नावे पण त्यांना सांगता येत नाहीत. एखादे  पुस्तक वाचले का? अशा प्रश्नाचे उत्तर सहसा बटाटय़ाची चाळ, ययाती, युगंधर इथेच थांबते. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांची नावे सांग म्हटले तरी त्यांना सांगता येतातच असे नाही. एखाद्या सणामागची परंपरा प्रथा याबद्दल त्यांना दोन वाक्ये चुकून माकून बोलता येतात, ते सुद्धा मराठी माध्यमातून शिकली असली तर. नुकत्याच या अशा गटातील एका मुलीची माझी भेट झाली तेव्हा तिला युक्रेन हा देश कुठे आहे हे माहीत नव्हते. युद्ध कसले असा तिचाच मला उलटा प्रश्न होता. यातील अनेकांना कॉम्प्युटरचा वापर कसकसा केला जातो हे व्हॉट्सअप वर चॅट करण्यापलीकडे अजिबात माहीत नसते.

नोकरीच्या किमान गरजा

 यामुळे ज्यावेळी कोणत्याही नोकरीच्या मुलाखतीसाठी दुसऱ्या गटातील विद्यार्थी जातात तेव्हा त्यांना काय उत्तर द्यायचे आणि निवड कशासाठी करायची असा प्रश्न मुलाखत घेणाऱ्याला पडत असतो. प्रश्न कोणता कशासाठी व का विचारला आहे? कंपनीच्या कामाच्या स्वरूपाबद्दल आणि त्यांना नोकरीत करावयाची इच्छा असलेल्या कामाबद्दल पूर्ण अज्ञान असणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. पदवी घेताना किंवा पदवी घेतल्यानंतर या साऱ्यांमध्ये सहज फरक पडू शकतो. विचारल्या प्रश्नाला त्याच भाषेत उत्तर देता येणे ही पहिली गरज. यासाठी खास करून स्पोकन इंग्लिशचा क्लास लावण्याची गरज नसते पण तो अनाठाई लावला जातो व हाती काहीच येत नाही. कारण क्लास संपल्यावर लागणारा सराव केलाच जात नाही. सामान्य ज्ञान वाढवले त्याचे संदर्भ वापरले, कॉम्प्युटरचा मराठी व इंग्रजीतील वापराचा सराव केला तर तुम्ही नोकरीसाठी किमान पात्रतेची पातळी नक्की ओलांडता. इथे बी.ए.ला तुम्ही कोणता विषय घेतला होता याचा संबंध येत नसतो. लोकसत्ता वाचणाऱ्या वाचक विद्यार्थ्यांपैकी दरवर्षी किमान ५० हजार बीए पदवीधर बाहेर पडतात त्यांनी या किमान गोष्टी चिकाटीने व अभ्यास पूर्ण रीतीने सुरू केल्या तर येत्या संक्रांतीपर्यंत नोकरीची शक्यता निर्माण होईल. हीच त्यांचे साठी स्पर्धेत धावण्याची सुरुवातीची किमान तयारी आहे.