प्रा. रवींद्र कुलकर्णी

गेल्या शुक्रवारी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० मधील मुक्त आणि दूरस्थ शिक्षण पद्धती व ऑनलाइन पद्धतीने अध्ययन व अध्यापनासंदर्भात प्रा. रमेश सर माहिती देत होते. प्राध्यापक सुशील यांनी सराना विचारलं, ‘‘सर, आता या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत विचार करताना औपचारिक अध्ययन-अध्यापन पद्धतीबरोबरच अनौपचारिक पद्धतींनाही महत्त्व येणार तर. याविषयी आम्हाला अधिक काही सांगू शकाल का?’’ रमेश सर म्हणाले, ‘‘अर्थातच आपण त्याबद्दल आज बोलणार आहोत. आता आपण  NEP 2020  चं खास वैशिष्टय़ असलेल्या बहुविद्याशाखीय दुहेरी, संयुक्त आणि द्विपदवी कार्यक्रमांच्या रचनेला समजून घेऊ या, म्हणजे आपोआपच औपचारिक व अनौपचारिकतेची सांगड कशी घालता येईल ते कळू शकेल.’’

सर सांगू लागले, ‘‘बहुविद्याशाखीय दुहेरी, संयुक्त आणि द्विपदवी कार्यक्रमांतर्गत,  NEP 2020 हे औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही पद्धतींचा समावेश असलेल्या शिक्षणाचे अनेक मार्ग सुलभ करण्याच्या गरजेवर भर देते. हे धोरण, विद्यार्थ्यांमधून विचारशील, उत्तम आणि सर्जनशील व्यक्ती घडवण्यासाठी विज्ञान, सामाजिक विज्ञान, कला, मानव्य विद्या, भाषा, तसेच व्यावसायिक, तांत्रिक आणि व्यावसायिक विषयांसह विविध विषयांची उपलब्धता निर्माण करण्यावर भर देते. एखाद्या व्यक्तीला एक किंवा अधिक विशेष क्षेत्रांमध्ये रुची असेल तर, त्या विषयांचा सखोल स्तरावर अभ्यास करण्यासाठी त्या व्यक्तीला सक्षम करण्याच्या गरजेवरही NEP भर देते. उच्च शिक्षणाच्या मागणीत झपाटय़ाने होणारी वाढ आणि पारंपरिक अभ्यास शाखांमधील प्रवेशांच्या जागांच्या मर्यादित उपलब्धतेमुळे अनेक उच्च शिक्षण संस्थांनी (HEI) विद्यार्थ्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मुक्त आणि दूरस्थ शिक्षण (ODL) मोडमध्ये विविध प्रकारचे शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. अशाप्रकारे, महाराष्ट्र राज्यामधील उच्च शिक्षण संस्थांमध्ये बहुविद्याशाखीय दुहेरी/ संयुक्त/ द्विपदवी कार्यक्रमाची औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही पद्धतींमध्ये अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे.’’ रमेश सरांनी हा मुद्दा समजावून सांगताना आणखी काही मुद्दे मांडले.

प्रा. महेश यांनी विचारलं, ‘‘सर, बहुविद्याशाखीय दुहेरी पदवी अभ्यासक्रमांची निवड विद्यार्थ्यांना कशी करता येईल?’’ रमेश सर उत्तरले, ‘‘UGC ने अलीकडेच सर्व  HEI ला विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी मिळवता यावीत यासाठी योग्य ते बदल करण्यास सांगितले आहे आणि एकाच वेळी दोन शैक्षणिक कार्यक्रम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली आहेत:

विद्यार्थी दोन पूर्णवेळ शैक्षणिक अभ्यासक्रम हे प्रत्यक्ष वर्गात बसण्याच्या पद्धतीने म्हणजे फिजिकल मोडमध्ये पूर्ण करू शकतात. अर्थात, या दोन्ही अभ्यासक्रमांच्या वेळा एकमेकांपेक्षा वेगळय़ा असाव्यात याची काळजी घ्यावी. दोन्ही अभ्यासक्रमांच्या अध्यापनाच्या वेळांची एकमेकांत सरमिसळ होता कामा नये.

विद्यार्थी दोन शैक्षणिक कार्यक्रम घेऊ शकतात: त्यापैकी एक प्रत्यक्ष वर्गात बसण्याच्या पद्धतीने म्हणजे फिजिकल मोडमध्ये असू शकेल आणि दुसरा मुक्त आणि दूरस्थ पद्धतीचा म्हणजे सर्वपरिचित अशा शब्दांत सांगायचं तर ओपन अँड डिस्टन्स लर्निग (ODL)/ऑनलाइन मोडमध्ये; किंवा ते एकाच वेळी दोन्ही अभ्यासक्रम  मुक्त आणि दूरस्थ पद्धतीचेही घेऊ शकतात.

