Success Story: ज्या व्यक्तीमध्ये आपले स्वप्न साकारण्याची इच्छा असते, तो कोणत्याही वयात आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच एका व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास घेऊन आलो आहोत, ज्यांची यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील गंडाड पंचायतीचे डॉ. मिल्खी राम यांनी वयाच्या ७३ व्या वर्षापर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांनी २२ पदव्या व ११ डिप्लोमा मिळवले आहेत.

वयाच्या ७३ व्या वर्षापर्यंत शिक्षण घेण्याची जिद्द

एकीकडे या वयातील लोक आपली मुले, नातवंडे यांचे शिक्षण आणि त्यांच्या करिअरचे स्वप्न पाहतात. परंतु, त्याच वयातील डॉ. मिल्खी राम यांनी वयाच्या ७३ व्या वर्षापर्यंत अभ्यास सुरू ठेवून, २२ पदव्या आणि ११ डिप्लोमा मिळवले आहेत. त्यांच्या पदव्यांमध्ये एलएलबी, एलएलएम, बी.एड., एम.एड, एमए (इंग्रजी, राज्यशास्त्र, समाजशास्त्र यासह १८ विषयांमध्ये), एम.फिल (हिंदी), जेएमसी आणि सध्या ज्योतिषशास्त्रात एम.ए. करीत आहेत. त्याशिवाय त्यांनी भाषांतर, मानव संसाधन विकास, शिक्षण, संस्कृत भाषा इत्यादी क्षेत्रांत ११ डिप्लोमा केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिमाचल प्रदेशातील सर्वांत सुशिक्षित व्यक्ती

हिमाचल प्रदेशातील भाजप खासदार व राज्यसभा खासदार सिकंदर कुमार यांनीही इन्स्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले की, डॉ. मिल्खी राम यांचे नाव लुसेंट जनरल नॉलेज पुस्तकात (पृष्ठ ४१४) हिमाचल प्रदेशातील सर्वांत शिक्षित व्यक्ती म्हणून नोंदवले गेले आहे. हे यश केवळ ज्ञानाचे उदाहरण नाही, तर अढळ समर्पण, शिस्त व कधीही न संपणाऱ्या उत्साहाचे उदाहरण आहे.
त्यांनी पुढे लिहिले की, डॉ. मिल्खी राम हे अशा सर्व लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत, ज्यांनी कोणत्याही कारणास्तव आपला अभ्यास अपूर्ण सोडला आहे किंवा वयाचे निमित्त करून शिकणे थांबवले आहे. या महान कामगिरीबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा!