डॉ.श्रीराम गीत
नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास गरजेचा
इलेक्ट्रॉनिक्स ही शाखा खरे तर इलेक्ट्रिकलमधून निर्माण झालेली. आयआयटीसारख्या संस्था इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स अशीही शाखा निवडीसाठी देतात. गणिताची आणि कोडींगची भीती वाटते, पण कॉम्प्युटर आवडतो अशी विद्यार्थी मंडळी ही शाखा अनेकदा निवडतात. दुसरी मिळत नाही म्हणून घेणारे बहुतेक. मात्र पाच सात टक्के विद्यार्थी मला इलेक्ट्रॉनिक्समध्येच काही शिकायचे आहे, काम करायचे आहे म्हणूनही शाखा निवडतात.
प्रत्यक्ष अभ्यासक्रम शिकवताना सर्वसाधारण कॉलेजमध्ये मात्र बहुतेक जुनाट गोष्टी पारंपरिकरीत्या शिकवल्या जातात. उत्तम कॉलेजमध्ये नामांकित, जाणकार प्राध्यापक असतील तर मात्र विद्यार्थ्यांची सर्वागीण प्रगती होते. खऱ्या अर्थाने या साऱ्या विद्यार्थ्यांची कोंडी होते ती नोकरी शोधताना किंवा नोकरी लागल्यानंतरच्या स्पर्धेला तोंड देताना म्हणजे स्पर्धेत धावण्यापूर्वी. ज्यांना मोठय़ा पॅकेजची नोकरी हवी असते, मोठय़ा कारखान्यातच हवी असते त्यांची गोची जास्तच होते. गेली अनेक दशके ही शाखा स्क्रू ड्रायव्हर टेक्नॉलॉजी शाखा म्हणून ओळखली जाते. थोडक्यात असेम्ब्ली लाईन वरची देखरेख किंवा टेिस्टगची कामे यामध्ये मोठय़ा नामवंत एमएनसीत काम मिळते. याचा अनेकांना कंटाळा वा राग येतो. पण यावर उपाय नसतो. आई-बाबांनी पाठवले तर एमएस करायला जाऊन या सगळय़ा प्रकारातून अशा विद्यार्थ्यांची सुटका होऊ शकते. पण साऱ्यांच्या आई-बाबांना ५० लाखांचा खर्च करायचा नसतो वा झेपणारा नसतो. त्यामुळे जे तिकडे जाऊ शकत नाही त्यांची समस्या अधिकच वाढत जाते.
यावर उपाय आहेत
इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजेच आयओटी यात अनेक उद्योजक काम करतात. ते काम शिकावे लागते व शिकण्यासाठी मोठे पॅकेज द्यायला कोणीच तयार नसतो. जे विद्यार्थी तिसऱ्या वर्षांपासून अशा पद्धतीच्या कामाशी संबंधित उमेदवारी करतात, त्याचे तंत्रज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करतात, त्यासाठी लागणारी एम्बेडेड लैंग्वेज शिकून घेतात त्यांचा नोकरीचा राजरस्ता सुरू होतो. मात्र आजवर अनेक विद्यार्थ्यांना जेव्हा मी एम्बेडेड बद्दल विचारणा केली तेव्हा आमच्या कॉलेजात असले काही शिकवले नाही असे उत्तर मला नेहमीच मिळाले. आमच्या कॉलेजात हे शिकवले नाही असे म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांला नोकरीमध्ये अनेकदा नकाराला तोंड द्यावे लागते. हे सर्व वाचकांनी लक्षात ठेवावे. आपल्या शाखेमध्ये व त्या शाखेची संबंधित नवनवीन तंत्रज्ञान कोणते येत आहे? त्याचे तांत्रिक वाचन व अभ्यास करणारा विद्यार्थी सहज स्पर्धेमध्ये पुढे जातो. याचेच एक गमतीचे उदाहरण म्हणजे मला रोबोटीक्सचे काम करायचे आहे असे सांगणाऱ्या विद्यार्थ्यांला चारही मूळ शाखातून म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सची चीप लागते, कॉम्प्युटर मधून प्रोग्राम बनतो, मेकॅनिक्समधून मुव्हमेंट दिली जाते, तर इलेक्ट्रिक सप्लाय करता इलेक्ट्रिक बॅटरीची गरज भागते अशी रोबोटिक्सची सुरुवात होते याची कल्पना नसेल तर? आपली मुले नवीन काहीतरी सांगत आहेत आणि त्यांना ते द्यायलाच पाहिजे या ऐवजी अशा सोप्या बाबतीतून समजून घेणाऱ्या पालकांना त्यांच्या मुलांचा स्पर्धेत तगून राहण्याचा रस्ता दिसू लागतो हे नक्की.
मेंटेनन्स आणि मार्केटिंग
या दोन्हीमध्ये खऱ्या अर्थाने सत्तर टक्के इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयर आनंदाने, समाधानाने आणि चांगल्या पगारावर सुरुवात करू शकतात. पुढच्या दोन-तीन वर्षांत त्यांची छान प्रगती होते. सर्विस इंजिनीयर सगळय़ाच क्षेत्रात गरजेचे असतात. इलेक्ट्रॉनिक्स मार्केटिंगची बाजारपेठ प्रचंड वाढत आहे. मात्र या दोघांसाठी ग्राहक हा राजा असतो ही ‘कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट’, तोंडात खडीसाखर ठेवून शिकावी लागते. या पद्धतीत काम करणारे कधीच बेकार राहण्याचे कारण नसते. हेही आवडत नसेल तर एमबीएची प्रवेश परीक्षा देऊन तो रस्ता स्वीकारणे हे आई-बाबांशी बोलून ठरवावे लागते. कारण आता पुन्हा दोन वर्षे शिक्षण व दहा लाखाचा खर्च वाट बघत असतो. दमलेल्या बाबाची कहाणी कदाचित येथे सुरू होऊ शकते..
आवाहन
यूपीएससी द्यायची आहे. तर मनात हजारो प्रश्न उभे राहतात. मार्गदर्शनाची गरज भासते. अर्थात प्रश्न तिथे उत्तरही असतेच, करिअरशी निगडित देशातील सर्वोच्च परीक्षांविषयीच्या शंकांचे निरसन होईल, असे एकच ठिकाण म्हणजे करिअर वृत्तांतमधील करिअर मंत्र. म्हणूनच विद्यार्थ्यांनो, लेखणी उचला आणि प्रश्न विचारा. प्रश्न विचारताना आवश्यक तेथे आपली शैक्षणिक, वैयक्तिक माहिती सविस्तर लिहावी. जेणे करून योग्य प्रकारे शंका समाधान होईल. आमचा ई-पत्ता :careerloksatta@gmail. com