विद्यापीठे अनुदान आयोग/ वैधानिक परिषद/ भारत सरकारने मान्यता दिलेल्या उच्च शिक्षण संस्थामध्ये सुरू असलेल्या ODL/ऑनलाइन मोड अंतर्गत पदवी किंवा पदविका कार्यक्रम विद्यार्थी निवडू शकतात.

या मार्गदर्शक तत्त्वांखालील पदवी किंवा डिप्लोमा कार्यक्रम जेथे लागू असेल तेथे  UGC आणि संबंधित वैधानिक/व्यावसायिक परिषदांद्वारे अधिसूचित केलेल्या नियमांद्वारे शासित केले जातील.

ही मार्गदर्शक तत्त्वे पीएच.डी. व्यतिरिक्त इतर शैक्षणिक अभ्यासक्रम घेऊन अध्ययन करत असलेल्या विद्यार्थ्यांना लागू होतील. वरील चारही मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे, महाराष्ट्रातील राज्य विद्यापीठे त्यांच्या अभ्यास मंडळांच्या (Board of Studies), अधिष्ठाता मंडळांच्या (Board of Deans) आणि विद्या परिषदेच्या (Academic council) माध्यमातून त्यांच्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन शैक्षणिक कार्यक्रम राबवू देण्यासाठी यंत्रणा तयार करू शकतात.’’

रमेश सर म्हणाले, ‘‘एका विद्यापीठात किंवा एका महाविद्यालयात प्रवेश घेतलेले विद्यार्थी यजमान संस्थेत पहिली पदवी घेऊ शकतील आणि त्यांना दुसरी पदवी पहिल्या विद्यापीठाशी किंवा महाविद्यालयाशी शैक्षणिक भागिदारीने जोडल्या गेलेल्या दुसऱ्या विद्यापीठातून किंवा दुसऱ्या महाविद्यालयातून (याला आपण सहयोगी विद्यापीठे किंवा सहयोगी महाविद्यालय असं म्हणू या) घेता येईल. एकाच वेळी दोन पदव्यांचा पाठपुरावा केल्याने विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता, समस्या सोडवण्याची क्षमता वृद्धिंगत होईल त्यांना एक निराळाच मौल्यवान दृष्टिकोन लाभेल. उदाहरणार्थ, कॉम्प्युटेशन बायोलॉजी ह्या विषयातील प्रावीण्य मिळवण्यासाठी एखादा गणित विषय घेऊन एम.एस.सी. करणारा विद्यार्थी, हा लाइफ सायन्सेस/ बायोलॉजिकल सायन्सेसमध्ये बी.एस.सी. करू शकतो.’’

सुशील सरांनी पटकन टाळी वाजवून दाद दिली, ‘‘अरेच्या, रमेश सर, आता विद्यार्थ्यांना भविष्यात काय करायचे आहे याचा विचार करून आता  द्वितीय पदवीची निवड करायची संधी मिळणार. आपल्या वेळी असं असतं, तर किती छान झालं असतं. असो. पण, येणाऱ्या नव्या पिढीला ते शक्य होणार आहे.’’

रमेश सर म्हणाले, ‘‘खरं आहे सुशील. पण बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमांमध्ये दुहेरी पदवीला प्रोत्साहन देण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांनी आपल्या प्रवेश धोरणात, शैक्षणिक नियमांत आणि अधिनियमांत योग्य बदल करणे आवश्यक आहे. दुहेरी पदवीसाठी आपला निर्णय निश्चित करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी प्रत्येक उच्च शिक्षण संस्थांची धोरणे समजून घेणे आवश्यक आहे. सहयोगी उच्च शिक्षण संस्थांनीही एक काळजी घेतली पाहिजे की विद्यार्थ्यांनी मिळवलेले श्रेयांक हे परस्परांच्या अभ्यासक्रमांना आच्छादित (overlapping) करणारे नसतील. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांने ज्या संस्थांमध्ये ज्या अभ्यासक्रमासाठी स्वत:ची नोंदणी केली आहे त्या प्रत्येक अभ्यासक्रमासाठी फक्त एकसमान परीक्षा आणि मूल्यमापन प्रक्रिया सादर करावी. सहयोगी उच्च शिक्षण संस्थांनी एक खबरदारी घेतली पाहिजे की एखाद्या विद्यार्थ्यांला किंवा विद्यार्थिनीला आपला अभ्यासक्रम पूर्ण न करता जर निर्गमन करायचे असेल तर त्यांना ते श्रेयांक,त्यांच्या भविष्यातील स्वीकृतीच्या संदर्भात, स्पष्ट तपशीलांसह त्यांना बाहेर पडण्याच्या मार्गासाठी आवश्यक ती तरतूद करतील.’’

रमेश सर इथं थांबले व म्हणाले, ‘‘पुढच्या वेळी आपण संयुक्त आणि द्विपदवी अभ्यासक्रमांबाबत अधिक बोलणं करू या.’’

अनुवाद : डॉ. नीतिन आरेकर